सायकलवरुन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाणारा कृषी अधिकारी..

आमचे काम शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्याचे आहे पण हे काम खरंच होतंय का हे पाहाण्याची वेळ आली आहे. यामुळेच मी शेतकऱ्यांशी थेट भेटायचा निर्णय घेतला. त्याला माझ्या सायकलिंगच्या छंदाची जोड दिली. व्यायाम तर झालाच परंतु आपल्या जिल्ह्यातील पीकपद्धतीही स्वत: पाहता येत आहे. - ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर
छंदाला दिली कामाची 'जोड'
छंदाला दिली कामाची 'जोड'

कोल्हापूर : सकाळी सातची वेळ. तांबडं फुटल्या फुटल्या शिवारात शेतकामाची लगबग चाललेली. इतक्‍यात एक सायकलवाली व्यक्ती रस्ता सोडून थेट शिवारात येते. शेतकाम करणाऱ्या शेतकऱ्याच्या नजरेत संभ्रमावस्था. आल्या आल्या ती व्यक्ती चौकशी सुरू करते, काय करताय? कोणते पीक घेताय? कृषी विभागाचा कर्मचारी येतो का? तुमच्या अडचणी काय काय आहेत.? असे अनेक प्रश्‍न विचारले जातात. शेतकऱ्याची नजर प्रश्‍नार्थक. तुम्ही कोण असे विचारल्यावर उत्तर येते. मी ज्ञानदेव वाकुरे. या जिल्ह्याचा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी. दोन मिनिटे शांतता. जिल्ह्याचा कृषी विभागाचा प्रमुख चक्क सायकलवरून आपल्या शिवारात तेही सकाळी सकाळीच. शेतकऱ्याच्या हे लक्षात आल्यानंतर येथून सुरू होतो तो शेतकरी व अधिकारी यांच्यातील नव्या अकृत्रिम नात्याचा एक संवाद.

चाळीस पन्नास किलोमीटरवरून आपल्या शिवारात येऊन थेट शेतीबाबत चौकशी करण्यासाठी आलेल्या श्री. वाकुरे यांच्यापुढे मग शेतकऱ्यांचा अडचणींचा पाढा सुरू होतो. विविध अडचणी मांडल्या जातात. त्याची नोंद ते करून घेतात. त्या शेतकऱ्याला आपला नंबर देतात आणि एक-दोन तासांच्या गावातील भेटीनंतर सायकल परत कोल्हापूरच्या दिशेने धावू लागते आणि कार्यालयीन वेळेत ते कार्यालयात दाखल होतात.

कोणत्याही खात्याचे वरिष्ठ अधिकारी म्हंटल की त्याची बडदास्त, त्यांचा थाट, त्यांच्या सोयी, त्यांच्या मागण्या या बाबी आता लपून राहिल्या नाहीत. कृषी विभागाचे काही अधिकारीही याला अपवाद नाहीत. पण, अशा वातावरणातही थेट शिवारात सायकलने जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचे काम कोल्हापूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. वाकुरे करीत आहेत. चार महिन्यांपूर्वी त्यांची येथे बदली झाली. मुंबईच्या हवामान अनुकूल कृषी प्रकल्पातून ते जिल्ह्यांत आले आणि आल्या आल्याच त्यांनी आपला वेगळेपणा दाखविण्यास सुरवात केली. पण हटके पद्धतीने. त्यांना सायकलिंगची आवड आहे. येथे आल्यानंतरही त्यांनी ही आवड कायम ठेवली. पण फिरता फिरता लक्षात आले की, आपण नुसताच फिरण्यापेक्षा यालाच कामाची जोड दिली तर?..आणि विचार पक्का झाला. दररोज सकाळी सहा साडेसहा वाजता सायकल काढायची. आणि अगोदरच्या दिवसाच्या कर्मचाऱ्यांशी कार्यालयातील बोलणे लक्षात घ्यायचे. एखाद्या भागाबाबत चर्चा झाली असली आणि ते गाव चाळीस पन्नास किलोमीटरच्या पट्‌ट्यात असले की सायकल त्या गावाकडे वळवायची. आणि थेट ते गाव गाठायचे. आपल्या विभागाच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला याची कल्पना न देता थेट शिवारातच सायकल न्यायची आणि तेथील परिस्थितीची माहिती घ्यायची. आपल्या खात्याच्या माणसाचा या भागात किती 'रिच' आहे याचा अंदाज घ्यायचा. एखाद्या योजनेचा आढावा घ्यायचा. आणि परत निघायचे कार्यालयात आले की त्या भागातील कर्मचाऱ्याला बोलावून त्याच्याकडून माहिती घ्यायची. आणि काही संशयास्पद वाटू लागले की दिलेल्या भेटीचा वृत्तांत त्याला सांगायचा?.. कामात सुधारणा करा असे सांगून त्याला वेगळ्या पद्धतीने समज द्यायची अशी पद्धत श्री. वाकुरे यांनी अवलंबिली आहे. सायकलवरुन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देताना ज्ञानदेव वाकुरे Video .. हजारांहून अधिक किलोमीटरचा सायकल प्रवास गेल्या चार महिन्यांत त्यांनी करवीर, हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा, कागल आदी तालुक्‍यांतील विविध गावांतून आठवड्यातून चार ते पाच दिवस या बेताने सुमारे एक हजारहून अधिक किलोमीटरचा प्रवास केला. शेकडो शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. अगदी डोंगराळ गावातही त्यांनी कष्टपूर्वक सायकल चालवत शेतकऱ्यांना भेटी दिल्या आहेत. चढ उताराला न जुमानता त्यांनी सायकलचा प्रवास सुरूच ठेवला. यातून जिल्ह्याची खरी परिस्थिती थेट शेतकऱ्यांच्या तोंडातून त्यांनी ऐकून त्याबाबतच्या नोंदी ते करून घेत आहेत. शेतकऱ्यांचे खात्याबद्दलचे मत, आपल्या कर्मचाऱ्याचा संपर्क, पिकांची मार्केटिंग पद्धती, शेतकरी एखाद्या योजनेत सहभागी असल्यास त्याची स्थिती, कर्मचारी या कामी पैसे मागतो का?, मागत असल्यास तुम्ही काय केले मग तुमचे काम झाले का? अशा प्रश्‍नांसह अनेक महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे ते शेतकऱ्यांकडून स्वत: घेतात. याचबरोबर रोगाचा प्रादुर्भाव झाला तर कोणती औषधे मारता, यासाठी तुम्हाला कोण मार्गदर्शन करतो. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिल्यानंतर त्यांचा काय प्रतिसाद असतो आदी बारीकसारीक तपशीलही ते गोळा करतात.

कर्मचाऱ्यावर जरब

वाकुरे यांच्या अशा सायकल भेटीमुळे कामचुकार कृषी कर्मचाऱ्यांवर चांगलीच जरब बसली आहे. एखादा कर्मचारी चुकीचे रिपोर्टिंग करत असल्यास त्याला वस्तुस्थितीचा थेट दाखलाच दाखवत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना नियमबाह्य कामे करण्याचा विचार बाजूला ठेवावा लागत आहे. साहेब आपल्या भागात कधीही येऊ शकतात. यामुळे ते अहवाल देताना काळजीपूर्वकच देत असल्याचा अनुभव आता कृषी विभागाच्या जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात येत आहे.

गाववार रिपोर्ट तयार करण्याचे काम सुरू

शेतकऱ्यांच्या भेटी झाल्यानंतर श्री. वाकुरे यांना अनेक अडचणी समजल्या. कृषी सहायकांना व अनेक गावांची परिपूर्ण माहितीच नसल्याचे दिसून आले. माहिती नसल्याने अनेक रिपोर्ट मनमानी येत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी आढाव्याचे कामकाज कडक केले. स्वत: प्रश्‍न तयार करून त्यांनी कृषी सजानिहाय केलेल्या कामकाजाचा आढावा कृषी सहायकांकडून एका फार्ममधून घेण्याचे काम सुरू केले आहे. यामध्ये कृषी सहायकाचे नाव, त्याचा सेवेचा कालावधी, सजांतर्गत गावाची संख्या, गावातील खातेदारांची संख्या, पीक क्षेत्र, खरीप, रब्बी क्षेत्र, घ्यायचे पीक प्रयोग, विविध योजनांत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या, त्याच्या लागवडीखालील क्षेत्र, रोग किडीमुळे बाधित झालेले क्षेत्र, याचबरोबर त्या गावातील पाच प्रगतिशील शेतकऱ्यांची नावे त्यांचे उल्लेखनीय कामे असा चार ते पाच पानांची माहिती त्यांनी कृषी सहायकाकडून भरून घेण्यास सुरवात केली आहे. यामुळे प्रत्येक गावाचा कृषीचा स्वतंत्र अहवाल तयार होत आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com