राज्यातील शेतकऱ्यांना सुखी, समाधानी ठेव: चंद्रकांत पाटील

पंढरपूर वारी
पंढरपूर वारी

पंढरपूर, जि. सोलापूर: दुष्काळ आणि अतिवृष्टीसारख्या दुहेरी संकटाने राज्यातील  शेतकरी अडचणीत आला आहे. या शेतकऱ्यांना या संकटातून बारे काढ, त्यांना सुखी, समाधानी ठेव, असे साकडे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी (ता. ८) पहाटे श्री विठ्ठल- रुक्‍मिणीच्या चरणी घातले. महसूलमंत्री पाटील यांच्या हस्ते सपत्निक कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्‍मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर संत तुकाराम भवन येथे झालेल्या कार्यक्रमात श्री. पाटील बोलत होते. मंत्री पाटील यांच्याबरोबर मानाचे वारकरी म्हणून सुनील महादेव ओमासे आणि त्यांच्या पत्नी सौ. नंदा ओमासे यांना यंदाचा मान मिळाला. या वेळी विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सौ. अंजली पाटील, शकुंतला नडगिरे, रामचंद्र कदम, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, संभाजी शिंदे, अतुलशास्त्री भगरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, माजी अध्यक्ष अतुल भोसले, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आदी उपस्थित होते. श्री. पाटील म्हणाले, "या वर्षी राज्यासमोर अनेक आव्हाने आली. सुरुवातील दुष्काळ स्थिती होती. त्यानंतर महापुराला सामोरे जावे लागले आणि आता अवकाळी पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाने उपाययोजना केल्या आहेत. केंद्र सरकारकडेही मदत मागितली आहे. गेली तीन, चार वर्षे वारी निर्मल वारी करण्यासाठी प्रयत्न केला गेला. वारीच्या मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठी प्रयत्न केले गेले. त्याला अतिशय चांगले यश आले. पुढील वर्षी धूरमुक्त वारी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असणार आहे.''''  बेडगचे शेतकरी ओमासे ठरले मानाचे वारकरी यंदा मंत्री पाटील यांच्याबरोबर महापूजेसाठी मानाचे वारकरी ठरलेले सुनील ओमासे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्‍यातील बेडग येथील आहेत. शेतकरी कुटुंबातील ओमासे २००३ पासून नित्यनेमाने वारी करतात. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मंत्री पाटील यांच्या हस्ते या वेळी त्यांना चांदीची विठ्ठल-रुक्‍मिणी मूर्ती, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मोफत एसटी पासही देण्यात आला. टाळ-मृदंगाचा गजर अन्‌ हरिनामाचा जयघोष आषाढी-कार्तिकी या दोन्ही वाऱ्यांपैकी आषाढीप्रमाणेच कार्तिकी वारीलाही तेवढेच महत्त्व असते. गेल्या दोन दिवसांपासून वारकऱ्यांची सातत्याने रीघ पंढरीत सुरू आहे. शुक्रवारी भल्या पहाटे चंद्रभागा नदीवरील स्नान आणि प्रदक्षिणा मार्गावरील फेरीसाठी वारकऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या. शहरातील विविध मंदिरे, मठ, धर्मशाळांमधून अखंडपणे कीर्तन, प्रवचन आणि भजने सुरूच होती. शिवाय शहरातील प्रमुख मार्गांवरही टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या अखंड जयघोषाने दिंड्या परिक्रमा पूर्ण करत होत्या, त्यामुळे अवघी पंढरी भक्तिमय झाली होती, असे असले तरी यंदा राज्यातील अतिवृष्टीमुळे वारकरी संख्येत काहीशी घट झाली आहे. शुक्रवारी (ता. ८) पंढरपुरात साडेचार लाख वारकरी दाखल झाले होते. दरवर्षी ही संख्या ७ ते ८ लाखाच्याही पुढे असते. आज पदस्पर्श दर्शनाची रांग पत्राशेडच्याही पुढे गेली. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी १२ ते १४ तास लागत होते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com