agriculture news in marathi,american fall army warm on maize crop, buldhana, maharashtra | Agrowon

मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर हेक्टरवर लष्कर अळीचा प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 जुलै 2019

मी या वर्षी ११ एकरांत मक्याची लागवड केली आहे. आजवर सर्वांत चांगले पीक दिसून येत आहे. मात्र, या वर्षी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अळीला नियंत्रणात आणण्यासाठी महिनाभरातच दोन वेळा फवारणी करावी लागली. इतक्या वर्षांत कधीही मक्यावर फवारणी करावी लागलेली नाही. यंदाची परिस्थिती मात्र वेगळी ठरली आहे. सध्या चांगले दिसत असलेल्या या पिकाची खूप काळजी घ्यावी लागत आहे.
- विठ्ठलराव पाटील, मका उत्पादक, कोथळी, जि. बुलडाणा

बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात अव्वल असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा, देऊळगावराजा या तालुक्यांतील काही गावांत १०० हेक्टरवर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. या ठिकाणी कृषी अधिकारी व शास्त्रज्ञांनी तातडीने भेटी देऊन उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे सुरुरू केले आहे. 

गेल्या हंगामात आलेले या अळीचे संकट अद्याप मोठ्या प्रमाणात नसले, तरी सुरवात मात्र झाली आहे. जिल्ह्यात दोन ते तीन टक्के प्रमाणात ही अळी असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बुलडाणा जिल्ह्यात मक्याचे सरासरी क्षेत्र ६१,११५ हेक्टर आहे. या वर्षी अनियमित पावसामुळे हे संपूर्ण क्षेत्र लागवडीखाली आलेले नाही. आतापर्यंत २१ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर मका लागवड झाली आहे. मोताळा तालुक्यात ५५८१ हेक्टरवर, तर देऊळगावराजा तालुक्यात २१४ हेक्टरवर मका लागवड झाली आहे. या वर्षी घाटाखालील तालुक्यांमध्ये मक्याची लागवड वाढली आहे.

या वर्षी घाटाखाली लागवड वाढण्यास चाराटंचाई तसेच गेल्या वर्षात मक्याला मिळालेला भाव कारणीभूत मानला जात आहे. पाऊस लांबल्याने मूग, उडदाचे क्षेत्र कापूस व मक्यात परावर्तित झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. सध्या हे पीक एक ते दीड महिना कालावधीचे झालेले आहे. दोन ते अडीच फुटांपर्यंत झाडांची वाढ झालेली असून, शेतकरी सध्या फवारणीचे काम करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी अळीची धास्ती घेत एक ते दोन वेळा कीटकनाशकांच्या फवारण्या केल्या आहेत.

कृषी विभागाकडून मक्यावरील या अळीच्या नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात फेरोमोन ट्रॅप्स लावले जाणार आहेत. हे ट्रॅप एक ते दोन दिवसांत जिल्ह्यात दाखल होणार असल्याची माहिती आहे. दैनंदिन निरीक्षणे घेतली जात असून, अळीचा प्रादुर्भाव मोताळा व देऊळगावराजा या दोन तालुक्यांतील काही गावांमध्येच दिसून आलेला आहे.  

प्रतिक्रिया

सध्या या अळीचे दोन टक्क्यांपर्यंत प्रमाण दिसून आले आहे. यामुळे यंत्रणांना तातडीने सर्वेक्षण सुरू करण्याचे निर्देश दिले. शासनाच्या वतीने सर्वत्र फेरोमोन ट्रॅप लावणार आहे. दोन दिवसांत याची अंमलबजावणी सुरू होईल. शेतकऱ्यांना फवारणीबाबतही सूचना केलेल्या आहेत. अद्याप अळीने नुकसान पातळी गाठलेली नाही.
- नरेंद्र नाईक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा

बुलडाणा उपविभागात मोताळा तालुक्यात परडा गावात सात ते आठ ठिकाणी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. प्रमाण तितके नाही. सध्या मक्याचे पीक लहान असून, त्यावर फवारणी करता येते. फवारणीची आपण शिफारस केली आहे. शिवाय, फेरोमोन ट्रॅप लावण्याचाही सल्ला दिला आहे. लवकरच ग्रामीण भागात मेळावे सुरू केले जाणार आहे. क्रॉपसॅपअंतर्गत कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेतले. त्यात कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. त्यांना प्रत्यक्ष पाहणी करून उपाययोजना करण्याचे सांगण्यात आले.
- संतोष डाबरे, उपविभागीय कृषी अधिकारी, बुलडाणा

आतापर्यंत एक ते दोन गावांत लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. तेथे आम्ही भेट दिली. आर्थिक नुकसान पातळीच्या (पाच टक्क्यांच्या आत) खाली ही अळी सध्या आहे. देऊळगावराजा तालुक्यातही काही ठिकाणी ही अळी दिसून येत असल्याची माहिती आहे. धाड परिसरात जनुना गावाला भेट दिली तेथे अळीचा प्रादुर्भाव दिसून आला नाही. विद्यापीठाअंतर्गत बुलडाणा येथील संशोधन केंद्राच्या वतीने मकापिकाकडे लक्ष ठेवून आहोत. विद्यापीठाच्या पुढाकाराने टाकळी, मढ या गावात मेळावा घेतला. तसेच, विद्यापीठाने यूपीएलसोबत करार करून टाकळी (धाड), सोयगाव ही दोन गावे दत्तक घेतली आहेत. यानुसार विद्यापीठ तांत्रिक मार्गदर्शन करीत असून, यूपीएल त्यांचे लेबलक्लेम कीटकनाशके वापरण्यासाठी देत आहे. इतर गावांमध्ये कृषी संशोधन केंद्र व कृषी विभाग संयुक्त काम करीत आहेत.
- डॉ. सी. पी. जायभाये, सहयोगी प्राध्यापक, कृषी संशोधन केंद्र, बुलडाणा

मी बुलडाणा जिल्ह्यात जनुना तसेच इतर गावांत मकापिकाची पाहणी केली. लष्करी अळीची नुकतीच सुरवात झाल्याचे दिसून आले.  याशिवाय, नेहमीचा खोड किड्याचा प्रादुर्भाव दिसला आहे. खोड कीडा ही किड दरवर्षी दिसून येते. शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी, याबाबतचे शेड्यूल कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले असून, ते गावपातळीवर आता यानुसार मार्गदर्शन करीत आहेत. 
- डॉ. अनिल कोल्हे, मुख्य पीकसंरक्षण अधिकारी, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ. 


इतर ताज्या घडामोडी
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
‘एफएसएसएआय’च्या नव्या ‘सीईओ’विषयी...पुणे: भारतीय अन्न सुरक्षितता व मानके...
‘म्हैसाळ’मधून पाणी सोडण्याच्या हालचालीसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी...
पीकविमा र‍कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता...अमरावती  ः पीकविम्याची रक्‍कम कर्ज खात्यात...
बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांत दहशतअमरावती  ः गावशिवारात एकाच आठवड्यात दोनदा...
पिंपळनेरला कांदा मार्केट दोन मार्चला...पिंपळनेर, जि. धुळे : शेतीमाल विक्रीनंतर...
जळगावात आले २२०० ते ४८०० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
जळगाव जिल्ह्यात रब्बीचा पेरा १७१ टक्केजळगाव  ः रब्बी हंगामातील उत्पादनाची...
 शेतकरी केंद्रित अर्थसंकल्पाचा दावा फोलकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १...
वीज बिले न भरण्याचा ‘स्वाभिमानी’चा...सातारा  ः जावळवाडी (ता. सातारा) येथील मुख्य...
कोकणासह नवा महाराष्ट्र घडवूया :...रत्नागिरी  ः आकडा सांगण्यापेक्षा कृतीला...
कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी आता...नाशिक  : केंद्र सरकारने निर्यातबंदी केल्याने...
भाजपचे राज्यात २५ ला धरणे आंदोलन :...मुंबई : भारतीय जनता पक्ष येत्या मंगळवारी (ता. २५...
सांगलीत साडेसहा हजार शेतीपंपांच्या वीज...सांगली  ः  जिल्ह्यातील २०१८ पूर्वीच्या...
‘वनामकृवि’त सोयाबीनच्या पैदासकार ...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या...