मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतिकारक पाऊल आहे.
अॅग्रो विशेष
नाईक सूतगिरणीचा कंटेनर निघाला चीन, हाँगकाँगला
लॉकडाउन काळात पिंपळगाव कान्हा येथील बाबासाहेब नाईक सूतगिरणीची चाके ठप्प झाली. मात्र ‘अनलॉक’ होताच सूत उत्पादनात गिरणीने भरारी घेतली असून गुणवत्तापूर्ण सुताची चीन व हाँगकाँग देशात निर्यात होत आहे.
पुसद, जि. यवतमाळ : लॉकडाउन काळात पिंपळगाव कान्हा येथील बाबासाहेब नाईक सूतगिरणीची चाके ठप्प झाली. मात्र ‘अनलॉक’ होताच सूत उत्पादनात गिरणीने भरारी घेतली असून गुणवत्तापूर्ण सुताची चीन व हाँगकाँग देशात निर्यात होत आहे. सूतगिरणीचे अध्यक्ष राजेश आसेगावकर व सौ. माधुरी आसेगावकर यांनी पूजन करून नुकतेच सुताचे पहिले दोन कंटेनर मुंबई बंदरासाठी रवाना झाले.
बाबासाहेब नाईक सूतगिरणीत उपलब्ध असलेल्या ‘टीएफओ’ या अद्ययावत यंत्रावर तयार करण्यात आलेल्या १६ काउंटच्या दर्जेदार सुतास मंदीच्या काळातही मोठी मागणी आहे. एकूण दहा कंटेनरद्वारा २०० टन सुताची मागणी चीन व हाँगकाँग या देशातून नोंदविण्यात आली. जादा भाव मिळत असल्याने गिरणीने सूत निर्यातीला प्राधान्य दिले व कोरोना काळातही गिरणीने एक पाऊल पुढे टाकले.
संस्थेचे मार्गदर्शक माजी मंत्री मनोहर नाईक, गिरणीचे उपाध्यक्ष ययाती नाईक, संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक एम.आय. पाथरी, कामगार संघटनेचे अध्यक्ष यांच्या सहकार्याने बाबासाहेब नाईक सूतगिरणीचे लॉकडाउन नंतर तीन पाळ्यांत पूर्ण क्षमतेने सूत उत्पादन सुरू आहे. विशेष म्हणजे कामगारांच्या सहभागातून ८९ टक्के उत्पादन क्षमतेचा वापर होत आहे.
मुख्य म्हणजे लॉकडाउन काळात गिरणी बंद असताना सूतगिरणी संचालक मंडळाने कामगारांना ५० टक्के वेतन दिले. यासाठी उपाध्यक्ष ययाती नाईक यांनी पुढाकार घेतला. कामगारांना अडचणीच्या काळात मदत केली. परिणामतः कामगारांच्या सहभागातून सूत उत्पादनात भरीव वाढ झाली. दिवाळी बोनस म्हणून कामगारांना नऊ टक्के एवढे वाढीव बोनस देण्यात येत आहे.
एकीकडे सूतगिरण्या बंद पडत असताना विदर्भातील बाबासाहेब नाईक सूतगिरणीने पूर्ण कार्यक्षमतेने विदर्भात दुसरा क्रमांक मिळविला आहे. गिरणीचा आलेख उंचावण्यासाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी विविध योजनांचा आराखडा तयार केलेला आहे. माजी मंत्री मनोहर नाईक, नगराध्यक्ष अनिता नाईक, उपाध्यक्ष ययाती नाईक, आमदार इंद्रनील नाईक व नाईक परिवाराने सोपविलेली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडण्याचा निर्धार अध्यक्ष राजेश आसेगावकर यांनी व्यक्त केला.
प्रतिक्रिया
केवळ सूत निर्मितीवर निर्भर न राहता पूरक उत्पादनांवर सूतगिरणीचा भर राहणार आहे. यासाठी यवतमाळ जिल्हा सूत व कापड गिरणी पुसद येथे नाईक सूतगिरणीच्या युनिट- २ चा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यावर दोन बैठकी झाल्या असून उच्च तंत्रज्ञानावर आधारित जपान मशीनद्वारे टी-शर्ट, लॅक्रान, हॅन्ड ग्लोज, मास्क निर्मिती करण्यात येईल. याद्वारे चारशे कामगारांना रोजगार मिळेल.
- ययाती नाईक, उपाध्यक्ष, बाबासाहेब नाईक सूतगिरणी
सध्या सूतगिरणीचा विजेचा खर्च जास्त आहे. तो वाचविण्यासाठी २.५ मेगावॅट क्षमतेचा सोलर प्रोजेक्ट प्रस्तावित आहे. तो मंजूर झाल्यास वीज खर्चात मोठी बचत होईल. कोविडच्या काळातील कामगिरी पाहून वस्त्रोद्योग आयुक्त तसेच एनसीडीसी दिल्ली या संस्थेने सूतगिरणीला कर्जाच्या पुनर्रचनेत सबसिडी दिली आहे. सुताला विदेशातून मागणी येत आहे. सूतगिरणीच्या दर्जेदार सुताला मिळालेली ही पावती आहे.
- राजेश आसेगावकर, अध्यक्ष, बाबासाहेब नाईक सूतगिरणी
- 1 of 653
- ››