कापूस लोकायची लाज राखते; पण आमचं काय?

कापूस नुकसान
कापूस नुकसान

यवतमाळ : ‘‘आमच्या कापसापासून तयार कपड्यानं आमी इतरायची लाज राखतो; पण भाऊ, आमची लाज राखाले आमचाच कापूस कामी येत नाई,’’ पावसानं कापसाचं नुकसान केल्याचं सांगत, अंगावरील फाटलेले कपडे दाखवत उद्विग्नपणे किसन खंदारे हे वृद्ध शेतकरी सांगत होते. बोलता बोलता या ज्येष्ठ शेतकऱ्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्‍यातील लेवा हे डोंगरदऱ्यात वसलेलं जेमतेम लोकवस्तीचं गाव. याच गावातील रहिवासी असलेल्या सिंधूबाई आणि किसन खंदारे या दांपत्याची ही कहाणी. सिंधूबाई व किसन खंदारे यांच्याकडं जेमतेम दीड एकर शेती. पंचाहत्तरीत असलेल्या या दांपत्याच्या उदरनिर्वाहाचं तेच एकमेव साधन.   या वर्षी मॉन्सुनोत्तर पावसामुळे लागवड केलेल्या कापसाची बोंडं अक्षरशः सडली. दीड एकरातून क्‍विंटलभर कापूस निघाला. बोंडातून काढलेला हा कापूस भिजला, खराब झाला. बाजारात अवघे दोन हजार रुपये देतो, असं व्यापाऱ्यानं सांगितलं. एकरी २१ हजार रुपयांचा खर्च झाला अन् आता दोन हजारांत त्याची भरपाई कशी व्हावी? या खंदारे दांपत्याची चिंता वाढीस लागलीय. दीड एकरात १ क्विंटलच कापूस... तोही पावसानं ओला झाला... पहा video खंदारे दांपत्याकडं अवघी पाच एकर शेती. लग्नानंतर पोरं वायली निघाली. शेती आणि घराच्याही वाटण्या झाल्या. त्यानंतर गेल्या काही वर्षांपासून शेती हाच या दोघांच्या जगण्याचा आधार उरला. तीन वर्षांपासून कोरड्या दुष्काळाचे चटके सोसले. या वर्षी सुरुवातीला पावसानं खंड दिला. त्यानंतर पावसाची संततधार सुरू झाली. चांगलं पीक येईल, अशी आशा होती. परंतु, ऐन बोंडात कापूस आला अन्‌ पावसानं बोंड धरलं, खिन्न मनानं किसन खंदारे सांगत होते.  दोघंही एकमेकांना आधार देत ते गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात जातात. त्यांच्यावर ५० हजार रुपयांचं कर्ज आहे. कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही म्हणून तेदेखील थकीत; नवं कर्जही मिळत नाही. ‘हातावर कमवायचं आणि हातावरच खायचं, अशी अवस्था. त्यातच आजारपणही कधीमधी डोक वर काढतं; तवा उसनवारीच करावी लागते. पण, कितीदा कोणाकडं हात पसरावं आणि देणाऱ्यानं बी किती द्यावं, अशी परिस्थिती आता हाये,’ डोळ्यांतलं पाणी लपवत किसनदादा बोलत होते. ‘‘सरकारचा सर्व्हे सुरू हाये मनतात; पण आमच्या वावरात कोणीच फिरकलं नाई. सरकारकडून भरपाई होईल, असं वाटतं. पण, कर्जमाफी नाई मिळाली, तवा भरपाई सरकार देयील, हे बी काई खरं वाटत नाई,’’ असंही सिंधूबाई सांगत होत्या. आजारपणावरील खर्चासोबतच पुढच्या वर्षीच्या हंगामासाठी लागणाऱ्या पैशाची सोय उसनवारी किंवा सावकाराच्या उंबरठ्यावर जाऊनच करावी लागणार आहे. परंतु, तिथंही पैसे मिळतील, याची खात्री नसल्याचं किसन खंदारेंना वाटतं. आयुष्याच्या शेवटच्या वळणावर असताना सग्यासोयऱ्यांची गरज व्हती. तवाच पोराबाळायनी साथ सोडली. पुढं निसर्गाच्या भरवशावर असलेल्या शेतीचाच एकटा आधार उरला. तवा निसर्गानं बी साथ सोडली. आता जगण्यालेच आधार उरला नाई, असं सांगताना माय सिंधूबाईंचे डोळे पाणावले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com