कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्‍यासक्रम बंदचा निर्णय तुघलकी : विखेे

कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्‍यासक्रम बंदचा निर्णय तुघलकी : विखेे
कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्‍यासक्रम बंदचा निर्णय तुघलकी : विखेे

मुंबई : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शासनाला अंधारात ठेवून कृषी तंत्रज्ञान पदविका हा तीन वर्षांचा अभ्‍यासक्रम बंद करण्‍याचा घेतलेला निर्णय तुघलकी आहे. तो तातडीने रद्द करून कुलगुरूंविरुद्ध कारवाई करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. विखे पाटील यांनी यासंदर्भात कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना पत्र लिहिले असून, त्यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, कृषी तंत्रज्ञान पदविका हा ३ वर्षांचा अभ्‍यासक्रम बंद करण्‍याबाबत शासन स्‍तरावर कोणताही निर्णय झाला नसताना राहुरी विद्यापीठाने सर्व नियम, कायदे आणि मार्गदर्शक सूचना डावलून २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून हा अभ्‍यासक्रम बंद करण्‍याचा निर्णय घेतला आहे. शासनाला अभ्‍यासक्रमात बदल करण्‍याचे अधिकार आहेत. परंतु, राहुरी विद्यापीठाने संबंधितांना विश्वासात न घेता परस्पर हा निर्णय घेतल्याचेही विखे पाटील यांनी म्हटले आहे. २०१२ मध्ये कुलगुरूंच्‍या संमतीने अतिशय विचारपूर्वक ३ वर्ष कालावधीच्‍या अभ्‍यासक्रमाचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता व त्यास कुलपतींनी मान्‍यताही दिली होती. या अभ्‍यासक्रमामुळे ग्रामीण भागातील कृषी शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा फायदा झाला. मात्र राहुरीच्या महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाने कुलपती व शासनाला अंधारात ठेवून हा ३ वर्षांचा अभ्‍यासक्रम बंद करण्‍याचा निर्णय घेतल्याने ग्रामीण भागाचे नुकसान होणार आहे. शासनाकडून कौशल्य विकासाचे ढोल बडवले जात असताना कृषी क्षेत्रातील कौशल्य विकसित करणारा हा अभ्यासक्रम बंद करून संबंधित कुलगुरूंनी शासनाच्या धोरणाला छेद दिल्याचेही विखे पाटील यांनी म्हटले आहे. केंद्र आणि राज्‍य सरकारकडून कृषी विस्‍ताराच्‍या प्रचार आणि प्रसारासाठी अर्थसंकल्‍पात आर्थिक तरतूद केली जाते. या पार्श्‍वभूमिवर या निधीचा योग्य वापर करून विद्यार्थ्‍यांना बदलत्‍या आधुनिक तंत्रज्ञानाचे कृषी शिक्षण उपलब्‍ध करून देणे ही व्‍यवस्‍थेची जबाबदारी आहे. या अनुषंगाने आघाडी सरकारमध्‍ये कृषिमंत्री असताना आपण या अभ्‍यासक्रमाची मुहूर्तमेढ रोवली होती. मात्र, कृषी तंत्रज्ञानाचा पाया भक्‍कम करण्‍याऐवजी त्‍यासंदर्भातील शिक्षणच बंद करण्‍याचा कृषी विद्यापीठाचा निर्णय शेतीसाठी धोकादायक ठरणार असल्‍याचेही विखे पाटील म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com