यंदा हिवाळा सुरू होण्यापूर्वी उन्हाळा आला

डी.एड.पर्यंत शिक्षण झाले आहे. जागाच निघाल्यात नाहीत. नोकरी मिळेना म्हणून घरची शेती करत आहे. १५ एकर पैकी १० एकरवर ठिबक केले. बोअरच्या पाण्यावर फुलकोबी लावली पण आता पाणी नसल्यामुळे ती मोडून टाकावी लागली. सोयाबीन, कापूस वाळून गेला आहे. दुष्काळाचे हे चौथे वर्ष आहे. - सुनील चिमणपाडे, कुडली, ता. देगलूर, जि. नांदेड
यंदा हिवाळा सुरू होण्यापूर्वी उन्हाळा आला
यंदा हिवाळा सुरू होण्यापूर्वी उन्हाळा आला

नांदेड ः यंदा चांगला पाऊस होईल असं टीव्हीवर सांगितलं जात होतं. तव्हा बरं वाटलं होतं. पण हवामान खात्यानं सांगितलेला अंदाज उलटा ठरला. आमच्या भागात गेल्या चार वरसारखीच यंदाबी परिस्थिती झाली आहे. यंदा तर दुबार पेरणी करावी लागली. पण पाऊस न आल्यामुळे काहीच हाती लागलं नाही. मागचंच वरीस बरं होत असं म्हणावं लागतंय. अशा उन्हाळ्यामध्ये कशाचा दसरा अन् कशाची दिवाळी आलीय. येत्या पावसाळ्यापर्यंतचे आठ नऊ महिने जगणं अवघड झालं आहे साहेब, अशा शब्दांत हणेगाव (ता. देगलूर) मंडलातील कुडली परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.  नांदेड जिल्ह्यातील हणेगाव (ता. देगलूर) महसूल मंडलाची सीमा कर्नाटक राज्यातील बिदर या दुष्काळी जिल्ह्याला लागून आहे. जिल्ह्यात सर्वांत कमी पाऊस म्हणजेच अपेक्षित पावसाच्या २५.६ टक्के (२२६ मिमी) पाऊस या मंडलामध्ये झाला.

झळा दुष्काळाच्या : अॅग्रोवनची 'अॉन द स्पॉट' मालिका : जिल्हा नांदेड ( video) कोरडवाहू बहुल क्षेत्र असलेल्या मंडळातील बहुतांश गावातील शेतकऱ्यांची सर्व दारोमदार खरिपातील सोयाबीन, कापूस, तूर या नगदी पिकांवरच असते. पण यंदा अल्प पावसामुळे या मंडलातील हणेगाव, कुडली, शिळवणी, कुमारपल्ली, लोणी, तुंबरपल्ली, वझर, येडूर, रमतापूर, कासरवाडी, बिजलवाडी, खुदमापूर, मातूर, बेबर, कोकलगाव, चव्हाणवाडी तांडा, सोमुर, भुत्तनहिप्परगा, अंबुलगा, सोमुर आदी गावशिवारांत दुष्काळाची दाहकता अधिकच गंभीर दिसत आहे. खरीप हंगाम पुरता वाया गेला आहे. विहिरी, बोअर, तलाव आटले आहेत. अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई सुरू झाली आहे. ओलावा नष्ट झाल्यामुळे जमिनीला लवकरच भेगा पडल्या हिवाळा सुरू होण्याआधीच उन्हाळा लागला की काय, अशी परिस्थिती दिसत आहे. वीज जोडणीसाठी प्रतीक्षाच कुडली गावातील ज्येष्ठ महिला शेतकरी भारतबाई हुगे यांच्या कुटुंबाची नऊ एकर जमीन आहे. विहीर आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांनी वीज कंपनीकडे कृषिपंपाच्या वीजपुरवठ्यासाठी क्वोटेशनची रक्कम भरली, परंतु त्यांच्या शेतामध्ये अद्याप विजेचे खांबदेखील उभे केलेले नाहीत. वीजपुरवठा तर दूरच तरीही गतवर्षी त्यांना कृषिपंपाचे ५० हजार रुपये वीजबिल आले. बिलाची रक्कम भरण्यासाठी त्यांना म्हैस विकावी लागली. एखाद्या वर्षी विहिरीला पाणी आले की इंजिन लावून पिकांना पाणी द्यावे लागते.  पूरक व्यवसायासाठी बॅंका कर्ज देईनात कुडली येथील शिक्षित तरुण नोकरी मिळत नाही म्हणून पारंपरिक शेती व्यवसाय करू लागले आहेत. परंतु निर्सगासोबत शासकीय यंत्रणाही साथ देत नाही. गाव दत्तक नसल्याचे कारण सांगत बॅंका कर्ज देण्यास तयार नाहीत. नव्या उमेदीने शेती व्यवसाय करू लागलेल्या तरुण शेतकऱ्यांना पर्यायी उत्पन्नाचा स्रोत म्हणून शेतीपूरक कुक्कुटपालन, दुग्ध व्यसाय आदी जोडधंदे करण्याची इच्छा आहे, पण भांडवल नसल्यामुळे या शेतकऱ्यांचा हिरमोड होत आहे. मजूर न मिळाल्यामुळे नुकसान शेतकरी रघुनाथ पाटील म्हणाले, की दुबार पेरणी केली. सोयाबीन काढणीस आले, पण मजूर शेतात यायला तयार नाहीत. त्यामुळे शेंगा शेतामधीच फुटून गेल्या खूप नुकसान झाले. हणेगाव येथील शादुल्ला बागवान यांनी कुडली येथील एका शेतकऱ्याची सात एकर शेती कंत्राटी पद्धती करून भाजीपाला लागवड केली. पाणी कमी पडल्यामुळे सर्व मोडून टाकावे लागले. दुष्काळामुळे हतबल झालेल्या शादुल्ला मुलीच्या लग्नाची चिंता लागली आहे. सर्वांसमक्ष  व्यथा सांगताना त्यांना रडू आवरले नाही. रब्बीचा पेरा अशक्य दुष्काळाचा ट्रिगर २ लागू झाल्यामुळे हणेगाव मंडळातील रॅन्डम पद्धतीने निवडेल्या गावात येडूर सजाचे तलाठी पी. एम. भोरे, कृषी सहायक डी. पी. कबाडे, कुडलीचे कृषी सहायक जी. एस. सुनेवाड शेतामध्ये क्षेत्रीय पीक परिस्थितीची पाहणी (ग्राउंड ट्रूथिंग) करत होते. ते सर्वजण म्हणाले, की हणेगाव मंडळ तसेच परिसरातील १६ ते २० गावांमध्ये यंदा खरिपातील मूग, तूर, कापूस या पिकांपैकी फक्त सोयाबीनच पीक काही प्रमाणात हाती लागलं. जमिनीत ओलावा राहिला नसल्यामुळे रब्बीची पेरणी होऊ शकणार नसल्याने मोठे क्षेत्र नापेर राहणार आहे. सोळा मंडलांमध्ये २५ ते ६० टक्के पाऊस नांदेड जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी पावसाची २० टक्के तूट आली आहे. एकूण ८० पैकी हणेगाव, मरखेल, मालेगाव, खानापूर, देगलूर, सगरोळी, बाऱ्हाळी, इस्लापूर, शिवणी, बिलोली, कुंडलवाडी, आदमापूर, येवती, जलधारा, जारिकोट, नरसी या सोळा मंडलांमध्ये २५ ते ६० टक्के पाऊस झाला आहे. हणेगाव लघू तलाव आटला आहे. त्यामुळे परिसरातील अनेक गावांतील विहिरी, बोअरचे पाणी कमी झाले. अनेक गावांत पाणी विक्री सुरू आहे.  दुष्काळाच्या ट्रिगर १ मध्ये देगलूर, बिलोली, नायगाव, मुखेड, उमरी या पाच तालुक्यांचा समावेश होता. परंतु ट्रिगर २ मध्ये बिलोली, नायगाव तालुक्यांना वगळण्यात आले. ट्रिगर २ मधील देगलूर, मुखेड, उमरी या तीन तालुक्यांत दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.  प्रतिक्रिया पाच एकरांत चार क्विंटल सोयाबीन झाले. मजुरांनी तगादा लावल्यामुळे हणेगाव येथील व्यापाऱ्याला २ हजार ६०० रुपये दराने विकून ९ हजार २७४ रुपये मिळाले. काढणीची ९ हजार रुपये मजुरी देऊन केवळ ७४ रुपये हातात शिल्लक राहिले. पदरमोड करुन हरभरा, ज्वारीची पेरणी केली, पण पीक उगवताना मरून जात आहे. - अरुण जाधव, कुडली, देगलूर, जि. नांदेड

यंदा हिरीला पाणी नाही. आठ एकरातील कापसाला दोन चार बोंड लागलीत. एक वेचणी झाली, की उपट्याला येणार आहे. घरचं शेत पीक न झालंय म्हणून दुसरीकडं मजुरीनं जावं लागतंया. कशाचा दसरा अन् कशाची दिवाळी आलीय. - भारतबाई हुगे, कुडली, ता. देगलूर, जि. नांदेड

बीसीएपर्यंत शिक्षण झाले आहे. दहा एकर शेती, विहीर, बोअर आहे. पण दोन वर्षे झालं पाणीच नाही. कुक्कुटपालन सुरू करायचे, पण त्यासाठी भांडवल उभारण्यासाठी कर्ज आवश्यक आहे. पण बॅंक कर्ज द्यायला तयार नाही. - संदीप बिरादार, कुडली, ता. देगलूर, जि. नांदेड

यंदा पाऊस नसल्यातच जमा. विहिरी, बोअर, हाणेगावचे तळे आटले आहे. गावात पाणी पुरेनासे झाले आहे. पाण्यासाठी रात्री दोन वाजूस्तर जागावं लागतंय. शेतातबी पाणी नाही. दोन अडीच किलोमीटर दूरच्या एका शेतकऱ्यांच्या शेतातील बोअरवर बैलांना पाणी पाजण्यासाठी न्यावे लागत आहे. अजून दोन महिन्यांनी पियाला पाणी ऱ्हाणार नाही. - धनाजी दोनाटे, शिळवणी, ता. देगलूर, जि. नांदेड

चार एकर कापूस आहे अजून वेचणी केली नाही. पाऊस कव्हाच उघडल्यामुळे पहिली बोंडं लागली तेवढीच. पुन्हा बोंडं लागली नाहीत. एकरात २० किलो बी होण्याचा भरवसा नाही. - केरबा हुगे, कुडली, ता. देगलूर, जि. नांदेड

यंदा रब्बीची पेरणी होऊ शकत नाही, रानं काळीच राहणार आहेत. खरिपातून खर्चाइतपत देखील हाती लागलं नाही. आमच्या गावातील ५० पैकी एक -दोन जणच सुखी असतील. - धनाजी जाधव, कुडली, ता. देगलूर, जि. नांदेड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com