मंत्रिपदाची संधी जळगाव की धुळ्याला?

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जळगाव ः खानदेशने भाजपला कौल दिला असून, आता मंत्रिपद कोणत्या मतदारसंघाला मिळते याची उत्सुकता ग्रामस्थ, राजकीय जाणकारांमध्ये आहे. मागील पंचवार्षिकमध्ये धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांना राज्यमंत्रिपदाची संधी मिळाली होती. या वेळी जळगावकडे मंत्रिपद येईल असा तर्क लावला जात आहे. 

जळगाव हा केंद्रात मंत्रिपद घेणारा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. मतदारसंघांच्या पुनर्रचनेपूर्वी हा मतदारसंघ एरंडोल म्हणून ओळखला जायचा. नंतर जळगाव व रावेर असे दोन मतदारसंघ जळगाव जिल्ह्यात तयार झाले. जळगाव मतदारसंघातून निवडून आलेले कॉँग्रेसचे विजय नवल पाटील, भाजपचे एम. के. अण्णा पाटील यांना केंद्रात मंत्रिपद मिळाले होते. या मतदारसंघाने राष्ट्रवादी कॉँग्रेसचे वसंतराव मोरे यांच्या दोन वर्षांचा कार्यकाळ वगळता सलग पाच वेळेस भाजपला कौल दिला आहे. उन्मेष पाटील हे चाळीसगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार असून, त्यांच्या रूपाने पाचवा भाजपचा खासदार या मतदारसंघातून निवडून आला आहे. उन्मेष पाटील यांना तब्बल चार लाख ११ हजार एवढे मताधिक्‍य मिळाले आहे.

रावेर मतदारसंघही भाजपला साथ देणारा भाग म्हणून ओळखला जातो. डॉ. गुणवंतराव सरोदे हे या मतदारसंघाचे भाजपचे पहिले खासदार होते. नंतर हरिभाऊ जावळे यांना सलग दोनदा या मतदारसंघातून विजय मिळाला. मागील पंचवार्षिकमध्ये व या वेळी असा सलग दोनदा भाजप नेते एकनाथ खडसे यांची स्नुषा रक्षा खडसे यांचा मोठ्या मताधिक्‍याने या मतदारसंघात विजय झाला आहे. कॉँग्रेसचे वर्चस्व राहिलेल्या नंदुरबारात माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सलग दोनदा विजयश्री खेचली आहे. मागील पंचवार्षिकमध्ये धुळ्याचे खासदार डॉ. भामरे यांना केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री म्हणून भाजप नेतृत्वाने संधी दिली. डॉ. भामरे हे मित व मधुरभाषी म्हणून ओळखले जातात. अनेक दुर्लक्षित सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. लोकांशी त्यांचा सतत संपर्क असतो. मराठा समाजाला जवळ करण्यासंबंधी भाजपने त्यांना मंत्रिपद दिले होते.

जळगावचे नवे खासदार उन्मेष पाटील हे अभियंता असून, अभ्यासू आहेत. ते दरेगाव (ता. चाळीसगाव) येथील देशमुख परिवारातील आहे. पाणीप्रश्‍न सोडविण्यासह शेतकऱ्यांच्या मुद्द्यांबाबत ते नेहमी तत्पर, संवेदनशील असतात. त्यांच्या विजयात जल संपदामंत्री गिरीश महाजन व शिवसेना नेते सुरेश जैन यांचा मोठा वाटा आहे. यामुळे उन्मेष पाटील यांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते, असा तर्क जाणकार लावत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com