सोयीची नियुक्ती द्या, आम्हीही चालवतो ३६० दिवस शाळा

सोयीची नियुक्ती द्या, आम्हीही चालवतो ३६० दिवस शाळा
सोयीची नियुक्ती द्या, आम्हीही चालवतो ३६० दिवस शाळा

नगर ः वर्षातील ३६० दिवस शाळा सुरू ठेवण्याचा प्रकल्प कोळगाव थडी (ता. कोपरगाव) येथे जिल्हा परिषदेतर्फे सुरू झाल्याची चर्चा संपूर्ण जिल्हाभर सुरू झाली आहे. ‘हाच उपक्रम आम्हीही आमच्या शाळेत राबवू; पण आमच्या बदल्या सोयीप्रमाणे करा,’ अशी मागणी शिक्षक करू लागले आहेत. गावापासून दूर व गैरसोयीच्या बदल्या होत असल्याने प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे प्रशासनाने शिक्षकांच्या बदल्या सोयीच्या ठिकाणी होतील असे नियोजन करण्याची मागणी होत आहे. 

जिल्ह्यात एक हजार ६०२ दोन गावे असून, एक हजार ३११ ग्रामपंचायती आहेत. जिल्हा परिषदेबरोबरच महापालिका, नगरपालिका व खासगीही शाळा आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेच्या तीन हजार ७७५ शाळा असून, त्यांत दोन लाख ३६ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना सुमारे ११ हजार १८७ शिक्षक अध्यापन करतात. सरकारी नियमानुसार शिक्षकांच्या बदल्या होत असतात. या बदलीप्रक्रियेमध्ये काही शिक्षकांना हवे ते ठिकाण मिळते, तर काहींसाठी बदल्या गैरसोयीच्या ठरतात. त्याचा परिणाम शिकवण्यावर होतो, असे काही शिक्षकच खासगीत सांगत आहेत. 

याबाबत शिक्षकांनी बदल्या सोयीच्या कराव्यात, अशी मागणी अनेकदा जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे; मात्र त्यावर ठोस कार्यवाही होत नसल्याच्या तक्रारी शिक्षक करीत आहेत. कोळगाव थडी (ता. कोपरगाव) येथील शिक्षकांनी शाळा ३६० दिवस चालविण्याचा संकल्प केला; तो कौतुकास्पद आहे. या शिक्षकांचे सर्वच शिक्षकांनी अभिनंदन केले आहे. मात्र, एकच नव्हे, तर जिल्ह्यातील सर्वच शाळा आम्ही वर्षभर चालवू; फक्त बदल्या सोयीच्या ठिकाणी करा, अशी मागणीवजा चर्चा आज दिवसभर जिल्ह्यात सुरू होती.

जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढवायची असेल, तर प्रशासनाने शिक्षकांच्या सोयीनुसार बदल्या करणे गरजेचे आहे. तसे केले तर शिकवण्यावर सकारात्मक परिणाम होऊन विद्यार्थ्यांची गुणवत्तावाढ होईल आणि जिल्हा परिषद शाळांकडे विद्यार्थ्यांचा कलही वाढेल.  - संजय धामणे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक समिती, नगर 

शिक्षकांच्या सोयीने बदल्या करून दिल्या, तर त्याचा गुणवत्तावाढीसाठी उपयोग होऊ शकतो. बदल्या अन्यायकारक झाल्या, तर त्या शिक्षकांची मानसिक स्थिती दोलायमान राहते. त्याचा शिकवण्यावर परिणाम होतो. त्यामुळे सहानुभूतिपूर्वक विचार करून प्रशासनाने शिक्षकांना सोयीच्या बदल्या देताना त्यांच्याकडून गुणवत्तावाढीची हमी घ्यावी.  - राजेश परजणे, जिल्हा परिषद सदस्य 

शिक्षकांच्या बदल्या सोयीनुसार होणे गरजेचे आहे. या संदर्भात मी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा केली आहे. शिक्षकांना सोयीनुसार बदल्या दिल्या, तर त्याचा फायदा निश्‍चित होणार आहे. जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावण्यासही त्याचा उपयोग जाईल.  - शालिनी विखे पाटील, अध्यक्ष, जिल्हा परिषद

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com