यंदा कापूस तेजीतच राहणार

महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात सप्टेंबर महिन्यात झालेला पाऊस तसेच अनेक राज्यांत गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने देशात यंदा कापूस उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.
यंदा कापूस तेजीतच राहणार This year, cotton will continue to rise
यंदा कापूस तेजीतच राहणार This year, cotton will continue to rise

पुणे : महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात सप्टेंबर महिन्यात झालेला पाऊस तसेच अनेक राज्यांत गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने देशात यंदा कापूस उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. तसेच जागतिक पातळीवर कापसाची मागणी वाढणार असल्याने दरही तेजीत राहतील, असे जुनागड कृषी विद्यापीठाने कापूस दर अंदाज अहवालात स्पष्ट केले आहे.  जागतिक व्यापार संघटनेच्या डिपार्टमेंट ऑफ अॅग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स सेलने जाहीर केलेल्या या अहवालात म्हटले आहे, देशात कापूस उत्पादन घटणार आहे. देशात गेल्या वर्षी १३१ लाख हेक्टरवर कापूस लागड होती. यंदा कापूस पट्ट्यात पावसाचा खंड, कमी पाऊस आदी कारणांमुळे लागवड क्षेत्र १२४ लाख हेक्टरवर आले. त्यामुळे कापूस लागवडीत ७ लाख हेक्टरने घट झाली. त्यातच सप्टेंबर महिन्यात पाऊस झाल्याने कापूस उत्पादनात घट येईल, असे अहवालात नमूद आहे. गुजरातमध्ये यंदा कापूस उत्पादन स्थिर राहील, असे अहवालात म्हटले आहे. गुजरामध्ये गेल्या वर्षी एवढेच, म्हणजेच २२.५६ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली असून, ८०.९५ लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज सरकारने व्यक्त केला. गेल्या हंगामात ७२.७ लाख गाठी उत्पादन होते. त्यात यंदा ८ लाख गाठींची वाढ सरकारला अपेक्षित आहे. परंतु सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले, सोबतच कापसाच्या पहिल्या वेचणीलाही उशीर झाला. त्यामुळे गुजरातमध्ये यंदा कापूस उत्पादन मागील वर्षी एवढेच राहण्याची शक्यता आहे. देशातील कापसाच्या दराबाबत जुनागड कृषी विद्यापीठाने म्हटले आहे, यंदा सरकारने लांब धाग्याच्या कापसासाठी ६ हजार २५ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. मात्र जागितक कापूस वाढल्याने दराला असलेला आधार आणि देशात कापूस उत्पादन घटणार असल्याने दर हमीभावापेक्षा जास्तच राहतील. त्यातही कापूस निर्यातीच्या संधी वाढल्या आणि जागतिक कापूस वापर असाच चांगला राहिला तर पुढील काळात दर आणखी वाढतील. जागतिक बाजारातही कापूस सुधारेल यूएसडीएचा दाखला देत अहवालात २०२१-२२ च्या कापूस हंगामात जागतिक उत्पादन १ हजार ५३१ लाख गाठींवर पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेल्या हंगामात १ हजार ४३९ लाख गाठी उत्पादन झाले होते. पण यंदा कापूस वापर वाढण्याची अपेक्षा आहे. यंदा १ हजार ५८८ लाख गाठी कापसाचा जागतिक पातळीवर वापर होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा वापर ५७ लाख गाठींनी अधिक असेल. त्यामुळे जागितक कापूस किमत अधिक राहतील, असे म्हटले आहे.

प्रतिक्रिया मागील वर्षी देशातील कापूस उत्पादन ३५४ लाख गाठींवर स्थिरावले होते. सरकारने २०२१-२२ च्या पहिल्या अंदाजात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ अपेक्षित धरून ३६२ लाख गाठी कापूस उत्पादनाची शक्यता वर्तविली आहे. मात्र महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात पावसाने दणका दिल्याने कापसामध्ये बोंडसड, पाते आणि फूल गळ तसेच जास्त दिवस पाण्यात राहिल्याने पिकही सडण्याचे प्रकार घडले. सोबतच गुलाबी बोंड अळीचाही उद्रेक होत आहे. त्यामुळे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत कापूस उत्पादन घटेल. -मगनलाल धांधल्या, सहयोगी संशोधन संचालक,  डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चरल इकॉनॉमिक्स

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com