‘कल्पतरू’ चिक्कीची टेस्ट एकदम बेस्ट!

औरंगाबाद जिल्ह्यात भटजी (ता. खुलताबाद) येथील राणी लक्ष्मीबाई महिला बचत गटातील अल्पभूधारक महिलांनी खमंग, पौष्टिक, चटकदार विविध स्वादांतील चिक्की निर्मिती केली आहे. विविध कृषी प्रदर्शने व विक्री केंद्र तयार करून त्याचे उद्योगात रूपांतर केले आहे.
packed Kalpataru chikki sold in exhibition stalls
packed Kalpataru chikki sold in exhibition stalls

औरंगाबाद जिल्ह्यात भटजी (ता. खुलताबाद) येथील राणी लक्ष्मीबाई महिला बचत गटातील अल्पभूधारक महिलांनी खमंग, पौष्टिक, चटकदार विविध स्वादांतील चिक्की निर्मिती केली आहे. विविध कृषी प्रदर्शने व विक्री केंद्र तयार करून त्याचे उद्योगात रूपांतर केले आहे. या माध्यमातून रोजगाराबरोबर महिन्याला अर्थार्जनाची सोय तयार केली आहे.  औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील भटजी या छोट्याशा गावात राणी लक्ष्मीबाई महिला बचत गट कार्यरत आहे. गटाच्या दहा महिला सदस्य आहेत. रत्ना धनसिंग पुसे या गटाच्या अध्यक्षा आहेत. गटातील सर्वच सदस्यांना पाच एकरांपेक्षा कमी शेती आहे. ही शेती कौटुंबिक गरजा पूर्णपणे भागवण्याएवढी सक्षम नव्हती. शेती करीत करीत काहीतरी जोड व्यवसाय करावा म्हणून त्यांनी दहा वर्षांपूर्वी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सह्याने गटाची निर्मिती केली. त्यांना बँकेने तीन लाख रुपये कर्जही दिले. प्रत्येकाच्या वाट्याला ३० हजार रुपये आले. यातून सहाजणींनी शिलाई यंत्र घेऊन व्यवसाय सुरू केला. काही जणींनी गायी घेतल्या. काहींनी किराणा दुकान सुरू केले. गटाने बँकेचे अडीच लाख रुपयांचे कर्ज आतापर्यंत फेडले आहे. गटाच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून मुलींची लग्न करणे त्यांना शक्य झाले. कुटुंबाच्या अत्यावश्यक गरजा भागवता आल्या.  ‘आत्मा’ने शिकवले विक्रीचे तंत्र   विविध व्यवसायांमधून नियमित उत्पन्न सुरू झाले होते. परंतु यापुढे जाऊन गटातर्फे व्यवसाय करायचा महिलांचा विचार होता. गटाच्या अध्यक्षा पुसे यांचे पती धनसिंग पूर्वी घरगुती स्तरावर चिक्की करायचे व विकायचे. साहजिक तोच विचार पुढे आला. धनसिंग यांनी गटातील महिलांना विविध प्रकारच्या चिक्की तयार करण्याचे तंत्र शिकवण्याचे ठरवले. सन २०१४ पासून चिक्कीनिर्मितीचा व्यवसाय करण्यास सुरुवात केली. सर्वांत महत्त्वाचा प्रश्‍न म्हणजे मार्केटिंगचे तंत्र जुळत नव्हते. त्यामुळे या गटाची ‘आत्मा’शी जोडणी कृषी विभागाने केली. विक्रीचे तंत्र शिकवले. औरंगाबाद येथे भरणाऱ्या प्रदर्शनात या गटाला कृषी विभागाकडून नि:शुल्क स्टॉल मिळू लागला. त्याचे भाडेशुल्क आत्मामार्फत भरले जाते. गटाला उभारी देण्यामध्ये तालुका कृषी अधिकारी विजय नरवडे, ‘आत्मा’चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रदीप पाठक व पल्लवी गायकवाड यांचा महत्त्वाचा वाटा आहे. महिलांनी उंबरा ओलांडला  घराचा उंबरा कधी न ओलांडलेल्या या महिला चिक्की विक्रीच्या निमित्ताने आत्मविश्‍वासू, निर्भर व सक्षम होऊ लागल्या. रंगाबाद जिल्ह्याबरोबरच मुंबई, पुणे आदी शहरांत भरणाऱ्या प्रदर्शनात भाग घेऊ लागल्या. विक्रीतील कौशल्य त्यांना खऱ्या अर्थाने इथेच शिकायला मिळाले. एकट्या औरंगाबाद शहरातच वर्षभरात जवळपास ५ ते ६ प्रदर्शने भरतात. ग्रामविकास विभागाद्वारे नियमित भरवल्या जाणाऱ्या मुंबई येथील ‘महालक्ष्मी सरस’सारख्या प्रदर्शनात सर्वात जास्त विक्री करणारा बचत गट म्हणून पुरस्कार मिळाला आहे. जानेवारी १७ ते १९ (२०२०) या काळात झालेल्या या गटाने सुमारे साडेतीन लाखांची विक्री केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही  चिक्कीची खरेदी करून आस्वाद घेतला. स्टॉलला भेट द्यायला आलेल्या ग्राहकाच्या हातात चिक्कीचा तुकडा आग्रहाने देऊन नमुना ‘टेस्ट’ करण्याची विनंती केली जाते. बहुतांश ग्राहक खरेदी करतातच. प्रत्येक प्रदर्शनात सुमारे चार ते पाच क्विंटलपर्यंत विक्री होत असल्याचे रत्नाताई सांगतात.  कल्पतरू ब्रँडने विक्री   कल्पतरू ब्रँडने हा गट चिक्कीची विक्री करतो. विक्रीची यंत्रणाही निर्माण केली आहे. गटाने तीन ठिकाणी विक्री केंद्रे थाटली. खुलताबाद येथील भद्रा मारुती हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. येथे भाविकांचा सतत राबता असतो. या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच विक्री केली जाते. दुसरे ठिकाण वेरुळ येथे आहे. येथील महादेवाचे प्रसिद्ध मंदिर १२ ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. देशभरातून येथे भाविक येतात. या ठिकाणी गाड्यावर विक्री होते. तिसरे ठिकाण औरंगाबाद येथील शहागंज भागात आहे. येथेही  गाड्यावरच विक्री होते. विक्रीसाठी स्वतंत्र व्यक्ती वा महिला सदस्याची नेमणूक केली आहे. त्यासाठी दिवसाचा रोजगार म्हणूऩ २०० रुपये दिले जातात. विक्रीसाठी गटातील महिलांची आलटून पालटून नेमणूक केली जाते. लॉकडाउन काळात विक्री ठप्प  या व्यवसायातून महिन्याला एक लाख रुपयांची उलाढाल लॉकडाउनपूर्वी व्हायची. लॉकडाउनच्या संपूर्ण आठ ते नऊ महिन्यांच्या काळात विक्रीवर मोठा परिणाम झाल्याचे रत्नाताईंनी सांगितले. या काळात प्रदर्शने, मंदिरे सर्वच बंद असल्याने व्यवसाय ठप्प करावा लागला. आता पुन्हा नव्याने विक्रीला मोठ्या जोमाने सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या मुंबई येथे दर आठवड्याला २० ते २५ किलो माल मागणीनुसार पाठवण्यात येत आहे.  भांडवल उभारणी  गटातील महिलांचा उदरनिर्वाह शेती, शिलाई व चिक्की व्यवसाय वरच अवलंबून आहे. घरच्या साधनांचा वापर करूनच त्या चिक्की तयार करतात. बाजारात आयताकृती चिक्की मिळते. मात्र गटाकडील चिक्की गोल आकाराची आहे. त्याचे कारण म्हणजे तसा आकार तयार करण्यासाठीची यंत्रसामग्री घेण्याची गटाची आर्थिक परिस्थिती नाही. गटाची नियमित बैठक होते. प्रत्येक महिन्याला सदस्याकडून शंभर रुपयाची बचत केली जाते. ते पैसे बँकेत गटाचे नावे भरण्यात येतात. जमा झालेल्या रकमेतून गरजू सदस्याला प्रति महिना दोन टक्के व्याजाने कर्जही देण्यात येते. बैठकीमध्ये विक्रीतून मिळालेल्या पैशांचा हिशेब समोर ठेवला जातो. नफ्याचे समान वाटप केले जाते. साधारणत: २५ ते ३० टक्के नफा  मिळतो. चिक्कीचे प्रकार  विविध स्वादाच्या चिक्कीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी औरंगाबाद, खुलताबाद येथून होते. गुळाची खरेदी परिसरातील गुऱ्हाळांतून होते.   शेंगदाणा व राजगिरा चिक्की  

  • दर रु.२८० प्रति किलो 
  • तीळ व खोबरा चिक्की  रु. ३२०.  
  • संपर्क :  रत्ना पुसे- ८६९८३६९०५२ (लेखक औरंगाबाद येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com