मराठा आरक्षणप्रश्‍नी मराठवाड्यात आंदोलन पेटले

मराठा आरक्षणासाठी आंदोलन
मराठा आरक्षणासाठी आंदोलन

औरंगाबाद : मराठवाड्यात विविध ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सुरू असलेले आंदोलन सोमवारी (ता. २३) अधिकच तीव्र झाले. अनेक ठिकाणी ठिय्या, रास्ता रोको आंदोलने करण्यात आली. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे आंदोलनाला हिंसक वळण लागले. कायगाव येथे गंगापूर तालुका सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने सोमवारी सकाळी सुरू झालेल्या ठिय्या आणि सामूहिक जलसमाधी घेण्याचा आंदोलनादरम्यान काकासाहेब दत्तात्रय शिंदे (वय २८) या युवकाने नदीत उडी घेतल्याची घटना घडली. त्याला नदीपात्राबाहेर काढून गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्‍टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. या घटनेनंतर आक्रमक झालेल्या आंदोलकांनी पुलावरच ठाण मांडले होते. परळीत सहाव्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरूच होते.

युवकाने घेतली जलसमाधी कायगाव, जि. औरंगाबाद : पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या  जुने कायगाव (ता.गंगापूर) येथे मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी गंगापूर तालुका सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने सोमवारी सकाळी १० वाजता सुरू झालेल्या ठिय्या आणि सामूहिक जलसमाधी घेण्याचा आंदोलनादरम्यान काकासाहेब दत्तात्रय शिंदे (वय २८) या युवकाने नदीत उडी घेतल्याची घटना घडली. त्याला नदीपात्राबाहेर काढून गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्‍टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. घटनेनंतर आक्रमक झालेल्या आंदोलकांनी पुलावरच ठाण मांडले. परिस्थिती हाताबाहेर गेल्याची माहिती मिळताच घटनास्थळी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी आंदोलन शांत करण्यासाठी प्रयत्न केले.

पार्डी फाटा येथे रास्ता रोको मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी (ता.२३) उस्मानाबाद जिल्ह्यातील पार्डी फाटा (ता. वाशी) येथील सोलापूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार भालचंद्र यादव यांनी स्वीकारले.

किनगाव येथे आंदोलन जालना जिल्ह्यातील किनगाव येथे रोहिलागड परिसरातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मराठा आरक्षण व नोकरभरतीत १६ टक्के जागा राखीव ठेवूनच भरती करण्यात यावी, या मागणीसाठी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलने आंदोलन करण्यात आले. या वेळी पोलिसांनी निवेदन स्वीकारले व आंदोलनाची माहिती वरिष्ठांना कळविण्याचे आश्वासन दिले.

परभणीत आंदोलनाला हिंसक वळण परभणी : मराठा समाज आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सोमवारी (ता.२३) गंगाखेड (जि. परभणी) येथे पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागले. आंदोलनकर्त्यांनी ६ एसटी बस, ४ ट्रॅव्हल बसवर दगडफेक केली. एक एसटी बस जाळण्यात आली. वार्तांकन करणाऱ्या दोन पत्रकारांसह लहान मुलांना जबर मारहाण करण्यात आली. राष्ट्रवादीचे आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांचे कार्यालय, मनसेचे कार्यालय, पोलिसांच्या जीपवर दगडफेक करून काचा फोडल्या. पोलिस प्रशासनाने दंगल नियंत्रण पथकास पाचारण केले. नांदेड जिल्ह्यातील मालेगाव (ता. अर्धापूर) येथे वसमत- नांदेड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच कंधार येथील तहसील कार्यालयासमोर माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यात आले.

परळी येथे ठिय्या आंदोलन सुरुच

बीड  : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, आरक्षण देईपर्यंत मेगा भरती रद्द करावी, यांसह अन्य मागण्यांसाठी परळी येथे बुधवारी मराठा क्रांती मोर्चातर्फे ठोक मोर्चानंतर सुरू करण्यात आलेले ठिय्या आंदोलन सोमवारी (ता. २३) सहाव्या दिवशीही सुरूच होते.

दरम्यान, या आंदोलनाला पाठिंबा म्हणून रविवारी केज येथे आमदार संगीता ठोंबरे यांच्या घरासमोर घंटानाद करण्यात आला. आडस (ता. केज) येथे रास्ता रोको आणि धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच, परळी येथील ठिय्या आंदोलनस्थळी बालू गायकवाड या तरुणाने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी तत्काळ त्याच्या हातातील साहित्य घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

परळी येथे मराठा क्रांती मोर्चातर्फे निघालेल्या राज्यातील पहिल्या ठोक मोर्चा व ठिय्या आंदोलनाचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. जिल्ह्यातही ठिकठिकाणी आंदोलनाच्या समर्थनार्थ धरणे, ठिय्या, रास्ता रोको, बंद, घंटानाद आंदोलने केली जात आहेत. परळी येथील आंदोलनाला प्रतिसाद वाढतच आहे. राजकीय पदाधिकारी आणि काही आमदारांनी ही ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला आहे. मेगा भरती रद्द होईपर्यंत आंदोलन मागे घ्यायचे नाही, असा आंदोलकांनी पवित्रा घेतला आहे. आंदोलनात रात्री भजन, कीर्तन असे कार्यक्रम होत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com