पावसाने संत्र्यात ४० टक्के फळगळ; ४०० कोटींचे नुकसान

राज्यात पाण्याअभावी गेल्या हंगामात ३० टक्‍के क्षेत्र जळाले. आता संततधार पावसामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत ४० टक्‍के फळगळ झाली आहे. सुमारे ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचे नुकसान या माध्यमातून झाले आहे. हे प्रकार हंगामात सातत्याने येतात. त्या पार्श्‍वभूमीवर संत्रा उत्पादकांना हंगामात सातत्याने प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. त्याकरिता एनआरसीसीने पुढाकार घेणे अपेक्षित आहे. आधुनिक तंत्रज्ञान मिळाल्यास अशा अडचणींवर वेळीच मात करणे किंवा पीक संरक्षण उपाय करणे शेतकऱ्यांना शक्‍य होईल. त्या दृष्टीने देखील प्रयत्नांची गरज आहे. - श्रीधर ठाकरे, कार्यकारी अध्यक्ष, महाऑरेंज, नागपूर
संत्रा फळगळ
संत्रा फळगळ

नागपूर : राज्याचे मुख्य फळपिकांत महत्त्वाचे स्थान असलेल्या संत्र्यालाही मॉन्सूनोत्तर पावसाचा मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्रात एक लाख २० हजार हेक्‍टर क्षेत्रावर संत्रा लागवड असून यातील सुमारे ४० टक्‍के फळबागांमधील फळांना गळती लागल्याने सुमारे ४०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्रात १ लाख ८७ हजार लिंबूवर्गीय फळपिकांखालील क्षेत्र आहे. त्यांपैकी १ लाख २० हजार क्षेत्र संत्रा पिकाखालील आहे. एकट्या विदर्भात १ लाख २० हजार हेक्‍टर लिंबूवर्गीय फळपिकांचे क्षेत्र असून, त्यामध्ये संत्रा लागवड क्षेत्र १ लाख हेक्‍टर आहे. विदर्भातील एक लाख हेक्‍टर क्षेत्रापैकी सर्वाधिक ७० हजार हेक्‍टर क्षेत्र एकट्या अमरावती जिल्ह्यात आहे. त्यानंतर वर्धा, नागपूर, वाशीम, बुलडाणा या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. राज्याच्या नगर, औरंगाबाद, नांदेड या जिल्ह्यातही संत्रा उत्पादन घेतले जाते. 

सप्टेंबर, ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या पावसाचे पाणी बागेत साचल्याने आंबिया बहारातील फळांच्या देठाजवळ बुरशी (ब्राऊनरॉट) येते. पाण्यामुळे आर्द्रता वाढल्यास फायटोप्थोराचे जिवाणूदेखील वाढीस लागतात. पाणी वाऱ्याने झाडावर उडते; त्यामुळे फळ सडतात. शेतामध्ये पाणी साचून राहत मुळांना ऑक्सिजन न मिळाल्यास अशा परिस्थितीतदेखील फळगळ होते. राज्याच्या बहुतांश भागात पाण्यामुळे सर्वदूर अशीच स्थिती निर्माण झाली होती. बागेतील पाणी बाहेर जाण्यासाठी पर्यायच नसल्याने फळगळतीची समस्या सर्वदूर उद्भवली. त्यामुळे अमरावती विभागात २२, तर नागपूर विभागात दहा टक्‍के नुकसानीचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. 

दृष्टिक्षेपात संत्रा पीक..

  • लागवड क्षेत्र : १ लाख २० हजार हेक्‍टर
  • एकूण उत्पादन : ८ लाख टन उत्पादन (आंबिया व मृग बहार)
  • आंबिया : सरासरी ४ लाख टन
  • सध्याची फळगळ : १ लाख ६० हजार टन
  • सद्याचा सरासरी दर : २५ हजार रुपये टन
  • नुकसान : ४० टक्‍के, ४०० कोटी रुपये 
  • आंबिया बहाराची सरासरी एकूण उलाढाल १ हजार कोटी
  • असा बसला फटका...

  • आंबिया बहारातील बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला
  • फळ सडणे, गळ होण्याच्या प्रकारात वाढ
  • आंबिया बहारातील तोडणी आलेल्या फळांची मोठी गळ
  • रोगांच्या प्रादुर्भावामुळे तोडणीच्या फळांचे ४० टक्के नुकसान
  • मृग बहारातील फळे सध्या लिंबू आकारात; साईज खुंटण्याची भीती 
  • प्रतिक्रिया मृग बहारातील फळे ही लिंबाच्या आकाराची आहे. त्या पिकासाठी काही अंशी हा पाऊस पोषक ठरला. परंतु आंबिया बहारातील फळांसाठी घातक ठरला आहे. पाण्यामुळे झाडांची मुळे सडल्याने संपूर्ण झाडच पिवळे पडले. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भावही वाढीस लागल्याने फळगळ जास्त झाली. एक हजार कोटींची उलाढाल असलेल्या या पिकाचे ४० टक्‍के सरासरी नुकसान झाले आहे. - मनोज जवंजाळ,  संत्रा उत्पादक, काटोल, जि. नागपूर "माझ्याकडे १२०० झाडे आहेत. मृग बहारातील फळे घेतो. सुरुवातीला लहान फळे असताना गळ झाली आत्ताच्या पावसाने मात्र नुकसान झाले नाही. आंबिया बहार घेणाऱ्या आमच्या भागातील इतर शेतकऱ्यांना मात्र फटका बसला आहे. - मुकुंद ढोबाळे, संत्रा उत्पादक, उमरी, ता. कारंजा घाडगे, जि. वर्धा. माझ्याकडे पाच हजार संत्रा झाडे आहेत. पावसामुळे फायटोप्थोरा वाढीस लागला. परिणामी आंबिया बहारातील संत्र्याची गळ तसेच त्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला. संत्र्याचा आकारही योग्य नाही. परिणामी बाजारात मागणी नसल्यामुळे दरही मिळत नसल्यामुळे आमच्या अडचणीत वाढ झाली आहे. माझे सहकारी शेतकरी राजूभाऊ तिखीले यांच्या बागेतील ५०० झाडे मेली आहेत. डिंक्‍याचा देखील प्रादुर्भाव दिसून येत आहे. मृगाच्या संत्र्यांचा आकारही वाढला नाही. - मधुकर विठ्ठल नाकट,  संत्रा उत्पादक, हनवतखेडा, ता. अचलपूर, जि. अमरावती.   राज्यात १ लाख २० हजार हेक्‍टर क्षेत्रावर संत्रा तर ५५ हजार हेक्‍टरच्या आसपास मोसंबी लागवड आहे. यातील संत्र्याचेच काही अंशी नुकसान झाले आहे. परंतु ते ३०-३२ टक्‍केपेक्षा जास्त नसावे. शेतकऱ्यांना वेळोवेळी सल्ला देण्यासाठी दहा व्हॉटसअॅप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. व्हॉईस   मॅसेजच्या माध्यमातून दर १५ दिवसांनी संदेश दिला जातो. तीन ते चार हजार शेतकऱ्यांशी ‘सोशल कनेक्‍ट'' आहे. बागेत पाणी साचले तरच संत्र्यात समस्या उद्भवतात, त्यामुळे तीन ते चार फूट चर खोदून पाणी बागेबाहेर जाण्याची व्यवस्था केली पाहिजे. - डॉ. मिलिंद लदानिया,  संचालक, केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूर.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com