जागतिक कापूस उत्पादन घटणार; वस्त्रोद्योगासमोर शिलकी कापसाची समस्या

जागतिक कापूस उत्पादन नव्या म्हणजेच २०२०-२१ च्या हंगामात मागील हंगामाच्या तुलनेत सुमारे दोन दशलक्ष टनांनी कमी होणार आहे. यातच जगभरात शिलकी कापसाचा साठा सुमारे २२ दशलक्ष टन एवढा अपेक्षित आहे.
जागतिक कापूस उत्पादन घटणार; वस्त्रोद्योगासमोर शिलकी कापसाची समस्या
जागतिक कापूस उत्पादन घटणार; वस्त्रोद्योगासमोर शिलकी कापसाची समस्या

जळगाव ः जागतिक कापूस उत्पादन नव्या म्हणजेच २०२०-२१ च्या हंगामात मागील हंगामाच्या तुलनेत सुमारे दोन दशलक्ष टनांनी कमी होणार आहे. यातच जगभरात शिलकी कापसाचा साठा सुमारे २२ दशलक्ष टन एवढा अपेक्षित आहे. या साठ्याची समस्या जगातील वस्त्रोद्योगासमोर असली तरी यंदा सुरुवातीला कापूस बाजारात स्थैर्य अपेक्षित आहे. गेल्या दोन हंगामांच्या तुलनेत यंदा जगात कापूस उत्पादन कमी होईल. ते सुमारे २५.०५ दशलक्ष मेट्रिक टन एवढे अपेक्षित आहे. गेल्या हंगामात (२०१९-२०) २६.७० दशलक्ष मेट्रिक टन कापूस उत्पादन झाले आहे. २०१८-१९ मध्ये जगभरात कापूस उत्पादन २५.५ दशलक्ष मेट्रिक टन होते. आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समिती, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया, नॉर्थ इंडिया कॉटन असोसिएशनने जगात यंदा कापूस उत्पादनात घट होईल, असे म्हटले आहे. चीनमधील जिझियांग व कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या अन्य भागांत अतिपावसाचा फटका बसला आहे. तेथे ऑगस्ट अखेरीस वेचणी अपेक्षित होती. परंतु, वेचणी दरम्यान तेथेही पावसाने थैमान घातले. जगात कापूस उत्पादनात क्रमांक दोनवर असलेल्या चीनमध्ये २०१९-२० च्या हंगामात ६ दशलक्ष मेट्रिक टन कापूस उत्पादन आले. यंदा हे उत्पादन घटून ५.६० दशलक्ष मेट्रिक टन राहू शकते. नैसर्गिक आपत्ती कायम राहिली तर त्यात आणखी घसरण होईल. कापूस उत्पादनात जगात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेतही कापूस उत्पादनात मोठी घट मानली जात आहे. तेथे गेल्या हंगामात ४.३० दशलक्ष मेट्रिक टन कापूस उत्पादन झाले. या हंगामात हे उत्पादन तब्बल एक दशलक्ष टनांनी घसरून ३.३० दशलक्ष टनांवर राहू शकते. तेथेही कापूस उत्पादनात आघाडीवर असलेल्या टेक्सास व इतर भागाला वादळ आणि इतर नैसर्गिक समस्यांचा सामना जून महिन्यात करावा लागला आहे. अमेरिकेतही कापसाची वेचणी ऑगस्टच्या अखेरीस अपेक्षित होती. तेथेही हंगामाला फटका बसल्याने वेचणी व इतर बाबी लांबल्या आहेत.

भारतात कापूस उत्पादन वाढणार भारतात कापूस लागवड गेल्या हंगामाच्या तुलनेत सुमारे साडेतीन लाख हेक्टरने वाढून ती १२८.५० लाख हेक्टरवर झाली आहे. भारत यंदा जगात सर्वाधिक कापूस उत्पादन करणार आहे. त्यातच गेल्या हंगामाऐवढेच म्हणजेच ६.२० दशलक्ष मेट्रिक टन कापूस उत्पादन भारतात अपेक्षित आहे. भारतात कापूस उत्पादन अधिक येईल, असा अंदाज तूर्त व्यक्त केला जात असला तरी अतिपावसात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर भारतातील पूर्वहंगामी कापसाला मोठा फटका बसला आहे. यामुळे कापूस उत्पादनात काहीशी घटही येईल, असेही सांगितले जात आहे.

जानेवारीनंतर कापूस वापर वाढू शकतो जगात नवा कापूस हंगाम ऑक्टोबर २०२० पासून सुरू होत आहे. परंतु, नव्या हंगामाच्या सुरवातीलादेखील जगात कोरोना व इतर संकटे वस्त्रोद्योगासमोर कायम राहू शकतील, असे दिसत आहे. परंतु, लॉकडाउनसंबंधीचे अनेक निर्णय जगात वस्त्रोद्योगासाठी शिथिल होत आहेत. चीन, भारत, व्हिएतनाम, बांगलादेश, तुर्की या वस्त्रोद्योगात आघाडीवर असलेल्या देशांमध्ये जानेवारीमध्ये कापसाला मागणी, वापर वाढू शकतो, असाही अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत. जगात गेल्या हंगामात (ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२०) कापसाचा वापर २२.७० दशलक्ष मेट्रिक टन राहण्याची शक्यता आहे. २०२०-२१ च्या हंगामात हा वापर २४.३४ दशलक्ष मेट्रिक टन एवढा राहील असा अंदाज आहे. अर्थातच जगात जेवढे कापूस उत्पादन यंदा येईल त्यातील कमाल कापसाचा वापर होईल.

प्रतिक्रिया... जगात कापसाचा वापर नव्या हंगामात सुरुवातीला कमी होईल. परंतु, नव्या वर्षात म्हणजेच २०२१ मध्ये कोरोना व इतर समस्यांबाबतची स्थिती सुधारली तर कापसाचा वापर झपाट्याने होईल. भारतात कापसाचा हमीभाव ५८२५ रुपये क्विंटलपर्यंत आहे. शासकीय संस्था कापूस खरेदीची तयारी करू लागल्या आहेत. अमेरिका व चीनमध्ये कापूस उत्पादन घटणार आहे. यामुळे सुरुवातीला बाजारात स्थैर्य असेल. पण देशात खुल्या बाजारात हमीभाव मिळतील की नाही, याबाबत साशंकता आहे. - दीपक पाटील, अध्यक्ष, लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी, उंटावद-होळ, जि.नंदुरबार.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com