वाशीम जिल्ह्यात पीकविम्याची मुदत वाढून देण्याची मागणी

वाशीम जिल्ह्यात पीकविम्याची मुदत वाढून देण्याची मागणी
वाशीम जिल्ह्यात पीकविम्याची मुदत वाढून देण्याची मागणी

वाशीम ः जिल्ह्यातील शेतकरी गेले वर्षभर विविध अडचणींनी त्रस्त आहेत. अनेकांना मागील वर्षाचा पीकविमाही मिळाला नाही. त्यामुळे आगामी पीकविम्याची मुदत तरी आता वाढवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. या वर्षी पीकविमा भरण्यासाठी बुधवार (ता.२४) पर्यंत मुदत देण्यात आलेली होती.  नैसर्गिक आपत्तीत पीक नुकसान झाले तर शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी पंतप्रधान पीकविमा योजना राबवली जात आहे. कर्जदार तसेच बिगर कर्जदार सभासदांना या तारखेच्या आत आपला विमा हप्ता भरायचा आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी फक्त दोन दिवस उरले आहेत. असंख्य शेतकऱ्यांना कागदपत्रांची पूर्तता करताना विलंब लागलेला आहे. काही ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे विमा हप्ता भरता आलेला नाही. अशा परिस्थितीत पीकविम्याचा हप्ता भरू न शकलेले शेतकरी योजनेपासून वंचित राहू शकतात.  नैसर्गिक आपत्ती तसेच इतर कारणांमुळे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरू शकते, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळेच शेतकरी पीकविमा भरण्यासाठी धडपड करीत आहेत. पीकविमा भरण्याची प्रक्रिया आनलाइन असल्यामुळे त्यामध्ये दोन ते तीन तास जात आहेत. सातबारा उतारा ऑनलाइन काढला तरी तलाठ्याच्या स्वाक्षरीसाठी दोन तीन चकरा माराव्या लागतात. शिवाय, पीकविमा भरण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरावे लागत असल्याने सेतू केंद्रावर गर्दी होत आहे. त्यासाठी ही मुदत किमान १५ दिवसांनी वाढविण्याची मागणी समोर आली आहे.   

गेल्या वर्षात पीकविम्याची तारीख ३१ जुलै होती. मात्र या वर्षी ही तारीख सात दिवस कमी आहे.  ही तारीख किमान पंधरा दिवस वाढवून मिळावी. - गजानन गोरले,  शेतकरी, विठोली, जि. वाशीम

या वर्षी  पीकविमा मिळेल असे  शासनाने जाहीर करूनही व शेतकऱ्यांनी आंदोलन केलेले असताना मदत मिळालेली नाही. तरीही शेतकरी या वर्षी पीकविमा भरण्यासाठी पुढे येत आहेत. मात्र, पीकविमा भरण्याच्या प्रक्रियेत अडचणी येत असल्याने ही मुदत वाढविण्याची गरज आहे.  - अभिजित राऊत, शेतकरी, विठोली, जि. वाशीम

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com