येवला पुढील दुष्काळी शब्द पुसला जाणार : छगन भुजबळ

येवला पुढील दुष्काळी शब्द  पुसला जाणार : छगन भुजबळ
येवला पुढील दुष्काळी शब्द पुसला जाणार : छगन भुजबळ

नाशिक : येवला तालुका हा महाराष्ट्रातील सर्वांत दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र येवल्याचा दुष्काळ दूर करण्यासाठी पाहिलेले मांजरपाड्याचे स्वप्न आज पूर्ण झाले असून मांजरपाड्याच्या पाण्यामुळे येवला तालुक्याच्या नावापुढे कायम दुष्काळी असलेला शब्द पुसला जाणार असल्याचे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.  मांजरपाडा प्रकल्पाच्या पाण्याचे रविवार (ता. २९) येवला तालुक्यातील कातरणी येथे जलपूजन करण्यात आले. त्या वेळी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, शिरीष कोतवाल, अंबादास बनकर, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड आदी उपस्थित होते.  या वेळी भुजबळ म्हणाले, की माजी आमदार कै. जनार्दन पाटील यांनी रोजगार हमी कालव्याची निर्मिती केली. मात्र पुढे या कालव्याचे काम पुढे झाले नाही. त्यानंतर मतदारसंघात आल्यानंतर याबाबत माहिती घेतली. कायम दुष्काळी असलेल्या येवला तालुक्याच्या नावापुढील दुष्काळी शब्द पुसला गेला पाहिजे यासाठी हा प्रकल्प हाती घेतला असे त्यांनी सांगितले. दरसवाडी डोंगरगाव कालव्यावरील अनकाई येथील रेल्वे क्रॉसिंगचा प्रश्न मार्गी लागला आहे. तसेच किमी ४२ ते ६० बाळापूर ते हडपसावरगाव मधील अपूर्ण स्ट्रॅक्चर,भराव आणि खोदाई इत्यादी कामे पावसाळ्यानंतर लवकरच पूर्ण होतील. अरुंद भागाचे विस्तारीकरण आणि इतर काही कामांच्या वर्क ऑर्डर झालेल्या असल्याने कालव्याची राहिलेली कामे व त्रुटी दूर केल्या जातील, असे त्यांनी या वेळी सांगितले. नाशिकसह मराठवाड्याला पाणी जाणार  मांजरपाडा प्रकल्पाच्या मुख्य सांडव्याचे काम पावसानंतर लगेच सुरू होईल. त्यामुळे पुढच्या पावसाळ्यात यापेक्षा तीनपट पाणी पूर्वेकडे वळवले जाईल, त्या वेळी कालव्याची अपूर्ण कामे पूर्ण होऊन या कालव्यातून नियोजित क्षमतेने पाणी येईल, असे ते म्हणाले. आगामी काळात पार गोदावरी या नदीजोड प्रकल्पाचे पाणी याच बोगद्यातून गोदावरी खोऱ्यात आणले जाणार असल्याने नाशिक जिल्ह्याचा नव्हे, तर मराठवाड्यात सुद्धा हे पाणी जाणार असल्याचा विश्वास छगन भुजबळ यांनी या वेळी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com