इथेनॉल उत्पादन घटणार

उसाचे कमी गाळप यंदा होईल. शिवाय इथेनॉलपेक्षा साखर कारखान्यांमधील इतर उपपदार्थ्यांना बाजारात चांगले दर मिळत आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी देशातील तेल कंपन्यांना इथेनॉल पुरविण्यात उत्साह दाखविलेला नाही. इथेनॉल पुरवठ्याच्या निविदाही कारखान्यांनी कमी भरल्या आहेत. मात्र, ही संधी साधून तेल कंपन्यांनी इथेनॉल आयातीचा घाट घातल्यास आमचा कडाडून विरोध राहील. - प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघ
इथेनाॅल
इथेनाॅल

पुणे:  देशाच्या इथेनॉलनिर्मितीत मोठी घट होण्याचे संकेत मिळत आहेत. कर्जपुरवठ्यात बॅंकांची दिरंगाई तसेच उपपदार्थांमध्ये तेजी आल्याने इथेनॉलनिर्मितीबाबत साखर कारखान्यांमध्ये कमालीची चलबिचल निर्माण झाली आहे.   पेट्रोलमधील सध्याचे इथेनॉल मिश्रण पाचवरून दहा टक्के करण्यासाठी केंद्र सरकारने स्वतंत्र धोरण लागू केले आहे. या धोरणाचा पाठपुरावा करताना कारखान्यांना सवलतीच्या दराने १६ हजार ५०० कोटी रुपयांची कर्जे देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला तेल विपणन कंपन्यांना (ओएमसी) इथेनॉल पुरवठ्याच्या निविदा भरण्यास साखर कारखान्यांनी सपशेल माघार घेतली आहे. इथेनॉल उत्पादन घसरत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.   वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिशनने महाराष्ट्रात नोव्हेंबरची इथेनॉलनिर्मिती ठप्प झाल्याचे स्पष्ट केले आहे. “गाळप हंगाम लांबल्यामुळे इथेनॉलनिर्मिती थांबली आहे. किमान १५ नोव्हेंबरपासून हंगाम सुरू करणे अपेक्षित होते,” असे विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी नमूद केले आहे.  इथेनॉलनिर्मितीचे वर्ष एक डिसेंबरला सुरू होते. चालू इथेनॉल वर्षासाठी काढलेल्या निविदांमध्ये फक्त १६३ कोटी लिटर्सच्या निविदा आलेल्या आहेत. यामुळे देशाची गरज भागू शकत नाही. विशेष म्हणजे इथेनॉलनिर्मितीत आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रातून फक्त १९ कोटी लिटर्सच्या निविदा आल्या आहेत. याचा अर्थ राज्यातील साखर कारखान्यांना इथेनॉल उत्पादन तूर्त तरी फायदेशीर वाटत नाही; अन्थथा निविदांमध्ये मोठी चढाओढ दिसली असती.  दुसऱ्या बाजूला आता भारतीय इथेनॉल बाजारपेठेवर इतर देशांचा डोळा आहे. विशेषतः अमेरिकेत मक्यापासून तयार होणारे इथेनॉल भारतात आणल्यास कर आणि वाहतूक खर्च सहन करूनही अमेरिकन इथेनॉल परवडू शकेल. भारतीय तेल कंपन्या हीच संधी साधून दहा टक्के मिश्रणाच्या नावाखाली इथेनॉल आयातीसाठी धडपड करू शकतात, असे कारखान्यांना वाटते.  साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे म्हणाले की, “चालू इथेनॉल वर्षात केंद्राच्या धोरणाप्रमाणे किमान ५१० कोटी लिटर्स इतके इथेनॉल तयार व्हायला हवे. मात्र, निविदा बघता निम्मा देखील पुरवठा होणार नाही. त्यामुळे इथेनॉलची आयातीची भीती आम्हाला वाटते. तसे झाल्यास देशी इथेनॉल उद्योगाचे पर्यायाने कारखान्यांचे कंबरडे मोडेल. त्यामुळे आम्ही आयातीला कडाडून विरोध करू.”  टार्गेट १६ हजार कोटींचे आणि वाटले ९०० कोटी  साखर कारखान्यांना इथेनॉल प्रकल्प उभे करण्यासाठी बॅंकाकडून तयार होत असलेले अडथळे हादेखील देशी इथेनॉलनिर्मितीच्या संभाव्य घटीला कारणीभूत ठरत आहेत. “इथेनॉल प्रकल्पांबाबत कर्ज पुरवठा व अनुदानविषयक ४१७ अर्ज आले होते. अन्न मंत्रालयाने यातील फक्त ३२८ अर्ज तत्वतः मंजूर केले. मंजूर अर्ज बॅंकांकडे गेल्यानंतर व्याजामध्ये सहा टक्के सूट केंद्राकडून मिळणार होती. ही सवलत रक्कम एकूण तीन हजार ५७८ कोटी रुपये इतकी वाटणे अपेक्षित होते. मात्र, सर्व प्रक्रियांमधून फक्त ७९ अर्ज स्विकारले गेले. त्यातही पुन्हा बॅंकांनी फक्त ४५ अर्ज मान्य केले असून त्यांना कर्जापोटी दोन हजार १९० कोटी रूपये देणे अपेक्षित होते. मात्र, बॅंकांनी फक्त ९०० कोटी रुपये आतापर्यंत उपलब्ध करून दिले आहे,’’ असे साखर महासंघाचे म्हणणे आहे.  उपपदार्थांमध्ये तेजी “पुढील वर्षीच्या हंगामात मुळात ऊस गाळप घटणार आहे. कारखान्यात गाळपाच्या चार टक्के मोलॅसिस मिळते व त्यापासून पुढे इथेनॉल बनते. मुळात कच्चा मालच कमी हाती येणार आहे. याशिवाय साखर कारखान्यांच्या उपपदार्थ प्रकल्पांच्या बाजारात सध्या इथेनॉलपेक्षा एक्स्ट्रा न्युट्रल अल्कोहोल व रेक्टिफाईड स्पिरीट या उपपदार्थांमध्ये तेजी आहे. त्यांना अनुक्रमे ६० रुपये व ईएनए ६२ रुपये प्रतिलिटर दर आहे. त्यामुळे ५२ ते ५९ रुपये दराची इथेनॉल निर्मिती कारखान्यांना सोयीची वाटत नाही,” अशी माहिती सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com