हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८ हजार ४०३ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे.
ताज्या घडामोडी
‘जलयुक्त’च्या कामाची धारवाडी, चिचोंडीत चौकशी समितीकडून पाहणी
जलयुक्त शिवार अभियानातील तक्रारी असलेल्या कामाची चौकशी समितीने बुधवारी (ता. ४) तालुक्यातील धारवाडी व नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील कामाची पाहणी केली. समितीने पाहणी करून मोजमाप घेतले.
नगर : जलयुक्त शिवार अभियानातील तक्रारी असलेल्या कामाची चौकशी समितीने बुधवारी (ता. ४) तालुक्यातील धारवाडी व नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील कामाची पाहणी केली. समितीने पाहणी करून मोजमाप घेतले. समितीची पाहणी माध्यमातून अंदाजपत्रकानुसार कामे झाली नसल्याची चौकशी समितीला दिसले असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे आता कारवाई काय होतेय याकडे लक्ष लागले आहे.
नगर जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार अभियानातून करण्यात आलेल्या कामाबाबतच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी राज्याचे सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव विजयकुमार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मंगळवारी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आढावा घेतला. त्या वेळी समितीला कृषी विभागाने सहकार्य न केल्यामुळे विजयकुमार यांनी संताप व्यक्त केला होता. आढावा घेताना तक्रारदार हजर नसले तरी सर्व तक्रारीची चौकशी करणार असल्याचे विजयकुमार यांनी सांगितले.
त्यानुसार बुधवारी (ता.३) विजय कुमार यांच्यासह जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता संजय बेलसरे, मृदसंधारण विभागाचे संचालक बी. एन. शिसोदे यांनी पाथर्डी तालुक्यातील धारवाडी येथील लघुपाटबंधारे विभागाने केलेल्या बंधाऱ्याची पाहणी करून प्रत्यक्ष मोजमाप घेतले. पाथर्डी तालुक्यात सोमठाणे, सातवड, मांडवे, त्रिभुवनवाडी निंबोडी भोसे आदी ठिकाणच्या बंधाऱ्याच्या कामाबाबत तक्रारी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार एका बंधाऱ्यावर तब्बल २७ लाख रुपयांचा खर्च करूनही निकृष्ट कामामुळे काहीही फायदा झाला नसल्याची तक्रार आहे. तरीही पाच वर्ष या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. आता चौकशी समितीने मात्र त्याच कामाची पाहणी करून मोजमाप घेतल्यानंतर संबंधित काम अंदाजपत्रकानुसार झाले नसल्याचे तसेच निकृष्ट झाले असल्याची खात्री झाली असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे लघुपाटबंधारे विभागाच्या या कामाबाबत काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील कामाची ही चौकशी समितीने बुधवारी पाहणी केली. पुन्हा दोन दिवसांनी चौकशी समिती नगर जिल्ह्यात येत असून, अन्य कामाची ही पाहणी करणार आहे. चौकशी समितीचा दौरा प्रसार माध्यमाला कळू नये याची कृषी विभागाने पुरेपूर काळजी घेतली असल्याचे दिसून आले.