पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने

मराठा आरक्षणासाठी आंदोलन
मराठा आरक्षणासाठी आंदोलन

पुणे : मराठा आरक्षणासाठी औरंगाबाद जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदाेलनादरम्यान सोमवारी काकासाहेब शिंदे यांचा मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद मंगळवारी (ता.२४) जिल्ह्यात उमटले. विविध तालुके आणि गावांमध्ये काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर गावांतून मोर्चे काढण्यात आले. बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या हाेत्या. पुण्यामध्ये दुचाकी रॅली काढून सरकारचा निषेध करण्यात आला. बारामती, इंदापूर, दाैंड, पुरंदर, जुन्नर आदी तालुक्यांमध्ये विविध संघटनांनी माेेर्चे काढून सरकारच्या विराेधात घाेषणा दिल्या.

बारामतीत हिंसक वळण बारामती ः मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला बारामतीमध्ये हिंसक वळण लागले. मोर्चेकऱ्यांनी प्रशासकीय भवनावर जोरदार दगडफेक केली. दुसरीकडे निघालेल्या मोर्चात हातगाड्यावरील फळे पडल्याच्या कारणावरून दोन गटांत जोरदार दगडफेक झाली. मोर्चेकऱ्यांनी प्रशासकीय भवनावर मोर्चा काढला. यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी अभियांत्रिकी भवनमधील काच फोडली आणि त्यापाठोपाठ पाेलीस वाहने आणि बसस्थानक परिसरात जोरदार दगडफेक सुरू झाली. पाेलिसांनी दगडफेक न करण्याचे आवाहन केले.

यानंतर एसटीने आपली सेवा बंद केल्याने प्रवाशांबराेबरच विद्यार्थ्यांचे हाल झाले. खासगी वाहनांनी विद्यार्थ्यांना घरी पाठविण्यात आले. यानंतर शहराबराेबरच भिगवण रस्ता परिसरातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या हाेत्या. नीरा, पाटस, सुपा, देऊळगाव राजा रस्त्यावर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करीत रास्ता राेकाे केला. या वेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून रस्त्यावर टायर पेटवून दिले.

यवत येथे सर्व व्यवहार बंद यवत, ता. दाैंड : येथे आंदोलनाला पाठिंबा म्हणून कडकडीत बंद पाळण्यात आला. सोमवारी रात्री उशिरा येथील काही कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन बंदचा निर्णय घेतला. त्यामुळे मंगळवारी सकाळी बाजारपेठ उघडलीच नाही. बॅंका, शाळा व इतर सरकारी कार्यालयांचा अपवाद वगळता संपूर्ण व्यवहार बंद होते.

मंचर येथे बंदला प्रतिसाद मंचर, ता. आंबेगाव : मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी (ता.२४) महाराष्ट्र बंदचे अावाहन केले होते. या आवाहनाला मंचरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. सुनील बांगर यांच्या नेतृत्वाखाली मंचर शहरातून काढण्यात आलेल्या मोर्चाला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

वाल्हे येथे कडकडीत बंद वाल्हे, ता. पुरंदर ः सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी परळी येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्वपक्षीय सकल मराठा समाजाच्या वतीने वाल्हे (ता. पुरंदर) येथे मंगळवारी (दि.२४) कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी अकरा वाजता मराठा समाजबांधवांनी एसटी बस स्थानकाशेजारील महात्मा फुले पुतळ्यापासून वाल्हे गावात निषेध फेरी काढली. गुळुंचे येथेदेखील माेर्चा काढण्यात आला हाेता.

भिगवण येथे रास्ता रोको भिगवण, ता. इंदापूर ः सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला येथील व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मराठा समाजाच्या मागणीस विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी पाठिंबा देत मंगळवारी (ता.२४) सकाळी मोर्चा काढून पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलनही केले. बंदबाबतची माहिती व्यावसायिकांना आधीच मिळाल्यामुळे मंगळवारी बहुतेक व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवले होते. येथे अत्यावश्यक सेवा वगळता जवळपास शंभर टक्के व्यवहार बंद  होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com