लातूर येथील धरणे आंदोलन मागे; तूर, हरभऱ्याचे पैसे जमा करणे सुरु

लातूर येथील आंदोलन मागे
लातूर येथील आंदोलन मागे

लातूर : तूर व हरभरा खरेदीचे पैसे शासनाने तातडीने द्यावेत या मागणीकरिता गेल्या दोन दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येथील जिल्हा पणन अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते. या आंदोलनस्थळी मंगळवारी रात्री मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांनी भेट दिली. आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. तसेच, वरिष्ठांशी संपर्कही साधला. शासन शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करीत असल्याचे निदर्शनास आणून दिले. येत्या तीन ते चार दिवसांत सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील, अशी ग्वाहीही दिली. त्यानंतर हे आंदोलन बुधवारी मागे घेण्यात आले.

शेतकऱ्यांकडून तूर आणि हरभरा शासनाने हमीभावाने खरेदी केला होता. शासनाकडून लाखो क्विंटलची खरेदी करण्यात आली होती. पण या खरेदीचे पैसे चार महिन्यांपासून मिळालेले नव्हते. शासनाने हे पैसे तातडीने द्यावेत याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारपासून जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते.

मंगळवारीदेखील दिवसभर हे आंदोलन सुरू राहिले. रात्री मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. शासन शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करीत आहे. जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या चार ते पाच दिवसांत सर्व रक्कम जमा होईल. याकरिता त्यांनी संबंधित खात्याच्या वरिष्ठांशी संपर्क साधून चर्चा केली.

आतापर्यंत एक हजार ८७३ शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा कोटी ७२ लाख रुपये जमा करण्यात आल्याची माहितीही या वेळी देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या मध्यस्थीने पदाधिकाऱ्यांनी हे उपोषण मागे घेतले आहे. बुधवारी काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले, अशी माहिती संघटनेचे विभागीय अध्यक्ष सत्तार पटेल यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com