देशाच्या सूत निर्यातीत मोठी घट 

कोरोना व इतर संकटांमध्ये देशातील सूत निर्यात रखडत सुरू आहे. यातच यंदाची सूत निर्यात नीचांकी ९०० ते ९५० टनांपर्यंत राहू शकते, असा अंदाज आहे.
yarn export
yarn export

जळगाव ः कोरोना व इतर संकटांमध्ये देशातील सूत निर्यात रखडत सुरू आहे. यातच यंदाची सूत निर्यात नीचांकी ९०० ते ९५० टनांपर्यंत राहू शकते, असा अंदाज आहे. 

फेब्रुवारी २०२० नंतर देशातून सूत निर्यात घसरली आहे. या कापूस हंगामात (ऑक्‍टोबर २०२०) फेब्रुवारीतच सर्वाधिक १०३ टन सुताची निर्यात विविध देशांमध्ये झाली आहे. कोरोनाचे संकट डिसेंबरपासूनच चीनमध्ये आले होते. जानेवारीनंतर चीनमधून सुताची मागणी कमी झाली. परंतु बांगलादेश, व्हीएतनाम, तुर्की येथे सुताची निर्यात सुरू होती. मार्चमध्ये कोरोनाचे संकट जसे वाढले, तसा निर्यातीवर मोठा परिणाम झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. 

कापूस बाजार यंदा सुरुवातीला व्यवस्थित सुरू होता. परंतु, फेब्रुवारीपासून बाजार अस्थिर झाला. कापसाच्या दरात जशी मोठी घसरण झाली, तशीच घसरण देशातील सुताच्या दरातही झाली. कमी दर्जाच्या सुताचे दर नोव्हेंबर २०१९ पासून ते जानेवारी २०२० च्या सुरुवातीपर्यंत १८० रुपये प्रतिकिलोपर्यंत होते. तर दर्जेदार (४० काउंट) सुताचे दर २१० रुपये प्रतिकिलोपेक्षा अधिक होते. कोरोनामुळे निर्यात ठप्प झाली. देशातील कापड उद्योग, सूतगिरण्यांचे काम बंद झाले आणि सुताच्या दरात पडझड सुरू झाली. एप्रिल २०२० व मे २०२० दरम्यान दर्जेदार सुताचे दर १६० रुपये प्रतिकिलोपर्यंत होते. अलीकडे जगभरातील वस्त्रोद्योग सुरू झाल्यानंतर दरात सुधारणा झाली असून, दर १६५ ते १७० रुपये प्रतिकिलोपर्यंत झाले आहेत.  देशात यंदाही पाच हजार ते सव्वापाच हजार कोटी किलोग्रॅम सूत उत्पादनाचा अंदाज आहे. पैकी २० टक्के सुताची निर्यात होईल, अशी अपेक्षा हंगामाच्या सुरुवातीला होती. सूत उत्पादनात भारत जगात क्रमांक दोनवर आहे. सुताची निर्यात चीन, बांगलादेश, व्हिएतनाम आणि तुर्कीमध्ये अधिक होईल, असा अंदाज होता. भारतातून सुताची जेवढी निर्यात होते, त्यातील ८० टक्के सुताचा खरेदीदार चीन आहे. सूत निर्यातीत भारत आघाडीचा देश आहे. देशातून निर्यात होणाऱ्या सुताच्या माध्यमातून जे परकी चलन मिळते, त्याचा वाटाही मोठा आहे. परंतु सूत निर्यातीला कोरोना व बाजारातील प्रतिकूल स्थितीचा फटका बसला असून, देशातून ऑगस्ट २०१९ ते मार्च २०२० यादरम्यान ६६० टन सुताची निर्यात झाली आहे. ही निर्यात या महिनाअखेरपर्यंत ९०० ते ९५० मेट्रिक टनांपर्यंत पोचू शकते, असा दावा बाजारपेठ विश्‍लेषक करीत आहेत.  सरकीची आवकही वाढली  देशातील बाजारांमध्ये सरकीची आवक वाढली आहे. मागील वर्षी जून २०१९ मध्ये १८ हजार ५७ टन सरकीची आवक झाली होती. यंदा जून २०२० मध्ये ही आवक ५० हजार ३०५ टनांवर पोचली आहे. सरकीचे दर यंदा स्थिर राहिले. परंतु, या महिन्यात दरात क्विटंलमागे २०० रुपयांनी घसरण झाली असून, राज्यात हे दर २४०० रुपये प्रतिक्विटंलपर्यंत आहेत.  सूत निर्यातीचा आलेख (टनांमध्ये) 

वर्ष निर्यात 
२०१४-१५ १३२१ 
२०१५-१६ १२३७ 
२०१६-१७ १०५५ 
२०१७-१८ १२३६ 
२०१८-१९ १०८० 

२०१९-२० मधील सूत निर्यात (टनांमध्ये) 

महिना निर्यात 
ऑगस्ट ६७ 
सप्टेंबर ६६ 
ऑक्‍टोबर ७८ 
नोव्हेंबर ८९ 
डिसेंबर ९१ 
जानेवारी १०३ 
फेब्रुवारी ९१ 
मार्च ७५ 

प्रतिक्रिया... सुताची निर्यात २०१७-१८ मध्ये चांगली झाली. नंतर निर्यातीला फटका बसला आहे. यंदा सूत निर्यात नीचांकी स्तरावर असणार आहे. कारण, जगभरात कोरोनाचे संकट व पणन व्यवस्थेमध्ये अडथळे आले आहेत.   ​ - दीपक पाटील, अध्यक्ष, लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी, उंटावद - होळ (जि. नंदुरबार)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com