सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस वेग

स्ट्राॅबेरी लागवड
स्ट्राॅबेरी लागवड
सातारा : जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी, वाई, कोरेगाव, पाटण व सातारा तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवडीस वेग आला आहे. जिल्ह्यात या हंगामात सुमारे चार हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरी लागवड होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दिवाळी सणास स्ट्रॉबेरी उपलब्ध होण्यासाठी लागवडीचे प्रयत्न सुरू असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. 
 
जिल्ह्यात महाबळेश्वर, जावळी, वाई, कोरेगाव, पाटण व सातारा तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवड केली जाते. सर्वाधिक लागवड महाबळेश्वर तालुक्‍यात होते. त्यानंतर जावळी, वाई, कोरेगाव, सातारा व पाटण या तालुक्‍यांत लागवड केली जाते. या हंगामासाठी लागणारी मातृवृक्ष परदेशातून वेळेत आल्याने योग्यवेळी रोपे तयार करता आली आहेत. यामुळे प्रत्येक वर्षीप्रमाणे सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीपासून स्ट्रॉबेरी लागवडीस प्रारंभ झाला आहे.
 
ज्या शेतकऱ्यांनी लागवडीसाठी जमीन तयार करण्याकरिता अगोदर मेहनत घेतली अशा ठिकाणी लागवडीची कामे वेगात सुरू आहेत. मात्र महाबळेश्वरसह इतर तालुक्‍यांत जोरदार पाऊस सुरू असल्याने शेतजमीन तयार करण्यास अडथळा येत आहे. 
अधूनमधून येणारा पाऊस डोकेदुखी ठरत आहे. दिवाळी सणासाठी महाबळेश्वर व पाचगणी शहरांत मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. यामुळे या सणाच्या दरम्यान स्ट्रॉबेरी विक्रीस उपलब्ध झाल्यास चांगला दर मिळण्यास मदत होते. यामुळे शेतकरी लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहेत.
 
सध्या २५ ते ३० टक्‍क्‍यांदरम्यान स्ट्रॉबेरीची लागवड झाली असून, पावसाने साथ दिल्यास या महिन्याअखेरपर्यंत बहुतांशी लागवडीचे काम होण्याची शक्‍यता आहे. मात्र दमदार पाऊस सुरू राहिल्यास करण्यात आलेल्या लागवडीचे अतिपाण्यामुळे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. तसेच शिल्लक असलेल्या लागवडीचा काळ पुढे जाण्याची शक्‍यता आहे. लागवडीत विंटरडाउन, कॅमरोझा व नॉभिला या जातींची सर्वाधिक लागवड केली जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
 
कृषी विभागाच्या सहकार्यातून १५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ग्रीन हाउसची उभारणी केली आहे. यामुळे ऐन पावसातही महाबळेश्वर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी रोपे तयार करता येत आहेत. याचा फायदा लागवडीस होत असून, खर्चातही मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com