अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे तापमानसुद्धा वाढल्याने जिल्ह्यात पेरणी झालेले बहुतांश क्षेत्र अडचणीत आले आहे. काही भागांत दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ५० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर, पावसाअभावी एक लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पेरणी रखडली आहे. शेतकरी पावसासाठी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.  कृषी विभागाने खरीप हंगामासाठी ४ लाख ८० हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन केलेले आहे. पावसाचे आगमन उशिरा झाल्याने  शेतकऱ्यांनी कमी-जास्त प्रमाणात पेरण्यांना सुरवात केली होती. दरम्यानच्या काळात अधूनमधून पाऊस झाल्याने पिके तरारलीसुद्धा. जिल्ह्यात आतापर्यंत ७५ टक्के क्षेत्र लागवडीखाली आले.  दरम्यान, लागवड झालेल्या क्षेत्रात सोमवारअखेरीस (ता. १५) कापूस १ लाख २२ हजार ५६, सोयाबीन १ लाख ४३ हजार ३६२, तूर ४४ हजार ८९१, उडीद १० हजार ६८८, मूग १४ हजार १५३, ज्वारी ८ हजार २०६ व बाजरी २१२ हेक्टरवरील पेरणी झालेली आहे. मात्र, आता पावसाने दडी मारल्यामुळे अंकुरलेले पीक जळण्यास सुरवात झाली आहे. अनेक ठिकाणी हलक्या जमिनीवरील पेरणी उलटलीसुद्धा आहे. काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. या आठवड्यात पाऊस न आल्यास सर्वत्र दुबार पेरणीचे संकट वाढणार आहे. या संकटात शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जावी, अशी मागणी शेतकरी व विविध संघटना करू लागल्या आहेत. 

मूर्तिजापूर तालुका पिछाडीवर या हंगामात जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुका सर्वांत पिछाडीवर पडला आहे. गेल्या वर्षी या तालुक्यात जूनमध्येच जोरदार पाऊस होऊन पेरण्या आटोपल्या होत्या. यंदा अर्धा जुलै लोटूनही केवळ २६ हजार ४७६ हेक्टरवर म्हणजेच ३६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. अनेक शेतकऱ्यांनी पीक मोडून काढले आहे. आता दुबार पेरणी करायची म्हटले, तरी जमिनीत ओल नसल्याने पेच बनलेला आहे. तालुकानिहाय झालेली पेरणी (हेक्टरमध्ये) 

तालुका पेरणी क्षेत्र टक्केवारी
अकोला ७३८९६ ७०
पातूर ४०८६० ७८
बाळापूर ४८२०९ ८०
अकोट ५८२६१ ८५
बार्शीटाकळी ५१३५७ ८२
मूर्तिजापूर २६४७६ ३६
तेल्हारा ४३७८७ ७७

मी ३५ एकरांतील पीक वखरले आहे. २० एकरांतील तूर व मुगाचे पीक काढून झाले. आता २० एकरांतील सोयाबीन वखरणीचे काम सुरू आहे. या पेरणीसाठी अडीच लाखांवर खर्च झालेला आहे. ३० जूनला पेरणी केली होती. पीक उगवलेही होते. मात्र, नंतर पाऊस न आल्याने पेरणी उलटली.  - हितेश प्रल्हाद बावनेर (जांभा खुर्द, ता. मूर्तिजापूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com