वऱ्हाडात सातत्याने पाऊस; शेतकरी चिंतेत

वऱ्हाडात सातत्याने पाऊस; शेतकरी चिंतेत
वऱ्हाडात सातत्याने पाऊस; शेतकरी चिंतेत

अकोला  ः वऱ्हाडात सातत्याने पाऊस तसेच पावसाळी वातावरण असल्याने खरीप हंगामाचे मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. या भागात सोयाबीन हे प्रमुख पीक असून, सध्या काढणीचा हंगाम जोरात सुरू होता. त्यातच मागील चार दिवसांपासून कुठे पाऊस तर कुठे पावसाळी वातावरण असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. बुधवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांत वऱ्हाडातील अकोला, वाशीम आणि बुलडाणा जिल्ह्यात कमीअधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. सद्यःस्थितीत शिवारात खरिपातील सोयाबीन काढणीची लगबग एकीकडे सुरू असून दुसरीकडे शेत खाली झालेल्या शेतकऱ्यांनी रब्बीसाठी तयारी सुरू केली आहे. शिवाय कपाशीची लागवड केलेल्या शेतांमध्ये दिवाळीपूर्वी मुहूर्त साधण्यासाठी तयारी केली जात होती. अशातच गेल्या आठवड्यात पावसाला सुरवात झाली. सध्याही पावसाच्या हलक्या सरी अधूनमधून येत असल्याने शेतांमधील कामे रखडली आहेत. जमिनीत वाफसाच तयार होत नाही. सततच्या पावसाने सोयाबीनचा दर्जा खालावला आहे. कापूस ओला झाल्याने पिवळसर तसेच कवडीयुक्त होत आहे. सोयाबीनचे दर १५ दिवसांत जवळपास ८०० ते १००० रुपयांनी खाली आले. तर कापसाची मागणी व्यापारी अवघी २५०० रुपयांपासून करीत आहेत. वास्तविक दोन्ही पिकांचे हमीदर हे कितीतरी अधिक आहेत.  

खरीप चालला...रब्बीसाठी पोषक  या पावसाने खरिपात लागवड केलेल्या जवळपास सर्वच पिकांचे नुकसान केले. सुरवातीला मूग, उडीद गेले. आता सोयाबीन, कापसाचेही नुकसान होत आहे. हा परतीचा पाऊस रब्बीसाठी चांगला मानला जात आहे. परंतु शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके निघून जात आहेत, ही वस्तुस्थिती आहे.  देऊळगावराजात पहिल्यांदा नद्यांना पाणी विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या देऊळगावराजा तालुक्यात या मोसमात सर्वांत कमी पाऊस पडला होता. परतीच्या पावसाने या भागाला दिलासा दिला आहे. मंगळवारी झालेल्या पावसामुळे काही भागात नदीनाले दुथडी भरून वाहिले. या पाण्यामुळे पातळी वाढीसाठी मदत होईल, अशी अपेक्षा शेतकरी बाळगत आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com