सांगली जिल्ह्यातील अंडी उत्पादकांना कोट्यवधीचा फटका

गेल्या सात महिन्यांत उत्पादन खर्चात वाढ होऊ लागली आहे. पण, अंड्याला अपेक्षित दर मिळत नाही. त्यामुळे हा व्यवसाय संकटात सापडला आहे. अंड्याचा दर वाढवणे आवश्यक आहे. तरच व्यवसाय स्थिरावेल. - सचिन कानडे, पोल्ट्री व्यवसायिक, विटा, जि. सांगली.
पोल्ट्री
पोल्ट्री

सांगली ः एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत पोल्ट्रीच्या खाद्याचे दर वाढले आहोत. त्यातच प्रतिअंड्याचा उत्पादन खर्च ४.३० रुपये येत असताना कमिशन वजा करता २.९० ते ३.१० रुपये दर मिळाला. उत्पादकांना प्रतिअंडी १.२० ते १.३० रुपये तोटा सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात दररोज १४ ते १५ लाख अंडी उत्पादन होत असून, उत्पादकांना दैनंदिन जवळपास १९.५० लाखांचा तोटा होत आहे. गेल्या सात महिन्यांत जिल्ह्यातील पोल्ट्री उत्पादकांना तब्बल ४०.९५ कोटींचा फटका बसला आहे.  जिल्ह्यात पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी पोल्ट्री व्यवसायाकडे वळले आहेत. गेल्या वर्षी जिल्ह्यात अंड्यावर असणारे २५ लाख पक्षी होते. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून कोंबड्यांना लागणाऱ्या खाद्याच्या दरात वाढ झाली. त्यातच अंड्याला अपेक्षित दर नसल्याने पक्षांची संख्या जवळपास ९ लाखांनी कमी होऊन १६ लाखांवर पोचली. त्यामुळे जिल्ह्यात सध्या १४ ते १५ लाख अंड्यांचे उत्पादन होते.  यंदा मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला. मका बाजारात कमी येणार त्यामुळे दर कसे राहतील याचा अंदाज आताच बांधता येणार नाही. परंतु, गेल्या सात महिन्यांत मक्याचे दरही २ हजार ६०० रुपये क्विंटल इतका झाला आहे. सध्या मक्याचे दर काहीसे कमी झाले. मात्र, तरीही गेल्या सात महिन्यांतील झालेला आर्थिक तोटा भरून निघणारा नाही. सध्या अंड्याचा उत्पादन खर्च ४.३० रुपये असून दरही तोच आहे. त्यामुळे कमिशन वजा करता २.९० ते ३.१० रुपये दर मिळत आहे. परिणामी उत्पादकांना प्रतिअंडी १.२० ते १.३० रुपये तोटा सहन करावा लागत आहे. दैनंदिन व्यवहार विचार करता जिल्ह्यात १४ ते १५ लाख अंडी उत्पादन होते. प्रतिअंडी १.३० रुपये तोटा धरल्यास जिल्ह्यातील अंडी उत्पादकांना दैनंदिन जवळपास १९.५० लाखांचा तोटा होत आहे. महिन्याला ५.८५ कोटी, तर गेल्या सात महिन्यांत ४०.९५ कोटी रुपयांचा तोटा झाला. त्यामुळे अंडी उत्पादकांच्या हातात काहीच मिळाले नसून, उलट तोटाच सहन करावा लागत आहे. अंडे किरकोळ दुकानदार व्यावसायिकांकडून ३ ते ४ रुपये रुपयांना खरेदी करून सहा ते साडेसहा रुपयाने ग्राहकांना विक्री करतात त्यामुळे अंड्यात तफावत निर्माण झाली आहे. व्यावसायिकांना पाच ते साडेपाच रुपये मिळाल्यास आत्तापर्यंत झालेला तोटा भरून निघेल. असे व्यावसायिक सांगत आहेत. ‘नेक’ने (राष्ट्रीय अंडी समन्वय समितीने) तोट्यात निघालेल्या या व्यवसायाला दराची उभारी द्यावी, अशी मागणी पोल्ट्री व्यावसायिकांतून होत आहे. ‘‘पोल्ट्री व्यवसाय संकटात आला असल्याची माहिती वरीष्ठ अधिकाऱ्यांना दिली होती. त्यानुसार विधानसभा निवडणुकीपूर्वी याबाबत बैठक झाली होती. त्यामध्ये सवलतीच्या दरात मका देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर निवडणुका लागल्याने आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे यादरम्यान मका मिळाला नाही. परंतु, आता मका मिळणे अपेक्षित होते. परंतु, सवलतीच्या दरात मका मिळाला नाही. शासनाने सवलतीच्या दरात मका उपलब्ध करु द्यावा,’’ अशी माहिती पोल्ट्री व्यवसायिकांनी दिली.  जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसाय दृष्टिक्षेपात

  •  १९८० पासून पोल्ट्री व्यवसायाला प्रारंभ
  •  जिल्ह्यात ५०० पोल्ट्री उत्पादक शेतकरी
  •  सध्या अंड्यावर असणारे पक्षी १५ ते १६ लाख
  •  सातत्याने खाद्याच्या दरात वाढ
  •  अंड्याला अपेक्षित दर नाही
  •  NECC च्या दरविषयक धोरणामुळे होतोय तोटा
  • प्रतिक्रिया उत्पादन खर्चापेक्षा अंड्याचा दर कमी मिळत आहे. त्यामुळे हा शेतीपूरक व्यवसाय मोडकळीस आला आहे. स्पर्धेच्या युगात हा व्यवसाय टिकविण्यासाठी व त्यास चालना देण्यासाठी शासनाने अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक मदत केली पाहिजे.  - शत्रुग्घ जाधव, अध्यक्ष, खानापूर तालुका पोल्ट्री संघटना

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com