मागण्या मान्य न झाल्यास १ ऑगस्टपासून जेलभरो

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई  : मराठा आरक्षणावरून सकल मराठा क्रांती मोर्चा आणि राज्य सरकारमधील तिढा सुटण्याएेवजी अधिकच चिघळण्याची चिन्हे आहेत. मराठा आरक्षणाबाबत सरकारने दोन दिवसांत ठोस निर्णय न घेतल्यास येत्या १ ऑगस्टपासून सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाने राज्यभर जेलभरो आंदोलनाची हाक दिली आहे.

मराठा आरक्षणासंदर्भातील लढ्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी शनिवारी (ता. २८) मुंबई येथे बैठक बोलवण्यात आली होती. बैठकीनंतर मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी राज्य सरकारला हा इशारा दिला आहे. २५ जुलै रोजी मराठा क्रांती मोर्चाने मुंबई बंदची हाक दिली होती. या बंदमध्ये ठाणे, कल्याण आणि मुंबईच्या काही भागांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या. आंदोलनकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीत काही पोलिस कर्मचारीही जखमी झाले होते. यानंतर पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांवर सरकारी मालमत्तेचे नुकसान आणि पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. ‘बंद’ दरम्यान मराठा तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे सांगत हे गुन्हे मागे घेण्याची मागणी बैठकीत करण्यात आली आहे. याचसोबत कळंबोली येथे मराठा समाजातील महिलांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्ज आणि गोळीबार प्रकरणाची चौकशी करून, संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करावे, अशीही मागणी या वेळी करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या नेत्यांना चर्चेचे आमंत्रण दिले आहे. मात्र, सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाचा कोणताही नेता व समन्वयक या चर्चेत सहभागी होणार नसल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. चर्चेला जाणाऱ्यांना समाज धडा शिकवेल. कारण, मुख्यमंत्र्यांना सर्व मागण्या माहिती आहेत. त्यावर ठोस निर्णय घ्यावेत. उगाच आंदोलकांमध्ये फूट पाडू नये. मुख्यमंत्री व महसूलमंत्री यांनी मराठा समाजाविषयी जातीवाचक बोलून समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल व बंद दरम्यान झालेल्या हिंसेची जबाबदारी स्वीकारून समाजाची जाहीर माफी मागत राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

येत्या दोन दिवसांत या मागण्यांवर कार्यवाही न झाल्यास मुंबईसह संपूर्ण राज्यात येत्या १ ऑगस्टपासून आंदोलनाची धार अधिक तीव्र करून जेल भरो आंदोलन केले जाईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी दिला आहे. बैठकीत यासंदर्भातील ठराव संमत करून पुढील आंदोलनासाठी मराठा समाजाने सज्ज व्हावे, असे आवाहनही सकल मराठा समाज महामुंबई यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com