पुणे जिल्हा परिषदेत येणार ‘महिला राज’

पुणे जिल्हा परिषद
पुणे जिल्हा परिषद

पुणे  : जिल्हा परिषदेच्या नवीन अध्यक्ष निवडीसाठी मंगळवारी (ता. १९) मुंबईत सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने पुणे जिल्हा परिषदेत महिला राज येणार आहे. साधारणत: २० डिसेंबरपर्यंत नवीन पदाधिकारी निवडीसाठी कार्यक्रम निश्चित होण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदासाठी जिल्ह्यातील महिला सदस्यांना मोर्चेबांधणी करावी लागणार आहे.

अध्यक्षपद निवडीसाठी २३ ऑगस्टला अधिसूचना काढण्यात आली होती. २० सप्टेंबरला विद्यमान सदस्यांची मुदत संपली आहे. मात्र, न्यायालयीन प्रक्रिया आणि विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आदी कारणांमुळे निवड प्रक्रिया लांबली. राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने राज्यातील जिल्हापरिषद अध्यक्षांच्या पदाचे वाटप करण्यासाठी मंगळवारी मुंबईत सोडत काढली. आरक्षण सोडत निघाल्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्षांसह विषय समित्यांच्या पदाधिकारी निवडीच्या हालचालींना वेग आला आहे.

१९९२ मध्ये झालेल्या ७३ व्या घटना दुरुस्तीपासून जिल्हा परिषदेमध्ये विविध घटकांना आरक्षण लागू झाले. पदाधिकारी निवडीसाठी १९९७ पासून दर अडीच वर्षांसाठी आरक्षण काढण्यात येते. १९९२ ते १९९७ पर्यंत सर्वसाधारण प्रवर्गातील अध्यक्ष होते. १९९७ पासून अध्यक्षपदावर सर्वसाधारण व नागरिकाचा मागास प्रवर्गासाठी प्रत्येकी तीन वेळा, सर्वसाधारण महिला दोन वेळा, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गाला एक वेळ संधी मिळाली आहे. पुणे जिल्हा परिषदेमध्ये सध्या नागरिकांचा मागास प्रवर्गाचे आरक्षण असून, अध्यक्षपद बारामती तालुक्यातील विश्वास देवकाते यांच्याकडे आहे. 

अध्यक्षपदासाठी विद्यमान कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती, शिरूर तालुक्यातील सदस्या सुजाता पवार, स्वाती पाचुंदकर, कविता बगाटे, महिला बालकल्याण समिती सभापती व दौंडच्या सदस्या राणी शेळके, आंबेगाव तालुक्यातील तुलसी भोर, अरुणा थोरात, मावळमधील शोभा कदम, हवेली तालुक्यातील कल्पना जगताप, अर्चना कामठे, पुजा पारधी, अनिता इंगळे, आणि बारामती तालुक्यातील राहिणी तावरे, मीनाक्षी तावरे यांच्यापैकी एका महिलेस संधी मिळण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार वाढले आहेत. तसेच सध्या अध्यक्षपद बारामती तालुक्याकडे असल्याने इतर तालुक्यांना संधी मिळावी, अशी मागणी होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com