राज्यात आंदोलनाची धग कायम

मराठा आरक्षणासाठी आंदोलन
मराठा आरक्षणासाठी आंदोलन

पुणे  : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तिसऱ्या दिवशीही (गुरुवारी, ता.२६) राज्यातील अनेक भागांत रास्ता रोको, रेल रोको आंदोलन तसेच जाळपोळ, दगडफेकीचे प्रकार घडले. आंदोलनाच्या दणक्याने मुख्यमंत्री बदलाच्या सुरू झालेल्या चर्चेत फडणवीस समर्थक काही अपक्ष आमदारांनी राजीनाम्याचा इशारा दिला आहे. दुसऱ्या बाजूला आरक्षणासाठी भाजपमध्येच उघड गट पडले असून, एका आमदाराने राजीनामा दिला आहे. पदाधिकारीदेखील पदे सोडत असल्याने सरकारसमोरील डोकेदुखी वाढली आहे.

सकल मराठा समाजाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी नवी मुंबई व ठाण्यातील बंद मागे घेतल्याची घोषणा बुधवारी दुपारी केल्यानंतरदेखील हिंसक घटना घडत होत्या. आमच्या आंदोलनाआडून काही समाजकंटक हिंसक घटना घडवत असावेत, असा संशय श्री. पवार यांनी व्यक्त केला. तसेच, आंदोलनात समाजविघातक प्रवृत्ती घुसल्याचा संशय माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी देखील व्यक्त केला आहे. 

नवी मुंबई, ठाण्यात गुरुवारी सकाळीदेखील आंदोलन सुरूच होते. सिंधुदुर्गात गुरुवारी आंदोलकांनी मुंबई-गोवा मार्गावर अडथळे उभारले होते. लोणावळ्याजवळ पुणे-भुसावळ रेल्वे रोखण्यात आली. मनमाडलादेखील रेल रोको आंदोलन झाले. पुण्यातील वारजे भागात रास्ता रोको करताना आंदोलकांना अटक करण्यात आली. सकल मराठा समाजाने बार्शी तालुका बंदची हाक दिली होती. आंदोलकांनी सोलापूर राज्यमार्गावर पानगावात टायर जाळून संताप व्यक्त केला.

सोलापूर-कुर्डुवाडी मार्गावर एक बसदेखील पेटवून देण्यात आली. औरंगाबाद-सोलापूर मार्गावर जामखेड फाट्याजवळ रास्ता रोको करण्यात आले. सांगलीतील शिराळा तालुक्यात बंदला हिंसक वळण लागल्याने एक बस पेटविण्यात आली. ताकारी-इस्लामपूर मार्गावर तीन बसेस फोडण्यात आल्या.

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठवाड्यात आणखी एका आंदोलकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रशांत सवराते (आलेगाव, जि. परभणी) या तरुणाने विष प्राशन केले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. जालना, परभणीत आंदोलकांनी दगडफेक केली. परभणी येथे दगडफेकीत काही पोलिस जखमी झाले. बीड जिल्ह्यातील परळी येथे आरक्षणासाठी नवव्या दिवशीदेखील ठिय्या आंदोलन सुरू होते. या ठिकाणी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी भेट दिली. आरक्षणाची फाइल माझ्याकडे नाही; अन्यथा मी एका क्षणात आरक्षण दिले असते, अशा शब्दांत त्यांनी आंदोलकांना पाठिंबा दर्शविला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी राजीनामा दिला. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनीही आमदारकीचा राजीनामा दिला.या गोंधळात मराठा आरक्षणासाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवड-देवळा भागातील भाजप आमदार डॉ. राहुल दौलतराव आहेर यांनीही आमदारकीचा राजीनामा दिला. मराठा आरक्षणाच्या मागणीस पाठिंबा देण्यासाठी भाजपचे आमदारच नव्हे, तर पक्षीय पदाधिकारीदेखील राजीनामे देऊ लागल्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे. भाजपचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनीही राजीनामा दिला आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव पंचायत समिती उपसभापती पदाचा सुशील साळुंके यांनी राजीनामा दिला, तर जालन्याचे उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनीदेखील राजीनामा दिला.

चर्चेने आरक्षणाचा प्रश्न सुटेल का ः पृथ्वीराज चव्हाण मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कोणत्याही जाती, धर्मातील मराठी तरुणाने आत्महत्या करू नये, असे आवाहन केले. झेपत नसेल तर सत्तेतून पायउतार व्हा, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत आंदोलकांशी चर्चेची तयारी दर्शविली असली तरी नेमकी काय चर्चा करणार, असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला. हा प्रश्न चर्चेने प्रश्न कसा सुटेल, चर्चेत काय मुद्दे असतील? चर्चेसाठी येणाऱ्या प्रतिनिधींबाबत काय मोजपट्टी लावणार, असे प्रश्न श्री. चव्हाण यांनी उपस्थित केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com