कांदा नुकसान
कांदा नुकसान

अतिपावसामुळे लाल कांद्याचे आगार धोक्यात

अतिपावसमुळे लागवडी विरळ झाल्या आहेत. काढणीस आलेले पिकांची सड होत आहे. रोगांचे प्रमाण जास्त आहे. काळा करपा आणि जांभळा करपा, मूळ कुज, कंद सड यासारखा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. रोपांची मर होत आहे. रोपे पिवळी पडून झड होत आहे. यामुळे कांदा पिकांच्या नुकसानीची पातळी वाढली आहे. - डॉ. सतीश भोंडे, कांदा शास्त्रज्ञ व माजी अतिरिक्त संचालक, एनएचआरडीएफ , नाशिक

नाशिक : राज्यातील कांदा उत्पादनाचे मुख्य आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यातील कांदा पिकाला मॉन्सूनोत्तर पावसाचा मोठा फटका बसला असून, कांदा आगारच धोक्यात आले आहे. जिल्ह्यात ५३ हजार ६७२ हेक्टर क्षेत्रावर झालेल्या लागवडीपैकी तब्बल १७ हजार ६५८ हेक्टर क्षेत्राला फटका बसल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने सादर केला आहे. मात्र, निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झाल्याचे शेतकरी आणि अभ्यासकांचे मत आहे.   चांदवड, येवला, सिन्नर, निफाड तसेच ''कसमादे'' पट्टयातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा भागांतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिवाळीपर्यंत ५३ हजार ६७२ हेक्टर क्षेत्रावर खरीप कांद्याच्या लागवडी केल्या आहेत. ज्यामध्ये खरीप कांद्याची लागवड २२ हजार ७९९ हेक्टर क्षेत्रावर तर लेट खरीप कांद्याची लागवड ३० हजार ८७३ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. मात्र, ऑक्टोबरच्या अखेरीस झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाचा १७ हजार ६५८ हेक्टर क्षेत्राला बसला आहे. याबाबत बाधित क्षेत्राचा प्राथमिक अहवाल जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने सादर केला आहे. कृषी विभागाने जरी हा अहवाल सादर केला असला तरी कांद्याच्या लागवडी बाधित झाल्याची स्थिती निम्म्यापेक्षा अधिक असल्याचे कांदा उत्पादक व अभ्यासकांचे म्हणणे आहे. यंदा मॉन्सूनचे आगमन उशिरा झाले त्यात नंतर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे कांदा उत्पादकांनी तयार केलेली रोपे खराब झाली. शेतकऱ्यांनी पुन्हा कांद्याची रोपे तयार करून लागवडी केल्या. या लागवडीचे क्षेत्र प्रस्तावित अकडेवारीपेक्षा अडीच पटीने वाढले. मात्र, उशिरापर्यंत चाललेल्या मॉन्सूनोत्तर पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील कांदा लागवडी मोठ्या प्रमाणावर बाधित झाल्या आहेत. सर्वात जास्त नुकसान हे मालेगाव तालुक्यात असून जवळपास संपूर्ण लागवडीखालील क्षेत्र बाधित झाले आहे. प्रामुख्याने शेतकऱ्यांनी लागवड केलेला लेट खरीप कांदा पावसाच्या तडाख्यात मोठ्या प्रमाणावर बाधित झाला आहे.

एकरी उत्पादनावर परिणाम  जिल्ह्यातील ३३ टक्के क्षेत्रावरील लागवडी बाधित झाल्याने कांद्याच्या उत्पादनांत कमालीची घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कांदा उत्पादनात कमालीचा फटका बसताना सरासरी एकरी उत्पादनात मोठा परिणाम दिसून येणार आहे. कांदा उत्पादन घटल्यामुळे  पुढील काळात संभाव्य कांदा तुटवड्यातून बाजारपेठेतील कांद्याचे दर देखील वाढण्याची दाट शक्यता आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार खरीप कांद्याची स्थिती : 

खरीप कांदा  २२७९९ हेक्टर
लेट खरीप कांदा ३०८७३ हेक्टर
एकूण लागवड ५३६७२ हेक्टर
एकूण बाधित क्षेत्र  १७६५८ हेक्टर 
नुकसानीची टक्केवारी  ३२.९०

कांदा लागवड व नुकसानीची प्राथमिक स्थिती 

तालुका लागवड बाधित क्षेत्र  नुकसान (टक्के)
मालेगाव   ८१४६   ८११२    ९९.५८
नांदगाव ७७१९     ३२००   ४१.४५
कळवण    ५०४    १२२  २४.२०
देवळा    ४६५०  ३००० ६४.५१
येवला   ८३२९   ३२२४   ३८.७०
चांदवड  १३३४३     ५७४५      ४३.०३ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com