हिंगोली :आपत्तीवेळी सर्वांनी समन्वयाने काम करावे : जिल्हाधिकारी

आपत्तीवेळी सर्वांनी समन्वयाने काम करावे : जिल्हाधिकारी जयवंशी
आपत्तीवेळी सर्वांनी समन्वयाने काम करावे : जिल्हाधिकारी जयवंशी

हिंगोली : आगामी पावसाळ्यात जिल्ह्यातील ७० पूरप्रवण गावे गृहीत धरून आपत्ती परिस्थितीत सर्व विभागांनी परस्परात समन्वय ठेवून कामे करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात माॅन्सून पूर्वतयारी बैठक झाली. या वेळी जयवंशी बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक किशोर श्रीवास, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे आदी उपस्थित होते.

जयवंशी म्हणाले, ‘‘तालुका स्तरावर तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांनी नियंत्रण कक्ष स्थापन करावा. तालुका आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करावा. त्यामध्ये पूरप्रवण गावांचा समावेश करावा. पोलिस प्रशासनाने पोलिस स्टेशननिहाय अधिकाऱ्यांची नावे, भ्रमणध्वनीची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयास सादर करावी.’’

‘‘तालुकानिहाय शोध, बचाव पथक अद्ययावत करावे. आरोग्य विभागानेही नियंत्रण कक्ष स्थापन करून व्यवस्थापनासाठी नियुक्ती करावी. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासह इतर संबंधित विभागांमध्ये समन्वय राखावा. नगरपालिका प्रशासनानेही नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावा. अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवावी. नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. वस्त्यांमध्ये पाणी शिरू नये, यासाठी नाल्याची दुरुस्ती करावी,’’ अशा सूचनाही त्यांनी दिल्या.  

रेल्वे प्रशासन, राज्य परिवहन महामंडळ, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, भारत संचार निगम लिमिटेड, राज्य राखीव पोलिस दल, गृहरक्षक दल या बरोबरच आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित विभागांनाही सूचना देण्यात आल्या. आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. दूरध्वनी क्रमांक ०२४५६-२२२५६०, तर टोल फ्री क्रमांक १०७७ वर संपर्क साधावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com