तुम्हीच दुसऱ्याच्या तोंडचा घास काढून निधी दिला ः अजित पवार

तुम्हीच दुसऱ्याच्या तोंडचा घास काढून निधी दिला  ः अजित पवार
तुम्हीच दुसऱ्याच्या तोंडचा घास काढून निधी दिला ः अजित पवार

मुंबई : मागील सरकारनेच इतर जिल्ह्यांना सूत्रानुसार निधी न देता तो काही जिल्ह्यांकडे वळवल्याचा थेट आरोप उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता. १३) केला. अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अजित पवार यांनी प्रादेशिक असमतोलाचा आरोपही फेटाळून लावला. अर्थसंकल्पात मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र कुठे दिसत नाही, अशी टीका फडणवीस करतात. मात्र, आमच्यावर यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत. विरोधकांनी उघड्या डोळ्यांनी अर्थसंकल्प पाहिला तर बऱ्याच गोष्टी दिसतील, असेही अजित पवार यांनी सांगितले. 

जिल्हा वार्षिक निधीत वाटपात सरकारने विदर्भावर अन्याय केल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला होता. मात्र अजित पवार यांनी आकडेवारीसह विरोधकांचे हे आरोप फेटाळले. अर्थसंकल्पावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात विरोधकांना चिमटे काढत तर कोपरखळ्या मारत विरोधी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. 

या वेळी अजित पवार म्हणाले, ‘‘जिल्हा वार्षिक निधीचे वाटप जिल्ह्याचे क्षेत्रफळ, लोकसंख्या, मानव विकास निर्देशांक यानुसार ठरते. मागच्या भाजप सरकारने अनेक जिल्ह्यांना सूत्रानुसार जेवढा निधी द्यायला हवा होता, तेवढा दिला नाही. अनेक जिल्ह्यांतील निधी काढून तो इतरत्र वळवला. आम्ही मात्र सूत्रानुसार जेवढा निधी द्यायला हवा होता, त्यापेक्षा एकाही जिल्ह्याला कमी निधी दिला नसल्याचा खुलासा अजित पवारांनी विधानसभेत केला. आम्ही कुणाच्या तोंडचा घास काढून घेतला नाही. नागपूरला यावर्षी सूत्रानुसार २८८ कोटी रुपयांऐवजी आम्ही ४०० कोटी रुपये दिला आहे.’’ 

‘‘निधीच्या सूत्रानुसार भाजप सरकारच्या काळात २०१९-२० चे वाटप कसे झाले होते याचे आकडेच अजित पवारांनी विधानसभेत दिले. दुसऱ्याच्या तोंडचा घास काढून तुम्ही निधी वाटप केले, आम्ही तसे केले नाही, आम्ही कुणाचा घास काढून दिली नाही,’’ असेही अजित पवारांनी विरोधकांच्या आरोपाला उत्तर देताना सांगितले. विरोधक विकासकामांना स्थगिती दिली, अशी ओरड करत आहेत. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारच्या १,६०० कोटींपैकी ११०० कोटींच्या कामांना तुम्ही स्थगिती दिली होती. म्हणजे त्या वेळी जसे झाले तसे आताही होते आहे, हे लक्षात घ्या, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. 

विधानसभेत ५९ सदस्यांनी अर्थसंकल्पावर चर्चा केली या सदस्यांचे आभार अजित पवार यांनी मानले. विरोधक टीका करणार, सत्ताधारी स्तुती करणार हे आजवर चालत आले आहे. दोन्ही बाजूच्या प्रतिक्रियेचा आदर करतो, असेही अजित पवार म्हणाले. मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी प्रयत्न करणार आहे. आता २०० कोटी रुपये दिले आहेत. ही सुरुवात आहे. मराठवाड्यासाठी सरकार निधी कमी पडू देणार नाही, असेही अजित पवार यांनी सांगितले.

कापूस उत्पादकांना न्याय देणार ः अजित पवार मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ येथील नेत्यांची बैठक घेऊन तिथल्या कापसाला न्याय देऊन बळिराजाला मदत कशी मिळेल, अशी आमची भूमिका आहे. या चर्चेतून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना विश्वास देतो की, हे सरकार तुमचे आहे, यातून कुठलीही अडचण तुमच्यावर येऊ देणार नाही, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.

चुकीला माफी नाही ‘हो आम्ही शिवसेनेला फसवले, आमची चूक झाली’ या सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत भाजपला चांगलेच चिमटे काढले. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सुधीर मुनगंटीवार म्हणतात चूक झाली, चूक झाली, पण आता चुकीला माफी नाही, हे वक्तव्य करताना बाजूला बसलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अजित पवारांनी कटाक्ष टाकला, त्यावर मानेने नकार देत उद्धव ठाकरे यांनीही चुकीला माफी नसल्याचे सूचित केले. आपले सरकार होणार आहे, होणार आहे... असेच तुम्हाला पाच वर्ष बोलावे लागेल, तुम्ही नाही म्हणालात तर पाठीमागे बसलेले आमदार उठतील आणि निघून जातील, असा इशाराही अजित पवार यांनी भाजपला लगावला. इकडे ज्योतिरादित्य सिंधीया होणार नाही, तिकडे होणार नाही, याची काळजी घ्या, असा उपरोधिक सल्लाही अजित पवारांनी भाजपला दिला. 

जे करतो ते लपून करीत नाही अजित पवार बोलत असताना भाजपसोबत गेल्याचा मुद्दा सभागृहात काही सदस्यांनी काढला. त्यावर मी जे करतो ते समोर करतो, लपून करत नाही, असे सांगताना आता इथे मजबूत आहे हे लक्षात घ्या, असे खडेबोलही अजित पवार यांनी सुनावले.

सामना तर आमचाच पेपर विरोधी पक्षांकडून अर्थसंकल्पावर टीका करण्यात येत आहे. मात्र,   अनेक वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमांनी अर्थसंकल्पाविषयी सकारात्मक बातम्या दिल्या आहेत. यासाठी अजितदादांनी विधानसभेत अर्थसंकल्पाविषयी छापून आलेल्या बातम्यांची कात्रणे दाखवली. या वेळी ''सामना''तील बातमीचे कात्रण हातात आल्यानंतर अजित पवार यांनी हा तर आमचाच पेपर आहे, असे म्हटले. यानंतर सभागृहात हशा पिकला. त्या वेळी अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना तुम्ही ''सामना'' वाचतच नव्हता, असा टोलाही लगावला. राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना ''सामना''तील अग्रलेख नेहमी चर्चेचा विषय ठरत असत. या अग्रलेखांमधून अनेकदा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका करण्यात येत असे. याविषयी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, त्यांनी मी ''सामना'' वाचत नाही, असे सांगितले होते.

तर तीन कोटींचे दोनच करतो महाविकास आघाडी सरकारने आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात आमदारांच्या विकासनिधीत वाढ करून सर्वांना खूश केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना २०११ नंतर आमदारांच्या निधीत वाढ केली असल्याचे सांगत एक कोटी रुपयांची वाढ करत असल्याची घोषणा केली. यानंतर सर्वच आमदारांनी बाके वाजवत अजितदादांचे स्वागत केले होते. मात्र, अर्थसंकल्पावरून विरोधकांकडून टीका होत आहे हा धागा पकडून अजित पवार यांनी विरोधी बाकांकडे नजर टाकत तीन कोटींचे दोनच कोटी करतो, मग समतोल साधला जाईल, अशी मिस्कील टिप्पणी केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com