खरीप पीक विम्याकडे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पाठ

भात पिक
भात पिक
पुणे ः विमा कंपन्यांकडून दरवर्षी न मिळणारी पिकांची नुकसानभरपाई, अर्ज भरण्यासाठी आलेल्या अडचणी, मुदतवाढीचा गोंधळ अशा अनेक कारणांमुळे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. चालू वर्षी खरीप हंगामात अवघ्या २९ हजार ४३८ शेतकऱ्यांनी पीक विमा भरल्याचे स्पष्ट झाले आहे.  
 
गेल्या वर्षी या योजनेत जिल्ह्यातील सुमारे ७२ हजार शेतकरी सहभागी झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत विचार केल्यास चालू वर्षी ४२ हजार ५६२ शेतकरी या योजनेत सहभागी झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
यंदा शासनाने खरीप हंगामातील पीक विमा भरण्यास ३१ जुलै ही अंतिम मुदत दिली होती. त्यानंतर पाच ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र पुन्हा गोंधळ करत चार ऑगस्ट ही अंतिम मुदत केली. एकंदरीतच पीक विमा भरण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत ताटकळत उभे राहण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली होती. 
विमा भरण्याच्या कालावधीत जिल्ह्यातील पश्‍चिमेकडील भागातील भात पट्ट्यात भात लागवड वेगाने सुरू होती. त्यामुळे बहुतांशी शेतकरी लागवडीमध्ये व्यस्त होते. त्यातूनही वेळ काढून पीक विमा भरण्यासाठी केंद्रावर गेलेल्या शेतकऱ्यांना ताटकळत उभे राहावे लागत होते. त्यातच डोंगराळ भाग असल्याने अनेक ठिकाणी विजेची समस्या होती. काही ठिकाणी सर्व्हरची समस्या उद्‌भवत होती. त्यामुळे इच्छा असूनही काही तांत्रिक अडचणींमुळे विमा भरण्याकडे शेतकरी पाठ फिरवत असल्याची स्थिती होती. पूर्वेकडील बारामती, इंदापूर, शिरूर तालुक्‍यात विम्यात समाविष्ट नसलेल्या पिकांचा समावेश या योजनेत केला होता.
 
यंदा या योजनेत २४ हजार ९०९ हेक्‍टरसाठी एक कोटी ४२ लाख ८ हजार ९२९ रुपये भरण्यात आले आहेत. शेतकऱ्यांचे नैसर्गिक कारणांमुळे शंभर टक्के पीक नुकसान झाल्यास ७० कोटी ८६ लाख २० हजार ३५० रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. यंदा ९ हजार ८९७ भात उत्पादकांनी ८२ लाख २५ हजार ७८४ रुपयांचा पीक विमा भरला आहे. नुकसान झाल्यास या शेतकऱ्यांना ४१ कोटी १२ लाख ८७ हजार ३७० रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com