रांगड्या कुस्तीतून संस्कार अन् शिस्तही.. (व्हीडिअो सुद्धा पहा)

कुस्ती हा कोल्हापूरचा प्राण. या तालमीत महाराष्ट्रासह देशभरातील सुमारे सातशे युवक पहिलवानकीचे धडे गिरवत आहेत. पहाटे पाच वाजल्यापासून घामाने डबडबलेल्या शरीराने होणारा सराव जसा त्यांचे कष्ट दाखवतो.
कुस्ती हा कोल्हापूरचा प्राण. या तालमीत महाराष्ट्रासह देशभरातील सुमारे सातशे युवक पहिलवानकीचे धडे गिरवत आहेत. पहाटे पाच वाजल्यापासून घामाने डबडबलेल्या शरीराने होणारा सराव जसा त्यांचे कष्ट दाखवतो.

कोल्हापूर : ते येतात, डाव-प्रतिडाव शिकतात. राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय पातळीवरही नाव कमावतात. पण सर्वात महत्त्वाचा आयुष्याचा ठेवा ते कमवून जातात ती म्हणजे शिस्त. कुस्तीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कोल्हापुरात कुस्ती या क्रीडाप्रकारात यशस्वी होण्यासाठी जशी तरुणांची तालमींमध्ये गर्दी होत आहे, त्याचबरोबर योग्य संस्कार मिळविण्यासाठीही शालेय मुलांचे तालमीत होणारे प्रवेश ही अलीकडच्या काळातील सुखावह बाब म्हणून समोर येत आहे.

कुस्ती हा कोल्हापूरचा प्राण. न्यू मोतीबाग, मोतीबाग, गंगावेश, शाहूपुरी या तालमी म्हणजे पहिलवान घडविणाऱ्या कुस्तीशाळाच. या तालमीत महाराष्ट्रासह देशभरातील सुमारे सातशे युवक पहिलवानकीचे धडे गिरवत आहेत. पहाटे पाच वाजल्यापासून घामाने डबडबलेल्या शरीराने होणारा सराव जसा त्यांचे कष्ट दाखवतो.

या सरावाबरोबरच तालमींनी लावलेली शिस्तही तेवढीच चर्चेची ठरते. डाव-प्रतिडाव, ताकदीचा वापर, बुद्धीचा वापर, चपळाई, कुस्ती खेळतानाचा माइंड गेम आदी बाबींवर या तालमीचे मार्गदर्शक अव्याहतपणे पहिलवानांना घडविण्याचे काम करीत असतात. पण जेवढा या पहिलवानांच्या शारीरिक जडणघडणीवर लक्ष ठेवले जाते. तेवढेच लक्ष प्रत्येक पहिलवानाच्या बाह्य हालचालीवरही ठेवले जाते. कुस्ती हा कोल्हापूरचा प्राण.... (video B D Chechar)

सराव झाल्यानंतर संबधित पहिलवान काय करतो, काय नाही. याबाबत अलीकडच्या काळात मार्गदर्शक चिकित्सकपणे लक्ष देत असल्याने पहिलवानकीबरोबर स्वावलंबनाची शिस्तही तरुणांमध्ये येत आहे. कुस्तीचा बेस म्हणून मातीचा सराव तर आंतराष्ट्रीय पातळीवर चमकायचे असेल तर मॅटचा सराव आवश्‍यक. यामुळे या दोन्ही प्रकारच्या कुस्त्यांवर येथे कष्ट घेतले जातात. मोतीबाग तालमीसारख्या तालमी येत्या काही वर्षात दोनशे वर्ष पूर्ण करीत आहेत.

ही कीर्ती आंतरराष्ट्रीय स्तरावरही पोचली आहे. ज्या ज्यावेळी परदेशी खेळाडू, नागरिक या तालमींना भेट देतात त्यावेळी कुस्त्यांबरोबर पहिलवानात बिंबवणारी शिस्त त्यांना आकर्षित करते. स्वत:चे कपडे स्वत: धुणे, स्वत: स्वयंपाक करणे, जे चांगले अन्न आहे तेच खाणे, जसे असेल त्या सुविधांत ॲडजस्ट होणे  हे संस्कार लहानपणापासूनच उगवत्या कुस्तीगिरांवर बिंबवले जातात.

यामुळे पहिलवान स्वावलंबी होतात. हे धडे त्यांच्या आयुष्यात उपयोगी ठरतात. आईबाबांच्या छत्रछायेपासून कुस्तीत नाव, शरीर कमविण्यासाठी येथे आलेला युवा पहिलवान संस्कारही कमवून जातो. कुस्तीत कारकीर्द करो अथवा न करो पण उत्तम आरोग्य आणि चांगले संस्कार द्या, आम्ही पोराला तालमीत घालतो अशी होणारी विनंती अलीकडच्या काळात तालीम संस्कृती बळकट होत असल्याचे द्योतक आहे. कुस्तीच्या धड्यांबरोबर संस्काराचे धडेही तालमीतून गिरवले जात असल्याने कुस्ती बहुआयामी बनत आहे.

प्रतिकूल परिस्थितीत तालमीत होणारे संस्कार हे कुस्तीच्या कलेबरोबर आयुष्यात शिस्त येण्यासाठीही महत्त्वाचे ठरत आहेत. यामुळे गेल्या काही वर्षांपासून मुलाला लवकरात लवकर तालमीत घालण्यासाठी ग्रामीण भागातून पालक आग्रही राहात आहेत. आधुनिक व्यायामशाळा स्थानिक ठिकाणी तयार झाल्या. पण तिथे केवळ शारीरिक बळकटतेचे शिक्षण दिले जाते. परंतु आमच्या तालमीत मात्र संस्कारालाही तितके महत्त्व दिले जाते. या बाबी नव्याने लोकांना आकर्षित करीत आहेत. - कृष्णात पाटील, कुस्ती मार्गदर्शक (एन.आय.एस.), मोतीबाग तालीम, कोल्हापूर

आम्ही स्पर्धेच्या निमित्ताने देशभर फिरतो. पण अनेक पंजाब, हरियानाचे पहिलवानही कोल्हापुरात प्रशिक्षण घेण्यास उत्सुक असतात. कुस्तीशिवाय येथे मिळणारे संस्कार हे देशभरातही चर्चेचे ठरत आहेत. कुस्तीसारख्या नैपुण्याबरोबर संस्कारक्षम तालमी या भविष्यात तरुण पिढीला नक्कीच या खेळाकडे ओढणाऱ्या ठरतील. - प्रा. बाजीराव पाटील, कोल्हापूर शहर जिल्हा तालीम संघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com