नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली चारा छावण्यांना भेट

जिल्हाधिकाऱ्यांनी केली चारा छावण्यांची पाहणी
जिल्हाधिकाऱ्यांनी केली चारा छावण्यांची पाहणी

नगर   ः लोकसभा निवडणुकीच्या धामधूमीतून काहीसा दिलासा मिळाल्यानंतर आता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पुन्हा चारा छावण्यांना भेटी सुरू केल्या आहेत. गुरुवारी पाथर्डी तालुक्‍यातील निवडुंगे, माळी बाभूळगाव व शिरसाटवाडी येथील चारा छावण्यांना भेटी दिल्या. जिल्हा उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार नामदेव पाटील, तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी शिरीष निरभवणे आदी त्यांच्यासोबत होते. 

जनावरांच्या छावण्यात सुविधा, पशुखाद्य दिले जात नाही. तक्रार केली तर धमक्या दिल्या जातात. मानसिक हेळसांड केली जात असल्याच्या तक्रारी निवडणूक काळात आलेल्या होत्या. प्रशासनाचे अधिकारी निवडणुकीत गुंतल्याने असे प्रकार होत असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी आता पुन्हा एकदा छावणी भेटीची मोहीम सुरू केली आहे.

गुरुवारी अचानक माळी बाभूळगाव (ता. पाथर्डी) येथे छावणीला भेट दिली त्या वेळी, पशुखाद्य किती आणले, किती वाटप केले आणि शिल्लक किती, याची तपासणी केली. कुट्टीवर चारा कसा बारीक केला जातो, याची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधला असता, शेतकऱ्यांनी चारा व पशुखाद्य नियमाप्रमाणे मिळत असल्याचे सांगितले; मग काही जनावरांची प्रकृती चांगली का नाही, अशी विचारणा त्यांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या छावणी भेटीचे शेतकऱ्यांनी स्वागत केले असून छावणीचालक मात्र धास्तावले आहेत. 

तुला बोलता आले असते तर... छावणीत पाहणी करताना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी एका पंधरा दिवसांच्या लहानश्या वासराला जवळ घेऊन जणू त्यांच्याशी संवादच साधला. ''मित्रा, तुला जर बोलता आले असते तर किती छान झाले असते. तुलाच विचारले असते, कसे काय चालले, हे सर्व जण मला खूपच चांगले चालल्याचे सांगत आहेत. तू तरी मला खरे सांगितले असते'', असा मूकसंवाद जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी माळी बाभूळगाव येथील छावणीत वासराला जवळ घेत केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com