राज्यात पावसाने ५४ लाख हेक्टर क्षेत्र बाधित; सरकारची माहिती

पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार आहे. अनेक भागांत मोठे नुकसान, पंचनामे झाले नाही तरी चिंता करू नका. शेतकऱ्यांनी नुकसानीचे फोटो दाखवले तरी पुरावा म्हणून ग्राह्य धरून त्यांना सर्वतोपरी मदत करणार. - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यात पावसाने ५४ लाख हेक्टर क्षेत्र बाधित; सरकारची माहिती
राज्यात पावसाने ५४ लाख हेक्टर क्षेत्र बाधित; सरकारची माहिती

मुंबई : सततचा पाऊस, अतिवृष्टीने राज्यात ३२५ तालुक्यांतील ५४ लाख २२ हजार हेक्टर क्षेत्रावरील पीक बाधित झाले आहे. ज्वारी, मका, धान, तूर, कापूस, सोयाबीन आणि फळपिकांचे नुकसान झाले आहे. तसेच पंचनामे झाले नसले, तरी शेतकऱ्यांनी नुकसानीचे छायाचित्र दाखविल्यास मदतीस पात्र धरण्यात येणार असल्याचे आणि प्रभावित भागाचे तत्काळ ड्रोन सर्वेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.   पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि राज्य सरकारच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (ता.१) उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. या वेळी राज्याचे मुख्य सचिव, कृषी, मदत-पुनर्वसन, वित्त आणि विविध विभागांचे सचिव, हवामान विभाग, विमा कंपन्यांचे अधिकारी आणि व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते.  राज्यात एकूण १ कोटी ३८ लाख ७२ हजार ८६६ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. तर, सुमारे ३२५ तालुक्यांमध्ये ५४ लाख २२ हजार हेक्टरवरील ज्वारी, मका, धान, तूर, कापूस, सोयाबीन खरीप पिकांसह फळपिकं मोठ्या प्रमाणात बाधित झाली आहेत. प्रभावित भागाचे तत्काळ ड्रोन सर्वेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले. मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘यावर्षी अतिशय प्रचंड पाऊस झाला. एका सुपरसायक्लॉनसह ४ वादळं अरबी समुद्रात तयार झाली. या पावसाची तीव्रता ऑक्टोबरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात अधिक होती. पुरावा म्हणून स्थानिक गावकऱ्यांनी नुकसानीचे काढलेले छायाचित्रसुद्धा ग्राह्य धरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.’’  प्रशासनाने ही स्थिती संपूर्ण संवेदनशीलतेने आणि सर्वोच्च प्राधान्य देत हाताळावी, प्रत्येक शेतकऱ्याची समस्या ऐकून घेतली जाईल, यासाठी दुष्काळाच्या काळात उभारली, तशी यंत्रणा उभारावी, व्हॉटसअ‍ॅप क्रमांकसुद्धा संपर्कासाठी उपलब्ध करून देण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.  राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. नाशिकमध्ये दुष्काळी भागाची पाहणी करण्यास गेलेल्या कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या समोर शेतकरी अक्षरश: रडले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी यंत्रणा आणि विमा कंपनीला पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले असून ५३ हजार हेक्टरमध्ये फळपिकांचे नुकसान झाले आहे. कोकणात ४६, नाशिकमध्ये ५२ आणि नागपूर विभागात ४८ तालुके बाधित झाले आहेत.  शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडेही मदतीची मागणी करणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांचे हातातले पीक वाया गेल्यामुळे दु:ख आहे. पालकमंत्री, आमदारांनी आपापल्या भागांना भेट द्यावी. सरकार हा विषय अत्यंत गांभीर्याने हाताळणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ज्या शेतांमध्ये पंचनामा होऊ शकलेला नाही, अशाही लोकांना मदत देण्याचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक राज्य सरकार संपूर्णपणे स्थितीवर लक्ष ठेऊन असून, पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन स्थितीचे अवलोकन करावे, असे निर्देश या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. शनिवारी (आज) मंत्रिमंडळ उपसमितीची बैठकसुद्धा बोलाविण्यात आल्याची माहिती या वेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. प्राथमिक माहितीनुसार विभागनिहाय नुकसान

विभाग  तालुके  प्रभावित क्षेत्र (हेक्टर)
कोकण   ४६  ९७ हजार
नाशिक  ५२  १६ लाख
पुणे  ५१  १.३६ लाख
औरंगाबाद  ७२  २२ लाख
अमरावती  ५६  १२ लाख
नागपूर     ४८    ४० हजार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com