agriculture news in marathi, zero budget agriculture, Subhash Palekar | Agrowon

झिरो बजेट शेतीचा भूलभुलैया

डॉ. अंकुश चोरमुले
रविवार, 5 मे 2019

सुभाष पाळेकर (गुरुजी) यांचे जवळपास ४० लाख 
अनुयायी (शिबिरार्थी) असल्याचे सांगितले जाते. त्यातील प्रमुख पिकांची शेती करणारे १० ते २० आदर्श शेतकरी निवडू. त्यांचा शेतीतील प्रत्यक्ष खर्च आणि उत्पन्न; आणि एकात्मिक शेती करणाऱ्या इतर शेतकऱ्यांचा खर्च आणि उत्पन्न यांची तुलना करू. बातमी, जाहिरात, भक्तांकरवी प्रचार न करता थेट हिशेब मांडू. त्यातून कोणते तंत्र अधिक फायद्याचे आहे, हे सिद्ध होईल. हे आव्हान पाळेकरांनी स्वीकारावे, अशी आमची विनंती आहे. 

---------------------------------------------

सुभाष पाळेकर (गुरुजी) यांचे जवळपास ४० लाख 
अनुयायी (शिबिरार्थी) असल्याचे सांगितले जाते. त्यातील प्रमुख पिकांची शेती करणारे १० ते २० आदर्श शेतकरी निवडू. त्यांचा शेतीतील प्रत्यक्ष खर्च आणि उत्पन्न; आणि एकात्मिक शेती करणाऱ्या इतर शेतकऱ्यांचा खर्च आणि उत्पन्न यांची तुलना करू. बातमी, जाहिरात, भक्तांकरवी प्रचार न करता थेट हिशेब मांडू. त्यातून कोणते तंत्र अधिक फायद्याचे आहे, हे सिद्ध होईल. हे आव्हान पाळेकरांनी स्वीकारावे, अशी आमची विनंती आहे. 

---------------------------------------------
डॉ. अंकुश चोरमुले 
---------------------------------------------

झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्रज्ञानाविषयीच्या अनेक अशास्त्रीय बाबींचा मी वर्षभर बारकाईने अभ्यास करत आहे. यात सामान्य शेतकऱ्यांची कशी दिशाभूल होत आहे आणि शहरी माणसांच्या मनात एकूणच शेती व शेतकऱ्यांबद्दल कसे गैरसमज पेरले जात आहेत, याची प्रचिती आली. हे सगळं अस्वस्थ करणारं आहे. झिरो बजेट शेतीची संकल्पना लोकप्रिय करणारे सुभाष पाळेकर हे आता खूप मोठं नाव झालं आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर अनेक राज्यांत त्यांचे अनुयायी आहेत. भारत सकारने पाळेकरांचा पद्मश्री किताबाने गौरव केल्यामुळे, त्यांच्या झिरो बजेट शेतीच्या तंत्रालाही आपोआप राजमान्यता मिळाल्याचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर नेमकी वस्तुस्थिती आणि शेतकऱ्यांची होणारी फरपट यांचा ताळा घेण्याची गरज आहे. 

कोणतेही तंत्रज्ञान सदासर्वकाळ १०० टक्के उपयुक्त नसते. प्रत्येक बाबीत काही चांगल्या/वाईट गोष्टी असतात आणि काळानुरूप त्यांत सुधारणा, बदल, नवीन प्रयोग करावे लागतात. या सगळ्यांतून प्राप्त होणारे निष्कर्ष प्रमाण मानून वाटचाल केली तरच ते संशोधन अधिकाधिक उपयुक्त ठरते. हा विज्ञानाचा मूलभूत स्वरूपाचा नियम आहे. एखाद्या तंत्रज्ञानाचे भक्त निर्माण झाले आणि त्यांनी आम्ही सांगतो तेच फक्त श्रेष्ठ, बाकी सगळे त्याज्य- टाकाऊ अशी भूमिका घेऊन संशोधनाचा विपर्यास करण्यास सुरवात केली तर काय करायचे, हा खरा प्रश्न आहे. तंत्रज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करताना अतिरेकी भूमिका घेणे, एकात्मिक शेतीच्या तोट्यांचा बागुलबुवा करणे, शेतकऱ्यांना बुचकळ्यात टाकणे आणि आपले तंत्रच कसे तारणहार आहे हे ठासून मांडत राहणे, ही या भक्तांची कार्यपद्धती आहे. ती विज्ञानाला धरून आहे, असे म्हणता येणार नाही. 

आपल्या कृषी विद्यापीठांनी, संशोधन केंद्रांनी, शेतकरी मित्रांनी अनेक प्रयोग केलेले आहेत. त्यांचे निष्कर्ष उपलब्ध आहेत. त्यांचे प्रमाणीकरण करून त्यांचा प्रसार केला जातो; पण या सगळ्यांना मोडीत काढून झिरो बजेट शेतीची भुरळ पाडण्याचे प्रकार होतात, त्याला अनेक शेतकरी बळी पडले आहेत. ‘झिरो बजेट’च्या गळाला लागलेले मासे कोण याचे विश्लेषण केले, तर त्यात सर्वसामान्य शेतकऱ्यांपेक्षा संडे फार्मर, आयटी क्षेत्रात काम केलेले किंवा करत असलेले, डॉक्टर, सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले हौशी शेतकरी यांचे प्रमाण अधिक असल्याचे लक्षात येते. यातल्या अनेकांना शेती म्हणजे जादूचा खेळच वाटतो. शेतीतील खर्च शून्य करण्याच्या नादात बरेच शेतकरी शून्य होत आहेत, हे आपण कधी समजून घेणार आहोत? शेती हा एक व्यवसाय आहे आणि त्यात आज १ रुपया लावला तर उद्या २ रुपये व्हावेत, असा फॉर्म्युला असला पाहिजे. झिरो बजेट शेती कशी शक्य आहे, हे तंत्र शून्य खर्चाचं खरंच आहे का, हे गणित मांडून सिद्ध करता आले पाहिजे.

शेतीसाठी लागणाऱ्या बियाणे, अन्नद्रव्य, तणनियंत्रण, कीडनियंत्रण, रोगांचा प्रादुर्भाव, मजुरांचा खर्च, अवजारे- यंत्रं यांचे भाडे, पाण्याचा खर्च, लाइटबिल शून्यावर आणण्याची सिद्धी कशी प्राप्त झाली, याचे रहस्य उलगडून दाखवले पाहिजे. झिरो बजेट शेती ही एकात्मिक शेतीपेक्षा अधिक नफा देणारी कशी आहे, या शेतीत किती जण यशस्वी झाले, ही माहिती उपलब्ध करून दिली पाहिजे, तर ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ होईल. पण त्याऐवजी या तंत्राचे समर्थक पुरावे नसलेल्या भरताड, अतार्किक गोष्टींचा रतीब घालत असतात.   

झिरो बजेट शेतीत सगळ्या निविष्ठा घरच्या वापरा, असा सल्ला दिला जातो. या घरच्या निविष्ठा शून्य किमतीच्या असतात असं तुम्ही कसं काय म्हणू शकता? माझ्या शेतातील शेणखत मी स्वतः वापरलं तरी त्याची किंमत असतेच. व्यवसाय करणारा कोणताही शहाणा माणूस हे कसं मान्य करेल की घरचं म्हणजे किंमत शून्य, माझे कष्ट म्हणजे किंमत शून्य? मग अंबानी-टाटा घरच्या कंपनीत काम करण्याचे कोट्यवधी रुपये मानधन का घेतात? ते का नाही सांगत, माझी कंपनी कमीत कमी गुंतवणूक करून इतके कोटी कमावते? कारण प्रत्येक वस्तू आणि सेवा याची किंमत असते, तिला शून्य पकडताच येत नाही.  

काही दिवसांपूर्वी सुभाष पाळेकर (गुरुजी) यांनी ‘झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्र’ हे नाव बदलून आता ‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती तंत्र’ असे केल्याचे समजले. त्यासाठी त्यांनी दिलेली कारणे न पटण्यासारखी आहेत. ज्या तंत्राच्या जोरावर पद्मश्री पुरस्काराला गवसणी घातली आणि निती आयोगात मानाचं पान मिळवण्याइतपत मजल मारली, तेच नाव बदलायला लागणे, यातच या तंत्राचा फोलपणा दिसून येत नाही का? की हा स्वतःच्या प्रसिद्धीचा सोस आहे?

परवा अमोल दिघे नामक तरुणाचा झिरो बजेट बाबतीत झालेल्या भ्रमनिरासाचा अनुभव वाचण्यात आला. स्वतः अनुभव घेतलेला शेतकरी जेव्हा इतकं परखड लिहितो, तेव्हा त्याचे मुद्दे खोडायला हवेत किंवा तो बोलतोय ते कसं चूक आहे हे सिद्ध केलं पाहिजे. दिघेंसारखे तरुण जेव्हा झिरो बजेट तंत्र वापरून शेती तोट्यात येते म्हणतात आणि ते वापरणं बंद करतात, तेव्हा यावर गंभीर विचार करण्याची गरज आहे. पंढरपूरचे भरत रानरुई या सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यानेही स्वतःच्या दोन ऑडिओ क्लिप प्रसारित केल्या आहेत. त्यांनीही पाळेकरांच्या तंत्रावर अनेक आक्षेप घेतले आहेत. सेंद्रिय शेतीचे एकेकाळी समर्थक असणाऱ्या पाळेकरांनी आज ‘यू टर्न’ घेतला आहे. नैसर्गिक शेतीच्या क्षेत्रातले ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व असलेले सावे गुरुजी व इतर आदरणीय व्यक्तींकडून शेती तंत्रविषयक चांगल्या गोष्टी आत्मसात करून, त्यात नंतर सोयीनुसार मोडतोड करून स्वतःच्या नावावर खपवण्याचा खटाटोप पाळेकरांनी केल्याचा आरोप त्यांच्यावर होत असतो. त्याचा त्यांनी खुलासा करण्याची गरज आहे. 

सुभाष पाळेकर (गुरुजी) यांचे जवळपास ४० लाख अनुयायी (शिबिरार्थी) असल्याचे सांगितले जाते. त्यातील प्रमुख पिकांची शेती करणारे १० ते २० आदर्श शेतकरी निवडू. त्यांचा शेतीतील प्रत्यक्ष खर्च आणि उत्पन्न; आणि एकात्मिक शेती करणाऱ्या इतर शेतकऱ्यांचा खर्च आणि उत्पन्न यांची तुलना करू. बातमी, जाहिरात, भक्तांकरवी प्रचार न करता थेट हिशेब मांडू. त्यातनू कोणते तंत्र अधिक फायद्याचे आहे, हे सिद्ध होईल. हे आव्हान पाळेकरांनी स्वीकारावे, अशी आमची विनंती आहे. 

वाईट याचं वाटतं की असं गणित न तपासता, अशी तुलना न करता फक्त माध्यमांतल्या बातम्या आणि सांगोवांगीच्या गोष्टींना भुलून अनेकजण झिरो बजेट शेती तंत्रावर विश्वास ठेवत आहेत. धोरणकर्तेही चिकित्सा न करता अशा तंत्राचा स्वीकार करतात, हे वेदनादायी आहे. राज्यातील कृषी विद्यापीठे आणि संशोधन संस्था वाळूत चोच खुपसून बसल्या आहेत. त्यांनी या विषयावर उघडपणे बोलले पाहिजे, ठोस भूमिका घेतली पाहिजे. ‘झिरो बजेट’वाला शेतकरी दोन वर्षांत आहे तेवढं संपवून परत जुन्या मार्गावर येतो, याची कितीतरी उदाहरणं पाहावयास मिळतील. विषमुक्त अन्न पिकवायला नैसर्गिक, सेंद्रिय, झिरो बजेट तंत्रज्ञानच लागतं, हा गैरसमज आहे. जगाच्या पाठीवर विषमुक्त अन्न कसं पिकवलं जातं याचा थोडा अभ्यास करायची गरज आहे. शेतकऱ्यांच्या पुढची संकटं दिवसेंदिवस अधिक अक्राळविक्राळ होत आहेत. येणाऱ्या काळात शेतकरी आणि शेतीक्षेत्र टिकवणं आव्हानात्मक असणार आहे. शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारला, तरच या आव्हानाला सामोरं जाता येईल. अन्यथा, शेतकऱ्यांची लूट अशीच सुरू राहील.

सिद्ध पुरुष (!)
शेती आणि ती ही झिरो बजेट... ही कल्पनाच मोठी आकर्षक वाटते. तोट्यातल्या शेतीमुळे पिचून गेलेल्या शेतकऱ्याला तर हे एक मोठे वरदानच भासते. आपल्याकडला एकूण समाज आणि त्या समाजाचा मोठा हिस्सा असलेला शेतकरी बव्हंशी देवभोळा, अवतार कल्पनेशी लीन झालेला, जीवनाचं तुपाळ तत्त्वज्ञान सांगणाऱ्या गुरू-महाराजांकडून आपल्या रोजच्या जगण्याच्या झगड्यावर रामबाण उत्तरांची अपेक्षा ठेवणारा असा आहे. त्यात शेतीच्या बिघडलेल्या आरोग्याची लक्षणं सांगून, कृषी विद्यापीठे आणि कंपन्यांना नावं ठेऊन, सेंद्रिय शेतीवाल्या इतर मठाधिपतींची मापं काढून अतिरंजित दावे करणारे सुभाष पाळेकर म्हणजे अनेकांना सिद्ध पुरुष न वाटले तरच नवल.

 संपर्क : ८२७५३९१७३१
(लेखक कृषी कीटकशास्त्रातील पीएच.डी. पदवीधारक व ऊसउत्पादक शेतकरी आहेत.) 


इतर संपादकीय