बुलडाणा ः अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम यंत्रणास्तरावर अंतिम टप्प्यात असून, मागील तीन-चार दिवसांत वेगवेगळी प्रपत्रे देण्यात आली आहेत. तसेच, पीकविमाधारकांकडून सुधारित प्रपत्र पुन्हा भरून घेण्याबाबत सुचविण्यात आले आहे. विमा लाभासाठी जिओ टॅगिंग करण्याच्या सूचना दिल्याने सर्वेक्षण यंत्रणा गोंधळात पडली आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना हे कागदी घोडे नाचविण्याचा फार्स कशासाठी सुरू आहे, याबाबत आता कर्मचारीही थेट प्रश्न करू लागले आहेत. याबाबत काही संघटनांनी थेट शासनाकडे निवेदने पाठवीत वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली आहे. संपूर्ण राज्यात ऑक्टोबरमधील अवकाळी पावसामुळे व अतिवृष्टीने शेतातील उभ्या पिकांचे तसेच काढणी केलेल्या पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. या आदेशानुसार ग्रामस्तरीय समिती (तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक) यांनी नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण करून पंचनामे पूर्ण केले. असे असताना नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत मागील तीन-चार दिवसांत दोन ते तीन प्रकारची वेगवेगळी प्रपत्रे देण्यात आली आहेत. पीकविमाधारकांनीही मागील १० दिवसांत सूचना फॉर्म व त्यासोबत पंचनाम्याचा फॉर्म भरून दिला आहे. या पंचनाम्यामुळे सुधारित प्रपत्र पुन्हा भरून घेणे शक्य नाही. नुकसानग्रस्त शेतकरी आधीच प्रचंड नुकसानामुळे वैतागलेला आहे. विमा भरताना त्याने आवश्यक असलेली संपूर्ण कागदपत्रे जोडली आहेत. असे असताना विमा कंपनी पुन्हा सर्व कागदपत्रांची मागणी करीत असल्याने शेतकऱ्यांचा रोष वाढलेला आहे. त्यातच पंचनाम्याचे प्रपत्र भरण्यासाठी कर्मचारी शेतकऱ्यांकडे गेल्यास आणखी रोष वाढण्याची शक्यता आहे. ग्रामस्तरीय समितीमार्फत पंचनामे पूर्ण केलेले असूनसुद्धा पंचनाम्यासोबत नुकसानग्रस्त शेताचा जिओ टॅगिंग केलेला फोटो काढण्याच्या सूचना आता दिल्या आहेत. परंतु, नुकसानाचे क्षेत्र रब्बी हंगामासाठी शेतकरी तयार करीत आहेत. अशा परिस्थितीत शेताचे जिओ टॅगिंग करणे शक्य राहिलेले नाही. ही वस्तुस्थिती असतानाही यंत्रणास्तरावर सातत्याने नवनवीन आदेश धडकत आहेत. यामुळे सर्वेक्षण करणाऱ्या यंत्रणा त्रस्त झाल्या आहेत. जिल्ह्यात सोयाबीन, मका, कापूस, ज्वारी या पिकांचे प्रचंड नुकसान उघड्या डोळ्यांनी दिसत असताना शासनाकडून कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार सर्वत्र आता टीकेस पात्र ठरू लागला आहे. सुधारित आदेशामुळे गोंधळ
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.