खरीप हंगामपूर्व कार्यशाळेत शेतीशाळेवर भर

खरीप हंगामपूर्व कार्यशाळेत शेतीशाळेवर भर
खरीप हंगामपूर्व कार्यशाळेत शेतीशाळेवर भर

औरंगाबाद : जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्ण कार्यशाळेत शुक्रवारी (ता. २६) येत्या १५ मेपासून राबविल्या जाणऱ्या शेतीशाळेवर फोकस करण्यात आला. विभागीय स्तरावरील कार्यशाळेनंतर कृषी विभागाच्या वतीने आता जिल्हा पातळीवर खरीप हंगामपूर्व कार्यशाळेच्या माध्यमातून यंत्रणेला  ''शेतीतील आव्हाने आणि आपली जबाबदारी '' याविषयी सजग करण्याचे काम केले जात आहे. 

औरंगाबादमधील भानुदास चव्हाण सभागृहात शुक्रवारी (ता. २६) आयोजित खरीप हंगामपूर्व कार्यशाळेला विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील अधीक्षक कृषी अधिकारी साहेबराव दिवेकर, औरंगाबादचे अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. टी. एस. मोटे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार, निवृत्त तंत्र अधिकारी डॉ. पी. एस. जोशी, डॉ. दिनेश लोमटे आदींची उपस्थिती होती. 

कापूस, तूर, हरभरा व्यवस्थापन, दुष्काळात फळबागा जगविण्यासाठी उपाययोजना, कापूस लागवड तंत्रज्ञान, शेतीशाळा आयोजन, मका पिकावरील लष्करी अळीचे व्यवस्थापन, मका लागवड तंत्रज्ञान, सोयाबीन, हरभरा, ऊस पीक व्यवस्थापन, गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन आदी विषयांवर तज्‍ज्ञांनी मार्गदर्शन केले.  दिवेकर म्हणाले, ''सोमवारी (ता. २९) निवडक लोकांना रामेतीच्या माध्यमातून प्रशिक्षणही दिले जाणार आहे. प्रोक्रा व्यतिरिक्‍त होणाऱ्या शेतीशाळांविषयी प्रत्येक कर्मचाऱ्याने दक्ष राहण्याची गरज आहे. कृषीविषयक शिफारशींचा जमीन आरोग्यपत्रिकेनुसार वापर होतो की नाही हे सजग राहून पाहावे लागेल.''

डॉ. मोटे म्हणाले, ''भात वगळता सर्वच पिकांच्या शेतीशाळा आयोजित कराव्या लागणार आहेत. मशागतीपासून काढणी पश्‍चात तंत्रज्ञानापर्यंत घेतल्या जाणाऱ्या निर्धारित शेतीशाळाविषयी सजग न राहणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला जाईल.'' शेती शाळा घेण्यामागे पिकांची वेळोवेळी निरीक्षणे घेणे, निव्वळ नफा वाढविणे, निरोगी सशक्‍त पीक जोपासणे, शेतकऱ्यांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेत वाढ करून त्यांना तज्‍ज्ञ बनविणे आदी उद्देश ठेवण्यात आल्याचे डॉ. जोशी म्हणाले. उपविभागीय कृषी अधिकारी पी. आर. देशमुख यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com