नाशिक जिल्ह्यात पावसाचा शेतीपिकांना फटका

पीक नुकसान
पीक नुकसान

नाशिक : मान्सूनोत्तर पावसामुळे जिल्हातील पिकांना मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. जोरदार पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने कांद्याची रोप, टोमॅटो, मका, बाजरी, द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. त्यात प्रामुख्याने सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे.   जिल्ह्यात अतिपावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यात निफाड व सिन्नर तालुक्यातील अनेक गावांमध्ये कापणी केलेली सोयाबीन पावसात भिजल्याने सोयाबीन सडले झाली आहे, तर काही ठिकाणी सोयाबीनच्या शेंगांमधून मोड बाहेर येऊ लागले आहेत. त्यामुळे यंदाचा हंगाम काढणीपूर्वीच वाया गेला आहे. पावसामुळे उभ्या पिकांच्या काढणीस उशीर होत असल्यामुळे व सोंगून ठेवलेली पिके खळ्यावर आणता येत नसल्याने पिंकाना कोंब फुटू लागले आहे. 

जिल्ह्यातील सोयाबीन पेरणी क्षेत्र ५९ हजार ३४८ हेक्टर प्रस्तावित होते. प्रत्यक्षात जिल्ह्यातील पेरणी झालेले क्षेत्र ७५ हजार ५३६ हेक्टरवर गेले. अगोदरच निफाड तालुक्यात गोदाकाठी सोयाबीन दोन आठवडे पाण्याखाली होते. त्यामुळे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील २ हजार ९२७ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. त्यापैकी निफाड तालुक्यातील २ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. त्यामुळे एकंदरीत १ कोटी ४२ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान येथील शेतकऱ्यांचे झाले आहे. त्यातच हे मोठे प्रमाणावर झालेले नुकसान शेतकऱ्यांचे अडचण वाढविणारे आहे. 

निफाड तालुक्यातील बेरवाडी, म्हाळसाकोरे, खेडलेझुंगे, रूई, कोळगांव, सारोळे थडी, धारणगांव विर व खडक परिसरात या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खडांगळी, वडांगळी, मेंढी, चोंढी, कीर्तगळी, एकलहरे या भागात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पीक पावसात भिजल्यामुळे खराब झाल्या आहेत. अजूनही नुकसानग्रस्त पिकांचे सर्वेक्षण व पंचनामे झालेले नसल्याने शेतकरी वर्ग हैराण झालेला आहे. शासनाकडून मदतीची अपेक्षा असताना नुकसानीचे सर्वेक्षण, पंचनामे करायला यंत्रणाच उपलब्ध नव्हती, त्यामुळे जिल्ह्यातील कोट्यवधी शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत. यामुळे सणासुदीच्या तोंडावर सोयाबिन उत्पादक हवालदिल झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com