सोलापूर येथे सहकारमंत्री, पालकमंत्र्यांच्या घरासमोर आसूड ओढो आंदोलन

मराठा आरक्षणासाठी आंदोलन
मराठा आरक्षणासाठी आंदोलन

सोलापूर   ः मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर सोलापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी (ता. २७) सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या सोलापुरातील घरासमोर आसूड ओढो आंदोलन करण्यात आले. या वेळी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देताना दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी दोन्ही मंत्र्यांच्या घराबाहेर बंदोबस्त ठेवला होता; पण आंदोलनकर्त्यांनी ठरल्याप्रमाणे घराजवळच आंदोलन केले. त्यामुळे तणाव निर्माण झाला.

पालकमंत्री देशमुख यांच्या घरासमोर डफरीन चौकाकडून जुन्या एम्प्लॉयमेंट चौकाकडे जाणारी वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आली होती. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून एकेरी वाहतूक सुरू होती. पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलक आल्यानंतर त्यांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. पालकमंत्र्यांच्या घरासमोर आसूड ओढल्यानंतर मराठा समाजाचे कार्यकर्ते सहकारमंत्री देशमुख यांच्या होटगी रोडवरील घराकडे निघाले. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोरही मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सहकारमंत्री देशमुख यांच्या घराकडे जाण्यापूर्वी पोलिसांनी आंदोलकांना थांबवले. पण आंदोलक त्यांच्या घरापर्यंत पोचलेच. पोलिसांकडून झालेली अडवणूक आणि आंदोलनकर्त्यांची ठाम भूमिका, यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. या ठिकाणी मराठा समाजातील प्रमुखांची भाषणे झाली. सहकारमंत्री देशमुख यांच्या घरासमोर आंदोलनाच्या ठिकाणी भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवारही आले. त्यांचेही भाषण झाले. मी जरी भाजपचा जिल्हाध्यक्ष असलो, तरी प्रथम मी मराठा असल्याचेही श्री. पवार यांनी सांगितले.

या वेळी राजन जाधव, अमोल शिंदे, विनोद भोसले, प्रवीण डोंगरे, इंद्रजित पवार, गणेश डोंगरे उपस्थित होते. दुसरीकडे संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे नगरसेवक अमोल शिंदे, कॉँग्रेसचे नगरसेवक विनोद भोसले यांनी मराठा समाजाच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप केला. पण आता आम्ही शांत बसणार नाही, हा लढा आणखी तीव्र करू, असे सांगताना येत्या सोमवारी आपण नगरसेवक पदाचा राजीनामा देणार असल्याचे या वेळी जाहीर केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com