उत्पादन खर्च वाढल्याने येवल्याची पैठणी महागली

कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे रेशमाचे उत्पादन घटले असून, महत्त्वाचा कच्चामाल असलेल्या रेशमाच्या दरात सुमारे २ हजार रुपयांची वाढ झाल्याने पैठणीचा उत्पादन खर्च वाढला आहे. परिणामी, दरात वाढ करण्याची वेळ विणकरांवर आली आहे.
Yevla's paithani became more expensive due to increase in production cost
Yevla's paithani became more expensive due to increase in production cost

येवला, जि. नाशिक : राजवस्त्र, अर्थात येवल्याची दिमाखदार पैठणी परिधान करणारी स्त्री शंभर जणींत नक्कीच उठून दिसते. इतकं तिचं देखणेपण म्हणूनच की काय फॅशनच्या ग्लोबल जमान्यातही ती महिलांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. पण याच राजवस्त्राला आता महागाईच्या झळा बसत आहेत. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे रेशमाचे उत्पादन घटले असून, महत्त्वाचा कच्चामाल असलेल्या रेशमाच्या दरात सुमारे २ हजार रुपयांची वाढ झाल्याने पैठणीचा उत्पादन खर्च वाढला आहे. परिणामी, दरात वाढ करण्याची वेळ विणकरांवर आली आहे.

जर, रेशीम, हातमाग आणि विणकाम करणारा कारागीर यांच्या एकत्रीकरणातून साकारते ती येवल्याची देखणी, नजाकतभरी पैठणी. मात्र गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रकोपात पैठणी उत्पादकांचे आर्थिक कंबरडे मोडले असतानाच आता पुन्हा अवकाळीनेही मोठा झटका या व्यवसायाला दिला आहे.  जगप्रसिद्ध पैठणीसाठी लागणारा महत्त्वाचा कच्चा माल रेशीम महागल्याने याचा फटका पैठणी विणकर कारागिरांना बसला आहे. गेल्या ५०-५५ दिवसांत कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू भागात अतिवृष्टीने तुती पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. 

या भागात तुतीची मोठ्या प्रमाणात लागवड होते. मात्र अतिवृष्टीने तुतीच्या शेतीचे वाटोळे केले आहे. त्यातच पेट्रोल, डिझेलच्या दरातही भरमसाट वाढ झाल्याने वाहतूक खर्च देखील वाढला असून या सर्वांचा परिणाम म्हणजे रेशमाच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे.पैठणी तयार करण्याकरिता लागणारे रेशीम ३५०० रुपये किलो दराने खरेदी केला जात होते. मात्र दिवाळीपासून हेच रेशीम ५५०० रुपये किलो दराने खरेदी करण्याची वेळ असल्याने उत्पादन खर्च वाढला आहे. जराचे दर २४०० ते ४ हजार रुपये प्रतिकिलो प्रमाणे स्थिर असले तरी यातही मागेच वाढ झालेली आहे.

...असे आहे अर्थकारण विणकरांना एक किलो रेशीम रंगणी करून घ्यावी लागते. तत्पूर्वी यातील सुमारे २५० ग्रॅम रेशीम बाजूला निघते, तर ७५० ग्रॅमच रेशीम उपयोगात येते. एका पैठणीला सुमारे अर्धा किलो रेशीम लागते. रंगणीनंतर एक किलोतून ७५० ग्रॅममच रेशीम उपयोगात येत असल्याने एका पैठणीसाठी सुमारे चार ते साडेचार हजार रुपयांचे रेशीम लागते. याशिवाय जर व इतर खर्च वेगळाच येतो. त्यामुळे पैठणीच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्याने दरातही वाढ झाली आहे. महिन्यांपूर्वी ७ हजार रुपयांना मिळणारी पैठणी ९ हजार ५०० रुपयांना मिळू लागली आहे. उत्पादन खर्च वाढल्याने ही दरवाढ करण्याची वेळ विणकर विक्रेत्यांवर आली आहे.

दिवाळीसह लग्नाचा हंगाम असल्याने ग्राहकांच्या खरेदीकडे कल वाढला असतानाच रेश्माच्या दरात मोठी वाढ झाल्याने पैठणीच्या दरात वाढ झाली आहे. रेशमासह वाहतूक खर्च तसेच जीएसटी वाढल्याचाही फटका या व्यवसायाला बसला आहे.  - दिलीप खोकले,  संचालक, कापसे पैठणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com