जळगाव : सोयाबीनची खरेदी शून्य; ज्वारी खरेदीबाबत आदेशांची प्रतीक्षा

zero soybean purchases in Jalgaon district; Waiting for orders to buy sorghum
zero soybean purchases in Jalgaon district; Waiting for orders to buy sorghum

जळगाव : जिल्ह्यात सोयाबीनची शासकीय केंद्रातील खरेदी शून्यावरच कायम राहिली आहे. ज्यांनी सोयाबीन विक्रीबाबत नोंदणी केली, त्या शेतकऱ्यांनी एसएमएस देऊनही सोयाबीन विक्रीसाठीच आणला नाही. दुसरीकडे ज्वारी खरेदीसंबंधी नोंदणी सुरू असली, तरी खरेदी केव्हा सुरू होईल, हे स्पष्ट झालेले नाही. 

शासकीय धान्य खरेदीसंबंधी फारसा प्रतिसाद मार्केटिंग फेडरेशनला यंदा मिळालेला नाही. मुगाची फक्त २०० क्विंटल खरेदी झाली आहे. ७०५० रुपये प्रतिक्विंटलचा दर मुगाला होता. उडदाची खरेदीदेखील नगण्यच राहिली. सोयाबीनला ३७१० रुपये प्रतिक्विंटलचा दर जाहीर झाला होता. परंतु जिल्ह्यात सोयाबीन पट्ट्याला अतिवृष्टीने झोडपले. यात पिकाचे ४० ते ८० टक्के नुकसान झाले. सोयाबीन काळवंडला. कमी दर्जाचा सोयाबीन शासकीय खरेदी केंद्रात घेतला जात नव्हता. यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री या केंद्रात केली नाही.

जिल्ह्यात पाचोरा, जळगाव व अमळनेर येथे सोयाबीन खरेदी केंद्र मंजूर झाले होते. कमाल शेतकऱ्यांनी बाजार समिती किंवा खासगी बाजारात सोयाबीनची विक्री केली. सोयाबीनला दर ३००० रुपयांपर्यंत मिळाले. सध्या दरात सुधारणा होत आहे. दरात सुधारणा होत असली, तरी फारसा सोयाबीन शेतकऱ्यांकडे साठविलेला नसल्याचे चित्र जिल्हाभरात आहे. 

ज्वारीची जिल्ह्यात सर्व १५ तालुक्‍यांमध्ये खरेदी केली जाणार आहे. ज्वारीला २५५० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळणार आहे. त्यासंबंधी नोंदणी सुरू आहे. सुमारे ६५ शेतकऱ्यांची नोंदणी या केंद्रात झालेली आहे. खरेदीबाबत शेतकऱ्यांना अजूनही सूचना किंवा एसएमएस दिलेले नाहीत. जिल्ह्यात ज्वारीचेही अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने काळी ज्वारी किंवा कमी दर्जाची ज्वारी या केंद्रात खरेदी केली जाणार नसल्याची बतावणी केंद्रातील कर्मचारी, अधिकारी शेतकऱ्यांना करीत आहेत. यामुळे शेतकरी आपल्या ज्वारीची विक्री बाजारात ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल या दरात करीत असल्याची माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com