नुकसानग्रस्तांना देणार १० हजार कोटींची मदत: मुख्यमंत्री

पीक नुकसान
पीक नुकसान

मुंबई ः राज्यात अवकाळी पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीपोटी विशेष बाब म्हणून तातडीची दहा हजार कोटी रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता.२) जाहीर केले.  यंदाच्या हंगामात पेरणीच्या सुरुवातीच्या काळात पावसाचा खंड राहिल्याने मूग, उडीद आदी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक ठिकाणी सोयाबीनला देखील मोड आले आहेत. यामधून शेतकरी सावरत नाही तोच संततधार पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.   मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील अवकाळी पाऊस, अतिवृष्टीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुभाष देशमुख, डॉ. अनिल बोंडे, सदाभाऊ खोत, विजय शिवतारे, सुरेश खाडे, महादेव जानकर आदी उपस्थित होते.  प्राथमिक माहितीनुसार राज्यात सुमारे ३२५ तालुक्यांमधील ५४ लाख हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. या वर्षी प्रचंड पाऊस झाला आहे. अरबी समुद्रातील सुपरसायक्लॉनसह क्यार वादळाचा फटका बसला. या पावसाची तीव्रता ऑक्टोबरच्या दुसऱ्या व तीसऱ्या आठवड्यात अधिक होती. त्यामुळे प्रशासनाने ही संपूर्ण स्थिती अत्यंत संवेदनशीलतेने आणि सर्वोच्च प्राधान्य देत हाताळावी; तसेच प्रत्येक शेतकऱ्याची समस्या ऐकून घ्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले.  बैठकीनंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, की वकाळी पावसाने राज्यभरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे सुरू आहेत, शेतकऱ्यांनी मोबाईलवर काढलेले नुकसानीचे फोटोही ग्राह्य धरले जाणार आहेत; पण अद्याप नुकसानीची अंतिम आकडेवारी हाती आलेली नाही. राज्यातील शेतकऱ्यांचे नेमके किती नुकसान झाले, याबाबतची अंतिम आकडेवारी उपलब्ध झाल्यानंतर कोणत्या पिकाला किती नुकसान भरपाई द्यावी, याबाबतचा निर्णय घेतला जाईल. येत्या ३ ते ४ दिवसांमध्ये नुकसान भरपाईबाबतचा हा अंतिम अहवाल येताच मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात करण्यात येईल, तसे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.  त्यासोबतच राज्य सरकारने केंद्र सरकारला मदतीसाठी विनंती केली आहे. केंद्र सरकारच्या निकषांनुसार ती मदतही प्राप्त होईल; पण केंद्राच्या मदतीची प्रतीक्षा न करता राज्य सरकार स्वतःच्या तिजोरीतून तातडीने शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे. त्यासाठी विशेष बाब म्हणून लगेचच दहा हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.  राज्यातील ५० लाख शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे, राज्य सरकारच्या मदतीव्यतिरिक्त पीकविम्याचे पैसेही शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी विमा कंपन्यांना दिले आहेत. त्यासाठी विमा कंपन्यांनी नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्याचे सांगितले. 

बैठकीकडे शिवसेनेची पाठ राज्यात सध्या सरकार स्थापन करण्यावरून भाजप-शिवसेनेत तणाव निर्माण झाला आहे, त्याचे प्रतिबिंब या बैठकीवर उमटले. मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य असलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली. त्याऐवजी शिवसेनेचे मंत्री नुकसानीच्या पाहणीसाठी दौऱ्यावर बाहेर पडले होते. बैठकीला गैरहजर राहून सेनेने भाजपवरील नाराजी दर्शवली असल्याचे बोलले जाते. 

विभागनिहाय नुकसानीचा प्राथमिक अंदाज (हेक्टरमध्ये) कोकण (४६ तालुके, ९७ हजार हेक्टर), नाशिक (५२ तालुके, १६ लाख हेक्टर), पुणे (५१ तालुके, १.३६ लाख हेक्टरहून अधिक), औरंगाबाद (७२ तालुके, २२ लाख हेक्टर), अमरावती (५६ तालुके, १२ लाख हेक्टर), नागपूर (४८ तालुके, ४० हजार हेक्टर). मुख्यमंत्री म्हणाले...

  •   पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
  •   राज्यभरात पंचनामे सुरू
  •   शेतकऱ्यांनी मोबाईलवर काढलेले नुकसानीचे फोटोही ग्राह्य धरणार 
  •   नुकसानीची अंतिम आकडेवारी आल्यानंतर पिकनिहाय भरपाई ठरणार 
  •   भरपाईबाबतचा अहवाल येताच मदत थेट खात्यात जमा करणार
  •   केंद्र सरकारला मदतीसाठी विनंती 
  •   विमा कंपन्यांनाही पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना
  • पीकनिहाय नुकसानीचा प्राथमिक अंदाज (हेक्टरमध्ये)

    फळपिके ५३ हजार 
    भात १.४४ लाख
    ज्वारी २ लाख 
    बाजरी २ लाख
    मका ५ लाख 
    सोयाबीन १९ लाख
    कापूस १९ लाख  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com