समृद्धी महामार्गाच्या कामास लवकरच प्रारंभ ः मुख्यमंत्री

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई  ः नागपूर-मुंबई द्रुतगती समृद्धी महामार्गासाठीच्या पर्यावरण आणि वन विभागाच्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या कामाचा लवकरच प्रारंभ करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. ७) सांगितले.   

सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या विविध बॅंकांच्या व्यवस्थापक-प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मदन येरावार उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले, की समृद्धी महामार्गासाठीचे भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. हा महामार्ग महाराष्ट्राला २० वर्ष पुढे घेऊन जाणारा आहे. त्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था बळकट होऊन अनेक उद्योग धंद्यांना चालना मिळणार आहे. महामार्गावरील कृषी समृद्धी केंद्रामुळे शेतीचा आणि परिसराचा विकास होऊन रोजगार निर्माण होईल. हा महामार्ग जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला जोडला जाणार असल्याने आंतरराष्ट्रीय आयात-निर्यातीला गतिमानता येऊन व्यापार-उद्योग वाढीस लागतील. शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारांना समृद्ध करून राज्याचे आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन घडवणारा महामार्ग असेल.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार यांनी समृद्धी महामार्गाच्या पूर्वतयारीचे सादरीकरण केले. ते म्हणाले की, समृद्धी महामार्गाची लांबी ७१० किलोमीटर असून हा महामार्ग दहा जिल्ह्यांतून जाईल. महामार्गाशी ३० तालुके आणि ३५४ गावे जोडली जातील. या मार्गावर २४ कृषी समृद्धी केंद्रे असतील. तेथे कारखाने, दुकाने, वर्कशॉप असतील. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. अजिंठा, वेरुळ, लोणार ही पर्यटनस्थळे आणि शिर्डी, शेगाव या तीर्थक्षेत्रांशी महामार्ग जोडला जाईल. तसेच दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टा आणि जालना-वर्धा येथील ड्रायपोर्ट हे जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टशी जोडले जाणार आहे. महामार्गाच्या कामासाठी १३ कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.  बॅंकेच्या प्रतिनिधींनी चर्चेत सहभाग घेतला.

बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, प्रधान सचिव भूषण गगराणी, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बॅंक, कॅनरा बॅंक, बॅंक ऑफ महाराष्ट्र, बॅंक ऑफ बडोदा, देना बॅंक, आंध्रा बॅंक, इंडियन बॅंक, ॲक्‍सीस बॅंक, येस बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफसी बॅंक, कार्पोरेशन बॅंक तसेच एलआयसी, हडको, आयआयएफसीएलचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com