सहकार चळवळीने २५ वर्षांत शेतीची प्रगती झाली ः बाळासाहेब थोरात

पद्मश्री अप्पासाहेब पवार प्रयोगशील शेतकरी पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील रमेश कचरे यांना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पद्मश्री अप्पासाहेब पवार प्रयोगशील शेतकरी पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील रमेश कचरे यांना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

बारामती, जि. पुणे : १९६५ ते १९९० चा काळ हा शेतीसाठी खूप महत्त्वाचा ठरला. सहकारी चळवळ फोफावल्यानंतरच्या २५ वर्षांत शेतीची खूप प्रगती झाली. आज जेव्हा हरितक्रांतीची चर्चा होते आणि कीटकनाशक फवारणी करणाऱ्या ७० शेतकऱ्यांचा जीव जातो, तेव्हा पुन्हा एकदा नवा विषय हातात घेऊन काम करावे लागेल, असे वाटते. कीटकनाशक विरहीत अन्न हाच विषय यापुढे घ्यावा लागेल, असे मत राज्याचे माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी येथे व्यक्त केले.  शारदानगर येथे पद्मश्री अप्पासाहेब पवार प्रयोगशील शेतकरी पुरस्काराचे वितरण माजी कृषिमंत्री थोरात यांच्या हस्ते सोमवारी (ता. १६) झाले. त्याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार होते. या वेळी ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सौ. सुनंदा पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, संजय भोसले, मराठवाडा शेती मंडळाचे विश्वस्त विजय बोराडे, अकोला विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे, डॉ. नारायण हेगडे, माजी अध्यक्ष द्राक्ष बागायतदार संघ अशोक गायकवाड, डॉ. एस. एन. जाधव, डॉ. सुदाम अडसूळ, ट्रस्टचे विश्वस्त डॉ. शंकरराव मगर, राजीव देशपांडे, रणजित पवार, डॉ अविनाश बारवकर, विष्णुपंत हिंगणे आदी उपस्थित होते. श्री. थोरात म्हणाले, ‘‘राज्यातील शेतीतील प्रगतीच्या क्रांतीचे अग्रदूत खरेतर डॉ. अप्पासाहेब पवार, डॉ. मणिभाई देसाई, वसंतदादा पाटील, शरद पवार असे सर्व होते. अप्पासाहेब पवार हे संगमनेर तालुक्यासाठी व माझ्यासाठीही खूप जवळचे मार्गदर्शक होते. डॉ. अण्णासाहेब शिंदे, डॉ. देसाई व डॉ. अप्पासाहेब हे हरितक्रांतीतील अग्रदूत होते. शेतीसाठी, अाधुनिकतेसाठी शेतकऱ्याला प्रोत्साहित करणे, ठिबकद्वारे पाणी देणे यासाठी अप्पासाहेबांनी खूप मोठे योगदान दिले. त्यांच्यानंतरही हे काम राजेंद्र पवार अधिक वेगाने पुढे नेत आहेत, हे कौतुकास्पद आहे.’’ श्री. थोरात म्हणाले, ‘‘आज शेतीत कोणतेही अडचणीचे प्रश्न आले तर सर्वांना एकमेव आधार पवारसाहेबच आहेत. एवढेच नाही, तर दिल्लीतही भाजपपासून सर्व पक्षांचे शेतकरी नेते पवारसाहेबांकडे आधारवड म्हणूनच पाहतात. त्यांच्याच नेतृत्वाखाली पुढील काम करावे लागेल. केंद्रात पवारसाहेब कृषिमंत्री होते, म्हणूनच महाराष्ट्रात मी कृषिमंत्रीपद घेतले. तो सहा वर्षांचा कालखंड माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता, सन २००७ मध्ये सर्वाधिक उत्पादन व शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळाले, यामागे पवारसाहेबांचे कर्तृत्व, नेतृत्व व त्याचा असलेला अभ्यास महत्त्वाचा होता. देशातला कृषी विभाग व कृषी विद्यापीठांचे तज्ज्ञही पवारसाहेबांच्या नेतृत्वाखालील कृषी मंत्रालयाचा कालखंड सर्वात चांगला होता असेच म्हणतील.’’ राजेंद्र पवार म्हणाले, ‘‘अप्पासाहेबांनी शेती व शेती विकासावर आयुष्यभर काम केले. आज अनेकविध कारणांनी कळत नकळत शेतकऱ्यांमध्ये निराशा आहे, ती निराशा जावी व प्रयोगशील शेतकऱ्यांकडून प्रेरणा मिळावी या हेतूने अप्पासाहेबांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने दरवर्षी चैत्रपालवीमध्ये राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांना पुरस्कार दिले जात आहेत.’’  या वेळी विद्यार्थ्यांचा व प्रयोगशील शेतकऱ्यांना डॉ. अप्पासाहेब पवार प्रयोगशील शेतकरी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.  चार शेतकऱ्यांचा गौरव... राज्यातील चार शेतकऱ्यांचा पद्मश्री अप्पासाहेब पवार प्रयोगशील आणि प्रगतिशील शेतकरी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप ७५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे होते. पुरस्कारार्थी शेतकऱ्यांत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील रमेश कचरे, जालना जिल्ह्यातील कडवंची गावच्या उमा क्षीरसागर, बीड जिल्ह्यातील देवळा येथील रवींद्र देवरवाडे आणि लोणंद येथील शिवराम घोडके यांचा समावेश होता.  शेतीतील नवी पिढी कौतुकास्पद : शरद पवार शेतीतील नवी पिढी अाधुनिकता स्वीकारत असून स्वतः पुढे जाताना आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही पुढे जाण्यासाठी हातभार लावतात हे कौतुकास्पद आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे व्यक्त केले. श्री. पवार म्हणाले, ‘‘अप्पासाहेबांनी शेतीत संपूर्ण आयुष्य खर्च केले. पाणी, अाधुनिक शेती, संकरीत जनावरे, दूध उत्पादन, प्रक्रिया, शेतीपूरक व्यवसाय हे विषय त्यांच्या आवडीचे होते. या विषयांमध्ये जगभरात जिथे अधिक संशोधन झाले, जिथे अधिक माहिती मिळेल, तिथे जाऊन अभ्यास करण्याचे काम त्यांनी केले. ते ज्ञान शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोचवले. आज स्थिती बदलत आहे. जे पीक आपण घेतो, त्याची उत्पादन खर्च कमी व उत्पादकता वाढवण्यावर भर दिला पाहिजे. एकेकाळी आयात केलेल्या डाळी, तांदूळ सारखे अन्न आज निर्यात होत आहे. अशावेळी नव्या जातींची लागवड व शेतात संमिश्र पिके तसेच आंतरपिके घेऊन अधिक उत्पादन मिळविण्याचा प्रयत्न करावा लागेल. भाजीपाला, फळांसाठी आपण जगात दुसऱ्या क्रमांकावर असलो, तरी योग्य बाजारपेठ मात्र उपलब्ध नाही, ती शोधून आपला शेतमाल जगाच्या नव्या बाजारात पोचविण्यासाठी पावले उचलावी लागतील.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com