पीक नुकसानीची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

पीक नुकसानीची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी
पीक नुकसानीची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

अकोला ः अतिवृष्टीने महासंकटात आलेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी रविवारी (ता. ३) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याने शेतकऱ्यांना उत्सुकता लागली होती. संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली होती. परंतु, मुख्यमंत्र्यांचा हा दौरा धावत्या भेटीसारखाच झाला. अवघ्या ४० मिनिटांत त्यांनी अकोल्यापासून १५ ते २० किलोमीटर परिसरातील चार-पाच ठिकाणी भेटी देऊन शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला.  मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने यंत्रणांनी अकोला तालुक्यातील म्हैसपूर-लाखनवाडा, कापशीरोड आणि चिखलगाव अशा तीन ठिकाणांची निवड केली होती. त्यानुसार भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना निरोपही देण्यात आले होते. म्हैसपूर शिवारात संजय अघडते यांच्या शेतातील पिकांची पाहणी झाली. अघडते यांनी ठोक्याने शेती केलेली असून, त्यांचे १५ एकरांतील सोयाबीन पूर्णतः खराब झाले. ४ एकरांतील कापसाची बोंडे काळवंडली. ज्वारीचेही असेच नुकसान झाले. पीक उत्पादनासाठी लावलेला खर्चही निघणार नसल्याने आता वर्षभर काय खावे, कसे जगावे. तुम्ही आमचे मायबाप असून, या महासंकटातून बाहेर काढा, असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर उपस्थित केला.  कापशी रोड, चिखलगाव येथेही मुख्यमंत्र्यांनी अकोला-पातूर रस्त्यालगतच्या शेतांमध्ये जाऊन पाहणी केली. ११.३० वाजता सुरू झालेला हा पाहणी दौरा १२ वाजून १० मिनिटांनी आटोपत जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीकडे मुख्यमंत्र्यांचा ताफा परतीच्या मार्गाला लागला होता. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक पाहणीच्या ठिकाणी नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मदत केली जाईल, सरकार आपल्या पाठीशी आहे, असे सांगत दिलासा देण्याचा प्रयत्न केला. 

शेतकऱ्यांची नाराजी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात सुरक्षेच्या कारणाने असंख्य शेतकऱ्यांना भेटण्याची संधी मिळाली नाही. पोलिसांनी प्रत्येक गाव फाट्यावर शेतकऱ्यांना थांबवून ठेवले होते. म्हैसपूर येथे सुरवातीला भेट देणार असल्याची माहिती मिळाल्याने गावकरी सकाळपासूनच फाट्यावर दाखल झाले होते. परंतु, मुख्यमंत्र्यांचा ताफा तेथे थांबलाच नाही. यामुळे हे शेतकरी रोष व्यक्त करीत होते. त्यांनी ताफा परत येत असतानाही भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचे समाधान होऊ शकले नाही. अखेरीस या गावकऱ्यांची भाजप लोकप्रतिनिधींकडून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला. चिखलगाव येथे विविध गावांतील शेतकरी मुख्यमंत्र्यांना भेटू इच्छित होते. त्यांना निवेदन द्यायचे होते, परंतु सुरक्षेच्या कारणाने पोलिसांनी त्यांना भेटू दिले नाही. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com