नामपूरात शेतमालाला दर, कर्जमाफीसाठी महिलांचे आंदोलन

नामपूरात शेतमालाला दर, कर्जमाफीसाठी महिला रस्त्यावर
नामपूरात शेतमालाला दर, कर्जमाफीसाठी महिला रस्त्यावर

नामपूर, जि. नाशिक : कांदा पिकासह शेतमालाचे घसरलेले भाव, वीज वितरण कंपनीचा अनागोंदी कारभार, मोठा गाजावाजा करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारी फसवी कर्जमाफी योजना अशा प्रमुख मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथील मालेगाव-ताहाराबाद रस्त्यालगत बाजार समिती प्रवेशद्वारासमोर राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे पदाधिकारी व संतप्त शेतकऱ्यांनी शनिवारी (ता. १५) रास्ता रोको आंदोलन केले. जायखेडा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक श्रीराम कोळी यांच्या मध्यस्थीनंतर निवेदन देत आंदोलन मागे घेतले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा ॲड. रेखा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. ॲड. शिंदे यांनी एके काळी सधन समजल्या जाणाऱ्या बागलाण तालुक्‍यात सर्वाधिक १९ शेतकऱ्यांनी बाजारभाव नसल्याने जीवनयात्रा संपविल्याचे सांगितले. तसेच कांद्याला दोन हजार रुपये हमीभाव देण्याची मागणी केली. या वेळी सटाणा येथील नगरसेविका सुरेखा बच्छाव, सुनीता जाधव, मेनका जगताप, नंदा पवार, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्ष शीतल कंकरेज, संगीता अहिरराव, शीला गलांडे, डॉ. विद्या चव्हाण, गायत्री कापडणीस, भारती पगार, कविता गायकवाड, अर्चना जाधव, रंजना गवळी, बेबीबाई गवळी, कमलाबाई पगार, शेकडो शेतकरी उपस्थित होते.

बागलाण तालुक्‍यात जुन्या कांद्याची मोठ्या प्रमाणात साठवणूक असल्याने आजही शेतकऱ्यांकडे हजारो क्विंटल उन्हाळ कांदा शिल्लक आहे. मागील चार महिन्यांत कांद्याच्या भावात वाढ झालीच नाही. आता नवीन कांदा आल्याने कांद्याला जास्त भाव मिळणारच नाही, हे ओळखून शेतकरी मातीमोल कांद्याची विक्री करीत आहेत. त्यामुळे शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा.  - शीला गलांडे, कांदा उत्पादक, नामपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com