पीकविमा वेळेत देण्यासाठी काम सुरू ः अजित पवार

शासन पीकविमा वेळेत देण्याबाबत काम करत असून एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या मदतीने नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करत आहे.
Work started to pay crop insurance on time: Ajit Pawar
Work started to pay crop insurance on time: Ajit Pawar

औरंगाबाद : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे व पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत मदत म्हणून शासन पीकविमा वेळेत देण्याबाबत काम करत असून एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या मदतीने नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील नुकसानीचे उर्वरित पंचनामे तत्काळ पूर्ण करून मदतीसाठीचे प्रस्ताव सादर करावे. त्याचप्रमाणे या संकटात खचून गेलेल्यांना धीर देऊन योग्य मदत वेळेत करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (ता. १०) विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित मराठवाडा विभागाच्या आढावा बैठकीत दिले. 

बैठकीस पालकमंत्री सुभाष देसाई, नांदेडचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, जालन्याचे पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री राजेश टोपे, बीडचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, खासदार फौजिया खान, आमदार सतीश चव्हाण, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता, कृषी सचिव एकनाथ डवले, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, मनपा आयुक्त अस्तिक कुमार पाण्डेय, लातूरचे जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जालना, बीड, परभणी, हिंगोलीचे जिल्हाधिकारी दृकश्राव्य पद्धतीने तसेच विविध विभाग प्रमुख उपस्थित होते. 

श्री. पवार म्हणाले, रब्बी हंगामासाठी पीककर्ज पुनर्गठन करण्याबाबत शासन स्तरावर निर्णय घेतला जाईल. तसेच खरीप हंगामासाठी ९९४ कोटी रुपये विमा कंपनीला दिले असून ते तत्काळ वितरित करण्याबाबत कार्यवाही करावी. 

नांदेड जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या दरम्यान १४३ टक्के इतका पाऊस झाला असून अतिवृष्टीने बाधित क्षेत्राकरिता ४१९ कोटी इतकी रक्कम देय असून कोल्हापूरच्या धर्तीवर प्रतिहेक्टरी २० हजार रुपये इतकी मदत मिळावी, अशी मागणी मंत्री अशोक चव्हाण यांनी केली.  औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई दुरदृष्यप्रणालिवरून म्हणाले, की जिल्ह्यात ६५ मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाल्याने जिल्ह्यात एकूण ६६९ कोटींचे नुकसान झाले.  पायाभूत सुविधा नष्ट झाल्याने ३४६ कोटींची आवश्यकता आहे. 

जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या ओल्या दुष्काळात मजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांना रेशन उपलब्ध करून देण्याची मागणी आरोग्य मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केली. बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने नदीचे पात्र बदलले असून विशेष बाबी अंतर्गत मदतीची मागणी सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली. बैठकीत प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनी निर्देश केले. तसेच विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर यांनी निधीच्या मागणीबाबत संगणकीय सादरीकरण केले.

मराठवाड्यातील नुकसानीचे पंचनामे करताना पीक अहवाल सादर करण्यात महसूल, कृषी, ग्रामविकास विभागाने लवकर समन्वयाने काम केल्यास त्वरीत मदत देता येईल. - एकनाथ डवले, कृषी सचिव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com