Zucchini
Zucchini

झुकिनी लागवडीचे नियोजन

झुकिनीला सामान्यतः समर (उन्हाळी) स्क्वॅश असे म्हटले जात असले तरी आपल्याकडे तीनही हंगामामध्ये याची लागवड केली जाते. या पिकाच्या लागवड, व्यवस्थापनाची माहिती घेऊ.

झुकिनीला सामान्यतः समर (उन्हाळी) स्क्वॅश असे म्हटले जात असले तरी आपल्याकडे तीनही हंगामामध्ये याची लागवड केली जाते. या पिकाच्या लागवड, व्यवस्थापनाची माहिती घेऊ. झुकिनी हे कुकुरबीटा कुळातील फळ असून, कुकुरबीटा पेपो या प्रजातीमध्ये मोडतात. या झाडाला एक लहान आकाराचे हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचे फळ येते. हे फळ लवकर येते. फळाचे कवच आणि बिया पूर्णपणे परिपक्व होण्याआधीच कच्चे, उकडून, शिजवून किंवा भाजून खाल्ले जाते.

  • अमेरिकेत कॅलिफोर्निया, फ्लोरिडा, जॉर्जिया आणि न्यूयॉर्क या राज्यांसह चीन, रशिया, इटली अशा देशांमध्ये झुकिनी स्क्वॅशची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
  • या पिकाला मोठा इतिहास असून, एका मेक्सिकन लेण्यामध्ये सुमारे दहा हजार वर्षांपूर्वीचे अवशेष आढळले आहेत.
  • झुडूप वजा असलेल्या या झाडांना नर-मादी फुले एकाच झाडावर वेगवेगळ्या ठिकाणी येतात. काही देशांत झुकिनी फळासोबत नर, मादी फुलांपासूनही वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात.
  • कॅलरी कमी असलेल्या या फळात भरपूर प्रमाणात पोषक द्रव्ये आहेत. जीवनसत्त्व अ आणि क जास्त प्रमाणात आहेत. पोटॅशिअमचे प्रमाण जास्त असल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी झुकिनी फळ महत्त्वाचे आहे.
  • झुकिनीचे प्रकार आणि आकार यामध्ये भिन्नता असली तरी आपल्या महाराष्ट्रात खासकरून पिवळी आणि हिरवी झुकिनी असे याचे दोन मुख्य प्रकार आढळतात. झुकिनीच्या विविध प्रकाराची बाजारपेठ वेगळी आहे. हिरवी झुकिनी हा प्रकार आपल्याकडे सर्वाधिक लोकप्रिय आहे. याला मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे. सरळ फिकट हिरवा ते गर्द हिरव्या रंगात काकडी सारखा आकारात उपलब्ध आहे. पिवळी झुकिनी पिवळ्या रंगाचे झुकिनी किंवा सोनेरी झुकिनीची एक चव सौम्य आहे. हिरव्या झुकिनीपेक्षा थोडी गोडसर असते. हिरव्या झुकिनीनंतर आपल्याकडे पिवळ्या सोनेरी झुकिनीला अधिक मागणी असते. गोलाकार झुकिनी वेगळ्या गोलाकार आकारामुळे परदेशामध्ये या जातीला विशेष मागणी असते. कोस्टाटा रोमेनेस्को झुकिनी ही एक इटालियन जात आहे. त्याच्या बाह्य संरचनेमुळे त्वरित ओळखता येते. या झुकिनी फिकट गुलाबी, हिरव्या एक विशिष्ट मध्यम राखाडी-हिरव्या रंगाच्या असतात. याची मऊ, पातळ त्वचा आणि दाणेदार चव हे विशेष गुणधर्म आहे. क्रोकनेक झुकिनी पिवळ्या क्रोकनेक स्क्वॅश या सामान्यतः मानेवर किंचित निमुळत्या वाकड्या असून टवटवीत दिसतात. क्रोकनेक झुकिनी ही सर्वांत जुन्या जातींपैकी एक आहे. क्रोकनेक स्क्वॅशमध्ये कॅरोटीनोईड्स असून, विशिष्ट एक वनस्पती रंगद्रव्य असते. त्यामुळे त्याला पिवळा रंग येतो. हा घटक अँटिऑक्सिडंट म्हणून देखील कार्य करतो. झेफिअर स्क्वॅश झेफियर एक सौम्य चवीची संकरित क्रोक्रनेक झुकिनी आहे. त्यामध्ये दोन रंगाच्या छटा असल्याने सहज ओळखता येते. बहुतेक उन्हाळी स्क्वॅशपेक्षा पोत थोडीशी कठोर असली तरी देठ मऊ आणि कोमल असते. हवामान जमिनीचे तापमान २१ अंश सेल्सिअस चांगल्या वाढीसाठी उपयुक्त ठरते. या पिकास उष्ण हवामान चांगले मानवते. सरासरी तापमान २५ ते ३५ अंश सेल्सिअस लागवडीसाठी उपयुक्त असते. किमान तापमान १६ अंशांपर्यंत असावे. जास्त तापमानात नर फुलांची संख्या वाढून मादी फुलांची संख्या कमी होते. लागवडीसाठी हंगाम  नाव उन्हाळी स्क्वॅश असे असले तरी हे पीक भारतात तीनही हंगामांत घेतले जाते. खरीप हंगाम : जून-जुलै रब्बी ः ऑक्टोबर-नोव्हेंबर उन्हाळी हंगाम : जानेवारी ते मार्च. उन्हाळी हंगामाच्या तुलनेत खरीप हंगामात अधिक उत्पादन मिळते. हरितगृहात लागवड केल्यास बिगरहंगामी उत्पादनही चांगल्या प्रकारे मिळते. लागवडीचे अंतर  दोन ओळींतील अंतर ५-६ फूट व दोन झाडांतील अंतर २-३ फूट असावे. जास्त झाडांच्या संख्येसाठी काही ठिकाणी १ फूट अंतरावरही लागवड केली जाते. मात्र दोन ओळींतील आणि झाडांतील योग्य अंतर हे काढणी करतेवेळी फायदेशीर ठरते. बियाणे लागवड करतेवेळी १.५ ते २.५ सेंमीपेक्षा जास्त खोल टोकू नये. जमीन 

  • सेंद्रिय पदार्थ युक्त हलक्या ते मध्यम स्वरूपाची जमीन.
  • जमिनीचा सामू ५.८-६.८ पर्यंत असावा.
  • चांगल्या प्रकारे निचरा होणारी जमीन निवडावी.
  • पाणी व्यवस्थापन 

  • जमिनीतील ओलावा सुरुवातीच्या वाढीच्या काळात खूप महत्त्वाचा ठरतो.
  • त्याचसोबत परागीभवन काळात आणि फळ लागण्याच्या स्थितीमध्ये पाणी देणे गरजेचे असते.
  • जास्तीचे पाणी साचून पिकांवर रोगाचे प्रमाण वाढते, त्यामुळे पाणीपुरवठा करण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा.
  • आठवड्यात किमान एक इंच पाण्याची गरज झुकिनी पिकाला असते.
  • बियाण्याचे प्रमाण १.५ ते २ किलो प्रति हेक्टरी. लागवड पद्धत  बियाणे टोकण पद्धत किंवा प्लॅस्टिक ट्रेमध्ये बियाण्यांची लागवड करून रोपे तयार केली जाते. त्यांची पुनर्लागवड केली जाते. सुधारित वाण  पंजाब चप्पन कद्दू  पंजाब कृषी विद्यापीठाने पंजाब येथील स्थानिक जातींमधून निवड पद्धतीने विकसित केलेली ही जात आहे. झुडूप प्रकारातील या फळांची काढणी पेरणीपासून सुमारे ६० दिवसांत शक्य असते. केवडा रोग आणि लाल भोपळ्यामधील भुंगेऱ्यांना प्रतिकारक्षम आहे. हेक्टरी उत्पादन २०-२५ टन देते. पुसा अलंकार  भारतीय कृषी संशोधन संस्थेने चप्पन कद्दू आणि अर्ली यलो प्रॉलिफिक दरम्यान संकरातून तयार केलेली ही जात आहे. फिकट रंगाचे पट्टे असलेले एकसारखे गडद हिरवे फळ, निमुळता आकाराचे बूड हे वैशिष्ट्य. पेरणीपासून ४५-५० दिवसात काढणीस तयार. हेक्टरी २०-३० टन उत्पादन मिळते. अर्ली यलो प्रोलिफिक लवकर तयार होणारे हे झुडूप प्रकारचे वाण. फळे बुडाच्या बाजूला निमुळत्या आकाराची असतात. परिपक्वतेवर हलकी पिवळी त्वचा नारिंगी पिवळ्या रंगाकडे वळते. ऑस्ट्रेलियन ग्रीन  परदेशातून आयात केलेले हे वाण खूप लवकर येणारे व झुडूप प्रकारातील आहे. त्याला गडद हिरवी फळे पांढऱ्या पट्ट्यांसह येतात. २५-३० सेंमी लांबीची, १५-२० फळे प्रति झाड या प्रमाणे हेक्टरी १५-१६ टन उत्पादन मिळते. खत व्यवस्थापन 

  • लागवडीपूर्वी हेक्टरी २० ते २५ टन कुजलेले शेणखत.
  • शिफारशीत खते ः ६० किलो नत्र ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश.
  • संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी, नत्र तीन समान हप्त्यांत विभागून द्यावे.
  • अधिक उत्पादनासाठी पीक वाढीच्या अवस्थेनुसार १९:१९:१९, १२:६१:००, ००:५२:३४, १३:००:४५ या विद्राव्य खतांचा फवारणी व ठिबक सिंचनाद्वारे वापर केल्यास फळांची गुणवत्ता आणि उत्पादन वाढते.
  • पीक संरक्षण  या पिकामध्ये खालील रोग, किडींचा प्रादुर्भाव होतो. रोग भुरी, केवडा, करपा, जिवाणूजन्य मर, कुकुंबर मोझॅक व्हायरस, झुकिनी येलो मोझॅक, कलिंगड मोझॅक व्हायरस. कीड : मावा, लाल कोळी, येलो स्क्वॅश बिटल, स्क्वॅश वाइन बोरर, स्क्वॅश ढेकूण. नियंत्रण

  • एकात्मिक पद्धतीने कीड व रोगांचा चांगल्याप्रकारे बंदोबस्त करता येतो.
  • रोगग्रस्त पाने, झाड काढून जमिनीत पुरून किंवा जाळून नष्ट करावी.
  • रसशोषक किडीच्या व्यवस्थापनासाठी निळे, पिवळे चिकट सापळे वापरावेत.
  • पिकाभोवती मक्याची तसेच झेंडूची लागवड करावी.
  • कीड-रोग नियंत्रणासाठी पिकाची फेरपालट करावी.
  • कीड-रोगप्रतिबंधक वाणाची निवड करावी
  • काढणी 

  • पिकाचा कालावधी : ६० ते ९० दिवस.
  • लागवड केल्यानंतर वेगवेगळ्या जातीनुसार वेगवेगळ्या वेळी काढणी सुरू होते.
  • बियांपासून लागवड केल्यास ४५-५० दिवस, तर रोपांपासून लागवड केल्यास ३५-४५ दिवसांपासून उत्पादनास सुरुवात होते.
  • बाजारपेठेनुसार हिरवी झुकिनीची काढणी ६ ते ८ इंच लांबीचे फळ असताना करावी.
  • पिवळी झुकिनी ४-६ इंच लांब, गोलाकार झुकिनी २-३ इंच व्यास झाल्यावर काढणी करावी.
  • लहान आकाराच्या झुकिनीमध्ये गोड चव असते, तर मोठ्या आकाराच्या झुकिनीमध्ये सौम्य चव असते.
  • काही जातींमध्ये शक्यतो पहिले फळ विचित्र आकाराचे किंवा काळ्या रंगाचे येते.
  • उत्पादन

  • चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केल्यास एका झाडापासून साधारणपणे ३०-४० फळे मिळतात.
  • एकरी ८-१५ टन उत्पादन मिळते. हरितगृहामध्ये लागवड केल्यास एकरी उत्पादन २० टनापर्यंतही उत्पादन घेत असल्याची उदाहरणे आहेत.
  • बाजारपेठ झुकिनीला मोठ्या शहरांमध्ये उदा. महाराष्ट्रात पुणे, मुंबई तसेच कर्नाटकमध्ये बंगळूर नंतर दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, गोवा बाजारपेठ उपलब्ध आहे. विविध पंचतारांकित हॉटेल्समध्येही मागणी असते. बाजारात झुकिनीच्या पिवळ्या रंगाच्या तुलनेत हिरव्या फळांना जास्त मागणी असते. काढणी केल्यानंतर फळ जास्त काळ साठवता येत नाही. ते त्वरित बाजारपेठेत पाठवावे. दरामध्ये प्रचंड चढउतार होतात, हे लक्षात ठेवावे. महत्त्वाच्या बाबी

  • बियाण्याची पेरणी करण्यापेक्षा रोपे तयार करून लागवड करावी. हेक्टरी रोपांची संख्या योग्य राखता येते.
  • अति थंडीमुळे पिकाची उगवणक्षमता व झाडांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. कडाक्याची थंडी कमी झाल्यानंतर पिकाची लागवड करावी.
  • पूर्व हंगामातील लागवडीसाठी प्लॅस्टिक किंवा नैसर्गिक आच्छादनाचा वापर करावा. पिकाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते. जमिनीचे तापमान नियंत्रित राहून वाढ चांगली होते. चांगल्या प्रतीची फळे मिळतात.
  • नत्रयुक्त खतांचा वापर योग्य प्रमाणातच करावा. जास्त किंवा कमी प्रमाण झाल्यास नर फुलांची संख्या वाढते.
  • ठिबक सिंचन पद्धतीमुळे झाडे निरोगी राहतात. अति पाण्यामुळे फळ खराब होत नाहीत.
  • कोवळी फळांची काढणी तीक्ष्ण कटर किंवा चाकूने वेळेवर, काळजीपूर्वक करावी. काढणी करताना एक दिवस जरी उशीर झाल्यास फळ परिपक्व होतात. दर कमी मिळतात. पॅकिंग करताना फळ घासली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.
  • गणेश सहाणे, ९६८९०४७१०० (लेखक खासगी कंपनीत वेलवर्गीय पीक पैदासकार आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com