Intercrops Cultivation : आंतरपिके, सापळा पीकपद्धती

बाजरी आणि तूर आंतरपीक पद्धती
बाजरी आणि तूर आंतरपीक पद्धती

अलीकडे अनेक शेतकऱ्यांनी पर्यावरणपूरक म्हणून सेंद्रिय शेतीवर भर दिला आहे. मात्र, ही शेती करताना मशागतीपासून ते काढणीपर्यंतचे त्यातील पीक व्यवस्थापन पद्धती माहिती असणे गरजेचे आहे. आंतरपीक किंवा मिश्र पीक पद्धती हा सेंद्रिय शेतीचा गाभा आहे.

पेरणीचे नियोजन दक्षिणोत्तर पेरणी शेतजमीन चढउताराची असल्यास कंटूर पद्धतीने पेरणी करावी. जमीन समपातळीत असेल तर दक्षिणोत्तर पेरणी करावी. त्यामुळे दिवसभराची सूर्यकिरणे झाडाच्या संपूर्ण भागावर पडतील व प्रकाश संश्लेषण क्रिया (Photosynthesis) वाढल्याने उत्पादन वाढेल.

झाडांनी जास्त सूर्यशक्ती खेचल्याने उत्पादन वाढते. सूर्यशक्तीचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेता कोणतेही पीक दक्षिणोत्तर पेरावे. जमिनीचा उतार जास्त असेल तर कंटूर पद्धतीचा वापर करावा. पिके रात्री कार्बन डायऑक्साईड वायू वातावरणात सोडतात. तो वायू पूर्व पश्चिम दिशेने वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर शेताबाहेर जाऊ नये म्हणून पेरणी दक्षिणोत्तर करावी.

त्यामुळे कार्बन डायऑक्साईड वायू शेतातच राहतो व प्रकाश संश्लेषण क्रियेला मदत करतो. दक्षिणोत्तर पेरणीचे महत्त्व शेत मोठे असेल तर दक्षिणोत्तर दिशेने ठरावीक अंतरावर जैविक बांध (गजराज गवत ओळ) घातले तर कार्बन डायऑक्साईड वायू अडेल व झाडांच्या वाढीला मदत करेल. पिकांची पेरणी दक्षिणोत्तर केल्याने उत्तर व दक्षिण ध्रुवाच्या चुंबकीय परिणामामुळे (Polar Magnetic effect) पिकाच्या वाढीवर अनुकूल परिणाम होतो.

चुंबकीय लाटांमुळे (Magnetic resonance waves) पिकांचे उत्पादन वाढते असा शास्राज्ञांचा दावा आहे. पेरणीचे अंतर कृषी विद्यापीठांनी प्रत्येक पिकांची पेरणी किती अंतरावर करावी याच्या शिफारसी केल्या आहेत. त्यात थोडा फरक करावा लागेल. टोकण पद्धतीत उदा. कापसात दोन ओळींतील अंतर दोन झाडातील अंतरापेक्षा १५ ते ३० सेंमीपेक्षा जास्त असावे. कापूस लागवड ९० बाय ९० सेंमी, ६० बाय ६० सेंमी, १२० बाय १२० सेंमी यापेक्षा ९० बाय ६० सेंमी किंवा ६० बाय ४५ सेंमी अंतरावर करावी.

आपल्या जमिनीचा पोत तसेच मागील काही वर्षांचा अनुभव लक्षात घेऊन अंतर किती ठेवावे हा निर्णय स्वतःलाच घ्यावा लागेल. दोन ओळीतील अंतर, दोन झाडांच्या अंतरापेक्षा जास्त ठेवल्याने फायदा होतो. टोकण केलेल्या पिकात उभी व आडवी आंतरमशागत करता येते. पीक वाढल्यानंतर एक वेळ अशी येते की फक्त एकेरीच व तीही शेवटची कोळपणी देणे शक्य असते.

त्या वेळी वखाराच्या फासाला पोते बांधून पाळी दिली तर कपाशीच्या बुडाशी जास्तीत जास्त माती लागेल. त्यामुळे बुडाशी जास्त दिवस ओलावा टिकून राहील. पाण्याचा ताण पडल्यावर जमिनीला भेगा पडून बोंडाची होणारी गळ होणार नाही. सर्वच पिकांच्या बाबतीत हे तंत्र अवलंबावे लागेल. जमिनीची सुपीकता कोणतेही पीक घेत असता जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे अगर वाढवीत नेणे हे उद्दिष्ट असणे गरजेचे आहे.

यासाठी जमिनीत सेंद्रिय कर्बाची पातळी उच्चपातळीवर कशी ठेवता येईल यावर सतत चिंतन होणे गरजेचे आहे. आपण बैलांऐवजी ट्रॅक्‍टर हा बदल सुलभपणासाठी केला. तसा शेणखत कंपोस्टऐवजी काय या बदलावर विचार करावा लागणार आहे. हा बदल कमी खर्चाचा व प्रत्येक जमिनीला प्रत्येक वर्षी सेंद्रिय खत मिळवून देण्याचा असणे गरजेचा आहे. पारंपरिक शेणखत कंपोस्टच्या मार्गाने हे कधीच साध्य करता येणार नाही. याला पर्याय शोधले पाहिजेत.

अनेकवेळा फक्त उत्पादन हाच मध्य धरून शेतीतील कामे आपण करीत असतो. या पुढे आपल्याला पीक व जमिनीला खत कसे मिळेल असा विचार करणे गरजेचे आहे. कापूस तूर ही दीर्घ अंतरावरील पिके व सोयाबीन, उडीद, मूग ही मिश्रपिके घेण्यामागे मध्यम मुदतीने काही पैसा हातात यावा असे उद्दिष्ट हवे.

तसेच दीर्घ कालावधीतील अंतरावरील पिकाच्या ओळीमधील जागेचा वापर व्हावा. ही पद्धत वापरल्याने मधल्या जागेत तणांची वाढ कमीत कमी होऊन जमीन स्वच्छ ठेवता यावी असे काही उद्देश आहेत. कधी कधी पावसाचे दिवस कमी असतात. एकावेळी जास्त पाऊस पडतो व बऱ्याच वेळी दोन पावसाच्या फेरामध्ये अंतर भरपूर पडते.

अशा परिस्थितीत नांगरून पूर्वमशागत करून पेरलेल्या जमिनीची धूप मोठ्या प्रमाणावर होऊन जमिनीच्या सुपीकतेची हानी होते. मिश्रपिकाच्या ओळीत आंतरमशागत, कोळपणी व निंदणी करून सतत जमीन हलवून पोकळ केली जाते. यातून धुपीचे प्रमाण आणखी वाढते. हे सर्व टाळण्यासाठी प्रचलित पद्धतीत काही बदल करावे लागतील.

सापळा पिकाची पेरणी सापळा पिके शेतात लावून मित्रकीटकांची संख्या वाढवता येते. अशी सापळा पिके कापूस, टोमॅटो व भाजीपाला पिकांत घेतल्यास लेडीबर्ड बीटल, क्रायसोपर्लासारखे मित्रकीटक वाढतात. मूग, उडीद, चवळी, सोयाबीन, मका, राळा, झेंडू अंबाडी, सूर्यफूल आदी पिकांचा अंतर्भाव केल्यास शेतात मित्रकीटक व पक्षांची जोपासना होते.

सापळा पिकांचे फायदे :

  • झेंडूमुळे सूत्रकृमींचे नियंत्रण होते. झेंडूपासून उत्पन्न मिळते.

  • मुख्य पिकाचं उत्पन्न घातल्यास चवळी व मक्याचे उत्पन्न मिळते. बऱ्याच वेळा टोमॅटोपेक्षाही चवळी व अन्य आंतरपिकांचे उत्पन्न जास्त मिळते, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

  • चवळीवरील मित्रकीटक उदा. लेडीबर्ड बीटल, मावा, तुडतुडे हे शत्रुकिडींचा फडशा पडतात.

  • मक्यावर क्रायसोपर्ला हा मित्रकीटक वाढतो.तो माव्याची एक हजारापेक्षांही जास्त अंडी फस्त करतो.

  •  मक्याच्या उंच पिकावर पक्षी बसतात. ते पिकांवरील अळ्या व किडींना खातात.

  •  ज्वारी, मक्याच्या फुलावर माव्याचे व बोंड अळीचे शत्रुकीटक उदा. ट्रायकोग्रामा, क्रायसोपा, लेडीबर्ड, बीटल आदी वाढतात. त्यामुळे जैविक व्यवस्थापन होते.

  • मुख्य पीक,त्यातील योग्य सहयोगी मिश्र पिके

  • भात : ग्लीरीसिडीया, मका, चवळी

  • सोयाबीन : मका, तीळ, धने, मेथी

  • तूर : भोवताली एरंडी, सूर्यफूल (सापळा पिके)

  • कापूस : मका, तूर, मूग, चवळी, लाल अंबाडी, रानवांगी, उडीद, झेंडू हरभरा, भुईमूग

  • ऊस : धने, कांदे, मेथी, मिरची, मका, हरभरा, भूईमूग, चवळी

  • गहू : मोहरी, झेंडू, मका, कोथिंबीर

  • भूईमूग : मका, तूर, मिरची, धने, हरभरा, चवळी, घेवडा, सूर्यफूल

  • हळद : मका, धने, एरंडी, सोयाबीन, मधुमका, मिरची, मूग, घेवडा, पालेभाज्या, मेथी

intercrops
intercropsagrowon

- प्रशांत नायकवाडी, ९६२३७१८७७७, (लेखक सेंद्रिय शेतीतील तज्ज्ञ व आंतरराष्ट्रीय प्रमाणीकरण अधिकारी आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com